जम्मू-काश्मीरमध्ये सर्वसामान्यांवर होणारे दहशतवादी हल्ले थांबण्याचे नाव घेत नाहीत. गुरुवारी बडगाममध्ये वीटभट्टीवर काम करणाऱ्या परप्रांतीय मजुरांवर हल्ला झाला, ज्यामध्ये 1 कामगाराचा मृत्यू झाला. तर एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. जखमी मजुरावर श्रीनगरच्या SMHS रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बडगाम मगरेपोरा चडूरा भागात दहशतवाद्यांनी मजुरांवर हल्ला केला. या हल्ल्यात प्राण गमावलेल्या मजुराचे नाव दिलखुश असल्याचे सांगण्यात येत आहे. तो बिहारचा रहिवासी होता. दुसरीकडे, राजन असे दुसऱ्या मजुराचे नाव असून, तो पंजाबचा रहिवासी आहे. काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गैर-काश्मिरी किंवा हिंदू नागरिकांची निवडक हत्या केली जात आहे.
कुलगाम जिल्ह्यात गुरुवारी पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी दुसऱ्या राज्यातील एका बँक कर्मचाऱ्यावर हल्ला केला. गोळी लागल्याने बँक मॅनेजर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याआधी मंगळवारीच कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका हिंदू महिला शिक्षिकेची गोळ्या झाडून हत्या केली होती.
गुरुवारी कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका बँक मॅनेजरवर गोळीबार केला. या हल्ल्यात बँक व्यवस्थापक विजय कुमार यांचा मृत्यू झाला. विजय कुमार हा राजस्थानचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. विजय कुमार हे कुलगाममधील मोहनपोरा येथील स्थानिक ग्रामीण बँकेत तैनात होते. दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. तो राजस्थानमधील हनुमानगडचा रहिवासी होता.