मागील दोन वर्षांपासून मुक्काम ठोकून असलेल्या कोरोना महामारीचे परिणाम सर्वच क्षेत्रांत पाहायला मिळत आहेत. या परिणामांतून वाहन क्षेत्राचीही सुटका झालेली नाही. लॉकडाऊन काळात झालेले नुकसान तसेच इनपुट खर्च वाढल्याच्या कारणावरून आता वाहनांच्या किंमती वाढल्या आहेत. 1 जुलैपासून ही दरवाढ लागू होणार आहे. यामुळे तुम्ही जर कार खरेदीचा विचार करीत असाल तर तुम्हाला मार्केटमध्ये पाऊल ठेवण्याआधी वाढीव किंमतीचा आकडा विचारात घ्यावा लागणार आहे. आघाडीच्या मारुती कंपनीपासून हिरोपर्यंतच्या अनेक कंपन्यांनी हा दरवाढीचा निर्णय घेतला आहे.
अनेक कंपन्यांनी गाड्यांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला असून आता महागड्या गाड्यांच्या यादीत हिरो मोटोकॉर्प पहिल्या स्थानावर आहे. या कंपनीने आपल्या प्रोडक्ट्ससाठी आणखी एकदा दरवाढीची घोषणा केली आहे. कंपनीने अलिकडेच यासंदर्भात प्रेस रिलीज करून या दरवाढीची माहिती जाहीर केली होती. 1 जुलै 2021 पासून कंपनी आपल्या बाईक आणि स्कूटरच्या एक्स-शोरुम किंमतीमध्ये वाढ करणार आहे, असे हिरो मोटोकॉर्पने त्या प्रेस रिलीजच्या माध्यमातून स्पष्ट केले होते.
हिरो मोटोकॉर्पने आपल्या गाड्यांच्या दरवाढीच्या निर्णयामागील कारणाचा उहापोहही केला आहे. कमोडिटीच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळेच कंपनीला आपल्या गाड्यांच्या किंमती वाढवणे आवश्यक ठरले आहे. याचवेळी कंपनीने वाढीव किंमतीचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होऊ नये, या दृष्टीकोनातून सातत्याने ड्राईव्ह कॉस्ट सेव्हिंग प्रोग्रामसुद्धा चालू ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. हीरो मोटोकॉर्प मोटरसायकल आणि स्कूटर्सच्या किंमतींमध्ये जुलै महिन्यापासून 3000 रुपयांची वाढ करणार आहे. कंपनीने सध्यातरी कोणत्या मॉडेल्सच्या किंमतीत वाढ केली जाईल, याबाबत कुठली अधिकृत घोषणा केलेली नाही.
मारुती कंपनीनेही आपल्या गाड्यांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वाढीव किंमत लागू होणार आहे. इनपुट खर्च वाढल्याचे कारण मारुती कंपनीने दिले आहे. कारच्या किंमतीत किती वाढ करणार आहे, हे मात्र कंपनीने जाहीर केलेले नाही. जानेवारीत कंपनीने आपल्या कारच्या किंमतीत 34 हजार रुपयांपर्यंत वाढ केली होती. त्यानंतर एप्रिल महिन्यातही काही कारची किंमत वाढवली होती. आता तिसऱ्यांदा दरवाढ करण्याचा निर्णय मारुती कंपनीने घेतला आहे. कोरोना महामारीमुळे कंपनीला सातत्याने दरवाढीचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे स्पष्ट होत आहे.