आज दि.३० अ़ॉक्टोबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

सेमी फायनलच्या तिकिटासाठी टीम इंडिया वेटिंगवरच, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाली ‘ही’ अवस्था

आधी लुंगी एनगिडी आणि त्यानंतर डेव्हिड मिलर-एडन मारक्रम या जोडीनं केलेल्या निर्णायक भागीदारीमुळे दक्षिण आफ्रिकेनं सुपर 12 फेरीत टीम इंडियाचा विकेट्सनी पराभव केला. त्यामुळे टीम इंडियाला सेमीफायनलच्या तिकीटासाठी टीम इंडियाला अजूनही वेटिंगवरच राहावं लागणार आहे. या सामन्यात टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेसमोर 134 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण दक्षिण आफ्रिकेनं अखेरच्या ओव्हरमध्ये 2 बॉल बाकी ठेऊन हा सामना जिंकला आणि वर्ल्ड कपमध्ये दुसऱ्या विजयाची नोंद केली. या विजयासह दक्षिण आफ्रिकेचा संघ पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

डेव्हिड मिलर आणि एडन मारक्रमची भागीदारी दक्षिण आफ्रिकेच्या विजयात निर्णायक ठरली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली. मारक्रमनं 41 बॉलमध्ये 52 धावांची खेळी केली. तर मिलरनं नाबाद 59 धावा करुन दक्षिण आफ्रिकेला विजयाकडे नेलं. दक्षिण आफ्रिकेची एक वेळ 3 बाद 24 अशी अवस्था झाली होती. पॉवर प्लेमध्येही दक्षिण आफ्रिकेला 40 धावाच करता आल्या होत्या. पण मारक्रम आणि मिलर जोडीनं दक्षिण आफ्रिकेला या अडचणीतून बाहेर काढलं. अर्शदीप सिंगनं पहिल्याच ओव्हरमध्ये दोन धक्के देत या सामन्यात टीम इंडियाच्या आशा उंचावल्या होत्या. पण एडन मारक्रम आणि मिलरनं टीम इंडियाच्या अपेक्षांवर पाणी फेरलं.

अमरावतीत मोठी दुर्घटना, दुमजली दुकान कोसळलं, 4 जणांचा मृत्यू

अमरावती शहरात मोठी दुर्घटना घडली आहे. प्रभात चौकात एक दोन मजली दुकान कोसळले आहे. या दुर्घटनेमध्ये 3 ते 4 जण अडकल्याची भीती वर्तवली जात होती. घटनास्थळी स्थानिक लोक आणि अग्निशमन दलाचे मदतकार्य करत आहे. मदत कार्यादरम्यान आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अमरावतीच्या प्रभात चौकातील राजदीप बॅगचे दुकान कोसळले. यातील ढिगाऱ्याखाली 4-5 जण दबले असण्याची शक्यता वर्तवली जात होती. या ढिगाऱ्याखालुन 4 मृत्यूदेह काढण्यात आले आहे. तर बाकी लोकांचा शोध सुरू आहे.

Infosys च्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! एकाच वेळी करता येतील दोन जॉब्स

सध्याच्या महागाईच्या जगात घरखर्च चालवणं कठीण आहे. यासाठीच अनेकजण आपल्या मुख्य जॉबसोबत सेकंड इन्कमचाही विचार करताना दिसतात. एकाच वेळेस दोन ठिकाणी जॉब करण्यालाच मूनलायटिंग असं म्हणतात. ऑफिसमधलं काम संपलं, की संध्याकाळी पार्टटाइम काम करणारे अनेक जण आहेत. तुटपुंजा पगार हे यामागचं मुख्य कारण; पण अशाप्रकारे एकाचवेळी दोन जॉब करणं बेकायदा आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीवर कंपनी केस करू शकते; पण एखादी कंपनी आपणहून तुम्हाला दोन ठिकाणी काम करण्याची मुभा देत असेल तर? भारतातल्या एका नामांकित आयटी कंपनीने अशा प्रकारची सवलत कर्मचर्‍यांना देऊ केलीय. याबाबतची माहिती देणारं वृत्त ‘टीव्ही 9 हिंदी’ने दिलंय.

इन्फोसिस ही भारतातली आयटी क्षेत्रातली नामांकित कंपनी आहे. या कंपनीने आता एकाच वेळी दोन जॉब करण्याची मुभा कर्मचार्‍यांना दिलीय. अर्थात, यासाठी कर्मचार्‍यांना काही नियमही पाळावे लागतील. दुसरा जॉब करण्यासाठी सर्वप्रथम त्या कर्मचाऱ्यांना मॅनेजरची परवानगी घेणं आवश्यक आहे. याशिवाय आणखी दोन अटी कंपनीने घातल्यात. एक म्हणजे कर्मचारी केवळ गिग जॉब्ज करू शकतील. दुसरी अट अशी की कर्मचारी जे काम करतील, त्याचा इन्फोसिसच्या क्लायंटशी कुठलाही संबंध असणार नाही. दोन्ही कंपन्या भिन्न क्षेत्रातल्या असाव्यात. एकमेकांशी कुठलेच स्पर्धात्मक संबंध असता कामा नये.

