“भाजपाबरोबर जाण्यासाठी हसन मुश्रीफ माझ्या घरी पाच तास बसले होते, पण…”, अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट
अनिल देशमुख माझ्याबरोबर सर्व बैठकांना उपस्थित होते. मात्र, मंत्रीपद न मिळाल्याने ते आमच्याबरोबर आले नाहीत, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी ( १ डिसेंबर ) केला होता. याला माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “भाजपाबरोबर जाण्यासाठी हसन मुश्रीफ माझ्या घरी पाच तास बसले होते. पण, मला त्रास देणाऱ्यांबरोबर मी कुठल्याही परिस्थितीत जाणार नव्हतो,” असं देशमुखांनी स्पष्ट केलं.
इस्रायल-हमास युद्धाचा अमेरिकेत निषेध: पॅलेस्टाईन ध्वज गुंडाळून महिलेने घेतले पेटवून
इस्रायल आणि गाझादरम्यान २४ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या शस्त्रविरामाला आणखी मुदतवाढ मिळण्याचे प्रयत्न फसल्यानंतर पुन्हा युद्धाला सुरुवात झाली. इस्रायलने शुक्रवारपासून पुन्हा गाझा पट्टीवर हवाई हल्ले सुरू केले. शस्त्रविराम संपल्याबद्दल इस्रायल आणि हमास या दोघांनीही एकमेकांवर दोषारोप केला. दरम्यान, इस्रायल-हमास यांच्यातील युद्धाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर अमेरिकेत याचा निषेध केल गेला आहे. पॅलेस्टिनी ध्वज गुंडाळून एका महिला आंदोलकाने शुक्रवारी दुपारी अमेरिकेतील अटलांटा येथील इस्रायली वाणिज्य दूतावासाबाहेर स्वत:ला पेटवून घेतले. यामध्ये महिला गंभीर जखमी असून राजकीय निषेधाचे टोकाचे कृत्य असल्याची प्रतिक्रिया येथील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मथुरा कृष्ण जन्मभूमीचा मुद्दा यूपीच्या राजकारणात बदल घडवू शकतो? राम मंदिरानंतरचा अजेंडा काय?
उत्तर प्रदेशमधील अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास येत असताना आता मथुरेतील मंदिराच्या निर्माणावरून राजकारण तापू लागले आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी काही दिवसांपूर्वी मथुरेतील कृष्ण जन्मभूमीच्या वादावरून समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर टीका केली. लोकसभा निवडणुकीच्या आधी राज्यात हा विषय आता तापण्याची शक्यता आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमच्या अजेंड्यावर हा विषय नसल्याचे भाजपाकडून सांगण्यात येत असले तरी पक्षाच्या काही नेत्यांच्या म्हणण्यानुसार, सार्वत्रिक निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांच्या लोकभावनांना अनुसरून कृष्ण जन्मभूमीवर मंदिर बांधण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात. हिंदू उजव्या विचारसरणीच्या समर्थकांसाठी मथुरा आणि वाराणसी येथील मंदिराबाबतचे वाद हे मोठ्या वैचारिक प्रकल्पाचा भाग आहेत. “अयोध्या तो बस झाँकी है, काशी, मुथरा बाकी है”, अशी घोषणा हिंदुत्ववाद्यांकडून दिली जायची, त्यातून अयोध्येनंतर या विषयांकडे लक्ष दिले जाईल असे दिसते.
