फेसबुक, व्हॉट्सअॅपची मातृकंपनी ‘मेटा’ने जगभरातील तब्बल ११ हजार कर्मचारी (एकूण मनुष्यबळाच्या १३ टक्के) कमी करण्याची घोषणा बुधवारी केली. यासंदर्भात कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी सर्व कर्मचाऱ्यांना पत्र पाठवले असून, घटलेला महसूल आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढत्या समस्या हे कारण देण्यात आले आहे.
गेल्याच आठवडय़ात ट्विटरचे नवे मालक इलॉन मस्क यांनी सुमारे साडेतीन हजार कर्मचारी कपातीची प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर आता जगातील सर्वात मोठी समाजमाध्यम कंपनी असलेल्या ‘मेटा’नेदेखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवले आहे. ‘‘करोनाची साथ संपल्यानंतरही उत्पन्न वाढ कायम राहील, हे गृहीत धरून आक्रमकपणे नोकरभरती केली. मात्र दुर्दैवाने माझ्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत,’’ असे झकरबर्ग यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
‘मेटा’ने सलग दोन तिमाहींमध्ये महसुलात मोठी घट नोंदवली आहे. कंपनीने ‘मेटाव्हर्स’ या नव्या संकल्पनेत तब्बल १० अब्ज डॉलरची गुंतवणूक केल्यामुळे गुंतवणूकदारांनी चिंता व्यक्त केली आहे. याचाही परिणाम कंपनीच्या महसूल आणि उत्पन्नावर झाला आहे. याखेरीज अॅपलच्या खासगीकरण साधनांमुळे फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅप यांना वापरकर्त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाही. याचाही फटका मेटा कंपनीला बसतो आहे. तरुणांमध्ये ‘टिकटॉक’ अधिक लोकप्रिय होत असून त्याची फेसबुकला तीव्र स्पर्धा आहे.
करोनाकाळात अनेक कंपन्यांनी मोठय़ा प्रमाणात नोकरभरती केली होती. साथ ओसरल्यानंतरही व्यवसाय कायम राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, आता अनेक व्यवहार प्रत्यक्षात सुरू झाल्यामुळे ‘ऑनलाइन’ व्यवहारांचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे सर्वच माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांना तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे.