ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने राजीनामा दिल्याने राजकीय विरोधाचा सामना करावा लागत आहे. कारण त्यांच्या निकटवर्तीय मंत्र्यांनी त्यांच्यावरील दमदाटीच्या आरोपांची चौकशी प्रलंबित असताना आपल्या पदाचा बुधवारी राजीनामा दिला. विरोधी मजूर पक्षाने या प्रकरणी सुनक यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
सर गेव्हिन विल्यम्सन हे सुनक यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते. अद्याप त्यांना खाते मिळावयाचे होते. त्यांच्यावर हुजूर पक्षाचे त्यांचेच सहकारी आणि सनदी सेवकांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप होता. त्यांनी ‘ट्विटर’वर आपला राजीनामा प्रसृत केला. विरोधी मजूर पक्षाने सुनक यांच्याकडे सक्षम सहकारी निवडण्याची क्षमता नसून, त्यांचे नेतृत्व सक्षम नसल्याचे हे निदर्शक असल्याची टीका केली आहे. मजूर पक्षाचे नेते सर कीर स्टार्मर ‘हाउस ऑफ कॉमन्स’मध्ये पंतप्रधानांना विचारावयाच्या साप्ताहिक प्रश्नाच्या अधिकारात हा मुद्दा उपस्थित करून सुनक यांच्यावरील दबाव वाढवण्याचा प्रयत्न करतील.
मजूर पक्षाच्या उपनेत्या अँजेला रेनर म्हणाल्या, की विल्यमसन यांच्यावरील गंभीर आरोपांची कल्पना असतानाही सुनक यांनी त्यांना मंत्रिपदी नियुक्त केले, विश्वास व्यक्त केला. हे ऋषी सुनक यांच्या खराब निर्णयांचे व कमकुवत नेतृत्वाचे आणखी एक उदाहरण आहे. या पदावर निवडून येण्यासाठी केलेल्या ‘तडजोडीं’मुळे सुनक हतबल आहेत. पक्षासाठी त्यांनी देश वेठीस धरला आहे.