भाजपचा तीन राज्यात अभूतपूर्व विजय, लोकसभेला आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार, देवेंद्र फडणवीसांना फुल्ल कॉन्फिडन्स
भाजपनं राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये सत्ता मिळवली आहे. या विजयानंतर भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. भाजपच्या नेत्यांनी या विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी या निवडणुकीतील विजयासंदर्भात संवाद साधला. भाजपला तीन राज्यांमध्ये अभूतपूर्व यश मिळालेलं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.नरेंद्र मोदींनी केंद्र सरकार गरिबांसाठी काम करत आहे हे बिंबवलं, त्याचा हा विजय आहे. या सर्व राज्यांमधील जनतेचे आभार मानतो. या राज्यातील विजयाचं श्रेय नरेंद्र मोदी यांचं आहे. जे.पी. नड्डा आणि मास्टर स्ट्रॅटेजिस्ट अमित शाह यांच्यासह राज्यातील टीम आणि राष्ट्रीय टीम यांचं अभिनंदन करतो,असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राहुल गांधींनी स्वीकारला तीन राज्यांमधला पराभव, अपयशानंतर केलेली पोस्ट चर्चेत
“मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानचा जनादेश आम्ही नम्रतेने स्वीकारत आहोत. विचारांची लढाई सुरूच राहील”, असं राहुल गांधींनी अपयश स्वीकारत म्हटलं आहे.
तर, “तेलंगणाच्या लोकांचे मनापासून आभार. लोकांचं तेलंगणा बनवण्याचा आमचा प्रयत्न असाच सुरू राहील. सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्या मेहनत आणि समर्थनासाठी मनपूर्वक आभार”, असं राहुल गांधी म्हणाले.
“देशात फक्त चारच जाती महत्त्वाच्या”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विजयानंतर भाजपा मुख्यालयातील भाषणादरम्यान विधान!
“आजचा विजय ऐतिहासिक आहे. अभूतपूर्व आहे. आज सबका साथ, सबका विकासची भावना जिंकली आहे. विकसित भारताच्या आवाहनाचा विजय झाला आहे. भारताच्या विकासासाठी राज्यांचा विकास या विचाराचा विजय झाला आहे. प्रामाणिकपणा, पारदर्शकपणा व सुशासनाचा विजय झाला आहे”, असं मोदी यावेळी म्हणाले. “तेलंगणातही भाजपाला समर्थन वाढत आहे”, असंही मोदींनी यावेळी नमूद केलं.दरम्यान, यावेळी बोलताना मोदींनी विरोधकांवर जातीपातींचं राजकारण केल्याचा आरोप केला. “या निवडणुकीत देशाला जातीजातींमध्ये वाटण्याचा खूप प्रयत्न झाला. पण मी सातत्याने म्हणत होतो की माझ्यासाठी देशात चारच जाती सर्वात मोठ्या आहेत. जेव्हा मी या चार जातींबाबत बोलतो, तेव्हा आपली स्त्रीशक्ती, युवा शक्ती, आपले शेतकरी आणि आपले गरीब कुटुंब या चार जातींना सशक्त केल्यामुळेच फक्त देश सशक्त होऊ शकतो”, असं मोदी यावेळी म्हणाले.
तेलंगणाचे पोलिस महासंचालक निलंबित; काँग्रेस उमेदवार रेवंत रेड्डी यांची भेट भोवली
तेलंगणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाल्यानंतर सकाळपासून काँग्रेस पक्षाने विजयी घोडदौड सुरू केली होती. दुपारी १२ वाजेपर्यंत काँग्रेस बहुमत मिळविणार असे चित्र स्पष्ट झाले, तसे काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांनी जल्लोष साजरा केला. यात पोलिस अधिकारीही मागे नव्हते. दुपारी राज्याचे पोलिस महासंचालक अंजनी कुमार यांनी रेवंत रेड्डी यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन व्यक्त केले. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांची ही कृती त्यांना चांगलीच महागात पडल्याचे दिसत आहे. निवडणूक आयोगाने सदर प्रकारावर नाराजी व्यक्त केली असून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी अंजनी कुमार यांचे निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत. एएनआय वृत्तसंस्थेने सदर वृत्त एक्स या सोशल मीडिया साईटवर दिले आहे.
२०२३ गिलसाठी ‘शुभ’वर्ष! ‘स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर’च्या पुरस्काराने केले सन्मानित
भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलने ‘स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर’चा किताब पटकावला. इंडियन बिझनेस लीडर अवॉर्ड सोहळ्यात त्याला हा सन्मान प्रदान करण्यात आला. शुबमन गिल याला हा पुरस्कार केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दिला. क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे शुबमन गिलला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शुबमन गिल हा तिन्ही फॉरमॅटमध्ये २०२३ या वर्षात, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. शुबमनच्या नावावर वन डे फॉरमॅटमध्ये एका वर्षात आतापर्यंत सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमाची नोंदही करण्यात आली आहे.
अर्थव्यवस्थेचा ‘मॅक्रो’ विस्तार, जीएसटीतील उत्पन्न मासिक १.६८ लाख कोटींवर
नोव्हेंबर महिन्याच्या सरकारी तिजोरीत जमा झालेल्या जीएसटीने १.६८ लाख कोटी हा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या देशभरातील सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेतील झालेल्या वाढीचे हे निर्देशकच मानावे लागेल.ऑक्टोबर महिन्यात हाच आकडा १.७२ लाख कोटी एवढा होता, त्या तुलनेत किंचित घट झाली असली तरीही सरासरी १.६६ लाख कोटी हे जीएसटीचे उत्पन्न कायम राहिले आहे. एप्रिल महिन्यामध्ये १.८७ लाख कोटी या सर्वोच्च पातळीवर मासिक जीएसटी कलेक्शन नोंदवले गेले होते. यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यातील करवसुलीच्या आकडेवारीचा विचार करता मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत १५ टक्के वाढ झालेली दिसली. गेल्या पाच वर्षात नोंदवली गेलेली ही सर्वाधिक मासिक वाढ आहे. सणासुदीच्या काळातील वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी घाऊक व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणावर उलाढाल करण्यात येते. याचाच परिणाम जीएसटीच्या वाढीमध्ये दिसून आला आहे. देशभरामध्ये मालवाहतूक किती वेगवान दराने सुरू आहे याचा अंदाज ‘ई-वे बिल्स’ वरून येतो.
SD Social Media
9850603590