देशातील प्रमुख क्षेत्रांचा ऑक्टोबरमध्ये १२.१ टक्क्यांनी विस्तार
नैसर्गिक वायू, पोलाद, कोळसा आदी क्षेत्रात वाढती मागणी राहिल्याने सरलेल्या ऑक्टोबरमध्ये देशाच्या प्रमुख आठ क्षेत्रांमध्ये १२.१ टक्के दराने वाढ नोंदली गेल्याचे गुरुवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीने स्पष्ट केले. आधीच्या सप्टेंबर महिन्यात प्रमुख क्षेत्रांनी ९.२ टक्के वाढ नोंदवली होती, तर गेल्यावर्षी म्हणजेच ऑक्टोबर २०२२ मध्ये प्रमुख क्षेत्रांनी केवळ ०.७ टक्के वाढ साधली होती.खते वगळता कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, इंधन शुद्धीकरण उत्पादने, पोलाद, सिमेंट आणि वीज या सात प्रमुख क्षेत्रांचा विस्तार झाला आहे. यापैकी कोळसा, पोलाद, सिमेंट आणि वीज उत्पादनात दोन अंकी वाढ नोंदवली गेली आहे. सिमेंटचे उत्पादन सप्टेंबरमधील ४.६ टक्क्यांवरून ऑक्टोबरमध्ये वार्षिक १७.१ टक्क्यांनी वाढले, तर वीज उत्पादनात सप्टेंबरमधील ९.९ टक्क्यांवरून वार्षिक २०.३ टक्के वाढ झाली. त्यापाठोपाठ कोळसा १८.४ टक्के आणि पोलाद उत्पादन ११ टक्क्यांनी विस्तारले आहे.
खोटी माहिती लोकशाहीला घातक; सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे प्रतिपादन
सध्या आपण डिजिटल युगात वावरत आहोत. डिजिटल युगाने ‘फ्री स्पीच’चा मार्ग मोकळा केला आहे. मात्र त्या माध्यमातून खोटय़ा माहिताचा वेगाने होणारा प्रसार लोकशाहीच्या मूल्यांसाठी घातक आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केले.नागरी अधिकाराचे संरक्षक म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध वकील व्ही.एम. चंद्रचूड यांच्या स्मरणार्थ ‘डिजिटल युगात नागरी स्वातंत्र्याचे रक्षण’ या विषयावर शुक्रवारी आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते.
बांगलादेशचा न्यूझीलंडला धक्का; सिल्हेट कसोटीत १५० धावांनी खळबळजनक विजय
काही दिवसांपूर्वी आटोपलेल्या वर्ल्डकप स्पर्धेत प्राथमिक फेरीत गाशा गुंडाळणाऱ्या बांगलादेशने त्याच स्पर्धेत सेमी फायनल गाठणाऱ्या न्यूझीलंडला सिल्हेट कसोटीत हरवण्याची किमया केली. चौथ्या डावात ६ विकेट्स पटकावणारा तैजुल इस्लाम विजयाचा शिल्पकार ठरला. कसोटीच्या पाचव्या आणि अंतिम दिवशी बांगलादेशला विजयासाठी ३ विकेट्सची आवश्यकता होती. गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत दीड तासात संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला.वर्ल्डकप संपल्यानंतर न्यूझीलंडचा संघ बांगलादेशच्या छोटेखानी दौऱ्यासाठी रवाना झाला. या दौऱ्यात दोन कसोटी सामने होणार आहेत. पहिल्याच कसोटीत बांगलादेशने न्यूझीलंडसारख्या अव्वल संघाला हरवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये महत्त्वपूर्ण गुणांची कमाई केली. बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान १८ कसोटी सामने झाले आहेत. बांगलादेशचा न्यूझीलंडविरुद्धचा हा दुसराच कसोटी विजय आहे. गेल्या वर्षी माऊंट मांघनाई या ठिकाणी झालेल्या कसोटीत बांगलादेशने न्यूझीलंडला नमवण्याची किमया केली होती.
‘पुष्पा २’ चं शूटिंग अचानक थांबवलं, अल्लू अर्जुनबाबत मोठी अपडेट
साऊथ सुपरस्टार आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता अल्लू अर्जुन सध्या हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये पुष्पा २ सिनेमाचं शूटिंग करत होता. त्याने शूटिंगचा बिहाइंड द सीन व्हिडिओही शेअर केला होता. हा सिनेमा २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे. पण त्याआधी अल्लू अर्जुनबाबत नवी अपडेट समोर आली आहे.पुष्पा २ सिनेमातील एका गाण्याचं शूटिंग सुरू होतं. याचदरम्यान अल्लू अर्जुनची तब्येत बिघडली आणि सिनेमाचं शूटिंग मध्येच थांबवण्यात आलं. या गाण्यात अल्लू अर्जुन एका महिलेच्या गेटअपमध्ये डान्स करत होता अशी माहिती आहे.
SD Socila Media
9850603590