शाहरुख खानच्या बर्थडेला डबल ट्रीट; DDLJ पुन्हा होणार रिलीज, येणार पठाणचा टीजर

बाॕलिवुड किंग म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खानच्या चाहत्यांना त्याचा वाढदिवस म्हणजे एक मेजवानीच असते. येत्या 2 नोव्हेंबरला शाहरुख खान आपला 57 वा वाढदिवस साजरा करणार आहे. शाहरुख खानचे चाहते यावेळी सर्वात जास्त कशाची वाट पाहत आहेत, तर ते म्हणजे त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाचा टीजर. याआधी ‘पठाण’ चित्रपटाचा टीजर दिवाळीच्या मुहूर्तावर येणार असल्याची बातमी आली होती पण तसे झाले नाही. आता चाहत्यांमध्ये अशी चर्चा आहे की 2 नोव्हेंबर म्हणजेच शाहरुखच्या वाढदिवसाला चित्रपटाचा टीजर रिलीज होणार आहे. अशातच, काही ट्रेड अनॅलिस्ट आणि इंडस्ट्रीशी संबंधित लोकही शाहरुखच्या वाढदिवशी प्रेक्षकांना रिटर्न गिफ्ट मिळणार असल्याचा इशारा देत आहेत.

‘शिंदे आणि सामंत आधी मंत्री होते, निदान बोलताना…’ सुप्रिया सुळेंनी पुराव्यासह फटकारलं

 ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत हे दोघेही गेली सात वर्षे मंत्री राहिले आहेत. त्यामुळे किमान या दोघांनी तरी असे बेजाबदार आरोप करू नये, असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातून उद्योग बाहेर गेल्याच्या मुद्यावर सणसणीत टोला लगावला.’उदय सामंत यांनी काल 10 नवे उद्योग महाराष्ट्रात आल्याचा दावा केला होता. पण सर्व उद्योग महाविकास आघाडी सरकारच्याच काळात महाराष्ट्रात आल्याचं सुप्रिया सुळे यांनी पुराव्यासह दाखवून दिलंय. त्यासंबंधीची यादीच सुप्रिया सुळे यांनी यावेळी माध्यमांसमोर वाचून दाखवली. तसंच मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे दोघेही गेली सात वर्षे मंत्री राहिले आहेत. त्यामुळे किमान या दोघांनी तरी असे बेजबाबदार आरोप करू नये, अशी टीकाही सुळेंनी केली.

ज्येष्ठ संघ प्रचारक चंद्रशेखर भंडारी यांचं निधन

ज्येष्ठ संघ प्रचारक, माजी प्रांत प्रचारप्रमुख कर्नाटक, अखिल भारतीय साहित्य परिषदेचे माजी राज्य संघटन सचिव, व्हीएसके कर्नाटकचे संस्थापक विश्वस्त, लेखक, कवी चंद्रशेखर भंडारी (87 वर्षे) यांचे आज निधन झाले.

महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेल्या ‘टाटा-एअरबस २९५’ प्रकल्पाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते टाटा-एअरबस सी-२९५ प्लांटचं भुमीपूजन करण्यात आलं आहे. गुजरातमधील बडोदा येथे ही भूमिपूजन करण्यात आलं. ‘एअरबस- टाटा’ यांचा हवाई दलासाठी विमाननिर्मितीचा सुमारे २२ हजार कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर राज्यात सध्या वाद निर्माण झाला आहे. हा प्रकल्प नागपूरमधील मिहानमध्ये सुरू व्हावा, हा शिंदे-फडणवीस सरकारचा प्रयत्न असफल ठरला.भुमीपूजनावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी लवकरच भारतात ‘मेड इन इंडिया’ प्रवासी विमानं दिसतील असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले “बडोदा येथे उत्पादित होणारी ही विमानं फक्त लष्करालाच सामर्थ्य देणार नाहीत, तर विमान निर्मितीची एक नवी परिसंस्था विकसित करेल. भारतात लवकरच ‘मेड इन इंडिया’ टॅग असणारी विमानं दिसतील,” असं मोदी म्हणाले आहेत.

जम्मू काश्मीरातील जलविद्युत प्रकल्पात दरड कोसळली; चौघांचा मृत्यू, सहाजण जखमी

जम्मू काश्मीरच्या किश्तवार जिल्ह्यामध्ये दरड कोसळल्यानं झालेल्या अपघातात चारजणांचा मृत्यू झाला आहे. ‘रॅटल’ जलविद्युत प्रकल्पात ही दूर्घटना घडली आहे. या घटनेत सहा लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत.“जलविदयुत प्रकल्पातील बचावकार्य पूर्ण झालं आहे. या परिसरात चार जणांचे मृतदेह सापडले आहेत. सहा जखमी लोकांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश आलं आहे”, अशी माहिती किश्तवारचे उपायुक्त देवांश यादव यांनी दिली आहे. दरम्यान, बचावकार्यासाठी पाठवण्यात आलेले सहा जणांचे पथक ढिगाऱ्याखाली अडकले होते, अशी माहिती केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र शर्मा यांनी दिली आहे.

