पालकत्व ही जबाबदारीनं पेलण्याची गोष्ट असते. मुलांशी योग्य वेळी योग्य संवाद साधणं, कधी कठोर वागून, तर कधी प्रेमानं समजावून मुलांना वाढवणं ही कसोटी असते. यात कधी काही पालक नरमाईची भूमिका घेतात. काही पालक शिस्त लावण्यासाठी विनाकारण कठोर वागतात. यामुळे मुलं मोठी होताना त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. पालकत्व निभावताना मुलं कमकुवत मनाची होऊ नयेत, त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ नये, यासाठी पालकांनी काही गोष्टी लक्षपूर्वक केल्या पाहिजेत. त्या विषयी टाइम्स ऑफ इंडियानं वृत्त दिलं आहे.
स्वतःची लढाई स्वतः लढू द्या
मुलांना सुरक्षित वातावरण देताना आपण मुलांना कमकुवत तर करत नाही ना, याकडे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. काही पालक मुलांच्या निर्णयांमध्ये नेहमी ढवळाढवळ करतात. मुलं लहान असल्यानं त्यांना मार्गदर्शन आवश्यक असतं. त्यांनी चुकीचा निर्णय घेऊ नये म्हणून त्यांना काही सांगितलं तर उत्तमच, पण सगळ्याच बाबतीत पालकांनी बोलणं योग्य नसतं. मुलांना त्यांचे निर्णय स्वतः घेऊ द्या. एखाद्यावेळी निर्णय चुकेल, पण त्यातून त्यांना धडा मिळेल.मूल शिकेल. चुकांमधूनच माणूस शिकत असतो. यामुळे मुलांमध्ये धीटपणा येईल. स्वतः निर्णय घेण्याची क्षमता येईल.
मुलांना जबाबदारी घेणारं करा
प्रत्येक मूल वेगळं असतं; पण बरेच पालक आपल्या मुलांची इतरांशी तुलना करतात. इतरांच्या तुलनेत आपलं मूल आव्हानांचा सामना करायला कमी पडत असल्याची भावना असेल, तर सतत मुलांना टोचून बोलतात. आपलं मूल जबाबदारी पेलण्यासाठी सक्षम नाही असं ज्या पालकांना वाटतं, ते पालक मुलांना ओळखण्यात चूक करतात. मुलांना त्यांचं भावविश्व त्यांच्या पद्धतीनं उलगडू दिलं पाहिजे. सुरुवातीच्या वर्षांमध्ये मुलांनी त्यांचे गुण ओळखले, तर बाहेरचं जगात आल्यावर त्यांना एकदम धक्का बसणार नाही. आपण केलेल्या गोष्टींची जबाबदारी घेताना मुलांना वाईट किंवा नकोसं वाटणार नाही, अशा पद्धतीनं मुलांना घडवलं पाहिजे. घरातल्या छोट्याछोट्या कांमांमुळेही मुलांचा आत्मविश्वास वाढतो. कचरा उचलून टाकणं, कपडे धुवून वाळत टाकणं अशी कामंही मुलांना आनंदी, समाधानी बनवतात.
भावनिकदृष्ट्या मुलांना खंबीर करा
मूल मोठं होताना सगळ्यात अवघड गोष्ट असते, ती म्हणजे मुलांचा भावनिक विकास. अगदी लहान वयात मुलं पालकांवर अवलंबून असतात; पण थोडी मोठी झाल्यावर त्यांना स्वतःचे पंख विस्तारायचे असतात. याच वयात मुलांना भावनिकदृष्ट्या खंबीर करण्याची गरज असते. या काळात विविध भावनिक परिस्थितींमधून ती जात असतात. त्यावेळी स्वतःच्या भावनांशी प्रामाणिक राहण्याबाबत, त्यांच्या भावना योग्यप्रकारे व्यक्त करण्याबाबत मुलांना शिकवलं गेलं पाहिजे. सकारात्मक विचार पद्धतीनं, कृतीद्वारे यातून मार्ग काढता येऊ शकतो. मुलांना त्यांच्यातील दोष शोधण्यासाठी मदत करा, म्हणजे मुलं त्यावर मात करून भविष्यात चांगली व्यक्ती होतील.
शिक्षा हे उत्तर नसतं
भविष्यात चांगली व्यक्ती होण्यासाठी मुलांना शिस्त लावावी लागते. त्यासाठी काही पालक शिक्षेचा पर्याय निवडतात. मात्र शिक्षा केल्यानं मुलांच्या मनावर उलट परिणाम होऊ शकतो. मुलं बंडखोर स्वभावाची होऊ शकतात. मुलांना तुमचं म्हणणं प्रेमानं समजावून सांगा. त्यासाठी पालकांनी सहनशक्ती ठेवणं गरजेचं आहे. यामुळे मुलांना एखाद्या परिस्थितीत मार्ग शोधणं सोपं होईल. भविष्यात याचा त्यांना निश्चित फायदा होईल.
कौटुंबिक अक्षमतेचं कारण देऊ नका
मुलांच्या हट्टांवर तोडगा म्हणून आपली कुवत नाही, इतरांसारखे पैसे आपल्याला मिळत नाहीत. आपल्या कुटुंबात अडचणी आहेत असं मुलांना सांगितलं जातं. ते अतिशय चुकीचं आहे. यामुळे मुलांमध्ये एखाद्या गोष्टीला बळी पडल्याची भावना विकसित होते. यामुळे मुलं भविष्यात संधी मिळाली, तरी त्यात कारणं शोधतात. इतरांपेक्षा कमनशिबी असल्यानं मुलं स्वतःला असहाय्य समजू लागतात. मुलांना स्वतःची कीव वाटू नये, यासाठी मुलांना फुटबॉलसारखा एखादा खेळ शिकवा. इतर मुलांमध्ये मिसळल्यानं त्यांच्यातील न्यूनगंड कमी होईल.
मुलांच्या पाठीशी उभं राहायचं सोडून बरेचदा पालक त्यांचं मनोबल खच्ची करतात. मुलांवर टीका केल्यामुळे त्यांचं त्या कामातलं किंवा खेळातलं स्वारस्य कमी होणार नाही ना हे पाहिलं पाहिजे. बालमनावर झालेल्या जखमा पुढच्या आयुष्यावर ओरखडे तर ओढणार नाहीत ना, याची काळजी प्रत्येक पालकानं घेतली पाहिजे.