शिवसेना खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर, ते रात्री उशिरा आपल्या घरी आले आहेत. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. यावेळी केलेल्या भाषणातून संजय राऊतांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी आपल्या अटकेबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
“माझ्या अटकेचे आदेश दिल्लीतून आले. उसको अंदर डालो, तभी हमारी सरकार आ जाएगी, असे आदेश देण्यात आले. हे मला माहीत होतं. महाराष्ट्रातले बोके आता खोक्यावर बसले आहेत. आता फक्त ओके शिवसेना असेल, तीही फक्त आपल्या उद्धव ठाकरेंची आणि बाळासाहेब ठाकरेंची असेल. गद्दारांना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. आपल्या हातातून मुंबई काढून घेण्यासाठी शिवसेना फोडली. पण ते होणार नाही” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
मी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर हजारो लोकांनी माझं स्वागत केलं. हे स्वागत माझं नसून भगव्या झेंड्याचं स्वागत आहे. मी ऑर्थर रोड तुरुंगातून आपल्या पक्षाचंच काम करत होतो. आपल्याच पक्षाचा विचार करत होतो. माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण या पक्षासाठीच असणार आहे. मला चिरडणं… मला संपवणं… एवढं सोपं नाही. हे बाळासाहेब ठाकरेंनी तयार केलेलं रसायन आहे. आता रडायचं नाही लढायचं. मी १०३ तीन दिवस तुरुंगात होतो. आता आपल्याला १०३ आमदार निवडून आणायचे आहेत. प्रत्येक संकट ही एक संधी असते, अशा शब्दांत संजय राऊतांनी विरोधकांवर टीकास्र सोडलं आहे.