“माझ्या बोलण्याचं भांडवल करु नका…” महेश मांजरेकरांनी ठणकावले

बिग बॉस मराठी हा कार्यक्रम कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदा चौथ्या पर्वात बिग बॉसची चावडी ही प्रत्येकाचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. प्रत्येक आठवड्यातील ही चावडी खास ठरत असते. मात्र या आठवड्यातील चावडी ही फारच गाजणारी ठरल्याचे पाहायला मिळत आहे. याचे अनेक प्रोमो समोर आले आहे. यंदाच्या आठवड्यातील चावडीवर महेश मांजरेकरांनी किरण माने यांना खडे बोल सुनावले. त्याबरोबरच त्यांनी यशश्री मसूरकरचीही चांगलीच शाळा घेतली.बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी आठवडाभर खेळलेले टास्क, त्यावेळी केलेली गॉसिप्स, त्यांची वर्तवणूक हे पाहून महेश मांजरेकर चावडीवर त्यांना सुनावताना दिसतात. स्पर्धकांनी खेळलेल्या चुकीच्या खेळाबद्दल ते खरपूस समाचार घेतानाही ते पाहायला मिळतात. यंदा बिग बॉसच्या चावडीवर किरण मानेंपाठोपाठ यशश्रीला चांगलेच सुनावले.

पाकिस्तानचा नेदरलॅंड्सवर ६ गडी राखून विजय, शादाब-रिझवानची चमकदार कामगिरी

टी-२० विश्वचषक २०२२ मधील दुसऱ्या गटातील पाकिस्तान आणि नेदरलॅंड्स संघात सामना खेळला गेला. पर्थ येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलॅंड्सवर ६ गडी राखून विजय मिळवला. नेदरलॅंड्स संघाने पाकिस्तान संघाला ९२ धावांचे दिले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तानने १३.५ षटकांत ४ गडी गमावून हे लक्ष्य पूर्ण केले.पाकिस्तान संघाने ९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बाबर आझमच्या रुपाने आपला पहिला गडी गमावला. बाबर आझम फक्त चार धावांवर बाद झाला. त्याचबरोबर फखर जमान देखील २० (१६) धावा करुन तंबूत परतला. पाकिस्तानकडून सर्वाधिक धावांचे योगदान मोहम्मद रिझवानने दिले. त्याने ३९ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने ४९ धावा केल्या. त्याचे अर्धशतक फक्त एका धावेने हुकले. नेदरलॅंड्स संघाकडून ब्रँडन ग्लोव्हरने २ आणि पॉल व्हॅन मीकरेनने १ बळी घेतले.

लवकरच Royal Enfield च्या तीन नव्या बाइक्स येणार मार्केटमध्ये

अनेकांना स्वतःची कार असावी असं वाटतं; पण काहीजणांना बाइकचं प्रचंड वेड असतं. खासकरून, तरुणांमध्ये बाइकचं वेड अधिक असतं. काही जण बाइकला जीवापाड जपतात. अशा बाइकप्रेमींसाठी रॉयल एनफिल्ड कंपनी नव्या बाइक्स मार्केटमध्ये आणत आहे. बाइकप्रेमींसाठी ही गोष्ट नक्कीच महत्त्वाची असणार यात नवल नाही. त्याबद्दल अधिक जाणून घेऊ या. याबद्दलची माहिती देणारं वृत्त ‘इंडिया न्यूज’ने दिलं आहे.रॉयल एनफिल्ड ही बाइक्स बनवणारी भारतीय मल्टिनॅशनल कंपनी आहे. 1955 साली या कंपनीची स्थापना झाली. या कंपनीच्या बाइक्स आजही सर्वांना भुरळ घालतात. या कंपनीच्या विविध बाइक्स मार्केटमध्ये आहेत. रॉयल एनफिल्डकडून आता तीन नव्या बाइक्स ग्राहकांसाठी येणार असल्याचं कळतंय. या बाइक्सची क्षमता 350 सीसी, 450 सीसी आणि 650 सीसी असणार आहे. यातल्या काही बाइक्स टेस्टिंगदरम्यान पाहण्यात आल्या होत्या. कंपनी लवकरच या बाइक्स मार्केटमध्ये आणणार आहे. 

आमदार कैलास पाटील यांची प्रकृती ढासळली? रुग्णालयात केलं दाखल, चाचण्या सुरू

राज्य शासनाकडील थकीत 1208 कोटी रुपयांचे अनुदान मिळावे यासाठी मागच्या सहा दिवसांपासून ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी बेमुदत आमरण उपोषण आंदोलन पुकारले आहे. दरम्यान आज त्यांची प्रकृती ढासळल्याचं समोर आलं आहे. उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

उस्मानाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयात त्यांना अॕडमिट करून घेतल्याची माहिती समोर आली आहे. आजचा दिवस त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या 7 दिवसांपासून कैलास पाटील आमरण उपोषण करीत आहेत.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.