हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला सोमवारपासून नागपूरमध्ये सुरूवात होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपूरच्या भुखंडावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यानंतर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंना टार्गेट केलं. या मुद्द्यावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करणार असल्याची घोषणा केली.
सत्ताधाऱ्यांकडून आदित्य ठाकरे टार्गेट होत असल्यामुळे आता उद्धव ठाकरे ही मैदानात उतरत आहेत. उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या नेत्यांना घेऊन नागपूरमध्ये पोहचले आहेत. काल रात्री 11 वाजता मुंबईहून उद्धव ठाकरे अधिवेशनासाठी नागपूरला निघाले. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे, संजय राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि युवासेना प्रमुख वरुण सरदेसाई देखील आहे.
नागपूरला रवाना होण्याआधी शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. ‘उद्या आम्हाला नागपूरला जायचं आहे. उद्धव ठाकरेंसोबत आम्ही तिकडे जाऊन बरेच मोठे बॉम्ब फोडणार आहोत,’ असं संजय राऊत नवी मुंबईतील एका कार्यक्रमात म्हणाले आहेत. संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे ऐन हिवाळ्यात नागपूरचं राजकीय वातावरण चांगलंच तापणार असं दिसतंय, पण संजय राऊत यांच्या या बॉम्ब फोडणार असल्याच्या दाव्यामुळे कोण अडचणीत येणार? याबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या सुरूवातीलाही उद्धव ठाकरे नागपूरमध्ये आले होते, यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकासआघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठीची रणनीती आखण्यात आली. या बैठकीनंतरच नागपूर भूखंड प्रकरणात विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती.