100 कोटी रुपयांमध्ये राज्यसभा सीट तसंच राज्यपाल करण्याचं आश्वासन देणाऱ्या चौघांना सीबीआयने अटक केली आहे. या आरोपींना महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून अटक करण्यात आली आहे. सीबीआयच्या अटकेत असणाऱ्या तिघांची नावं कमलाकर प्रेमकुमार बांदगर, रवींद्र विठ्ठल नाईक, महेंद्र पाल अरोरा आहे. तसंच आणखी एका आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. हे चारही जण राज्यसभा सीट, राज्यपाल आणि अन्य पदांसाठी लोकांकडून पैसे घेत होते.
सीबीआयचे अधिकारी मागच्या काही आठवड्यांपासून फोन इंटरसेप्टरमधून कॉल ऐकत होते. मागच्या बऱ्याच दिवसांपासून त्यांची आरोपींवर नजर होती. डील फायनल होत होती, तेव्हाच सीबीआयने आरोपींना अटक केली.
सीबीआयने अटक केलेल्या आरोपींपैकी कमलाकर प्रेमकुमार बांदगर महाराष्ट्रातला आहे, तर रवींद्र विठ्ठल नाईक कर्नाटकचा, महेंद्र पाल अरोरा दिल्लीचा आहे. अभिषेक बुरा हा आरोपीही या डीलमध्ये सामील असल्याचा दावा सीबीआयने केला आहे.
महाराष्ट्रातही अशीच घटना
मागच्या आठवड्यात महाराष्ट्रातही अशीच घटना घडली होती. भाजपच्या आमदाराकडून कॅबिनेट मंत्री पदासाठी 100 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. फक्त एकच नाही तर आणखी तीन आमदारांनाही अशाप्रकारे फसवण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. यासाठी 17 जुलै रोजी आरोपींनी आमदारांना ओबेरॉय हॉटेलमध्ये भेटायला सुद्धा बोलावले होते.
मंत्रिमंडळात स्थान मिळवून देण्यासाठी या आरोपींनी 100 कोटी मागितले होते. यातील 20 टक्के रक्कम आता द्यावी लागणार होती त्यानंतर उरलेली रक्कम ही शपथविधी सोहळा पार पडल्यावर द्यायची होती, असं या आरोपींनी सांगितलं होतं. या आरोपींनी सोमवारी आमदारांना मुंबईतील नरिमन पॉइंटवर भेटण्यासाठी बोलावले होते. त्यानंतर आमदारांनी पैसे घेण्यासाठी हॉटेल ओबेरॉयमध्ये नेले होते.
याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर, पोलिसांनी सापळा रचून अँटी एक्स्टॉर्शन सेलने रोपीला पकडले. या आरोपींची चौकशी केली असता आणखी 3 जणांची नावं समोर आली. या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी एका आमदाराच्या खासगी सचिवाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. रियाज अल्लाबक्ष शेख (राहणार कोल्हापूर ) योगेश मधुकर कुलकर्णी (राहणार पाचपाखाडी, ठाणे) सागर विकास संगवई (राहणार ठाणे ) आणि जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी (राहणार नागपाडा, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. या आरोपींनी आणखी किती आमदारांना अशा प्रकार फसवले आहे, याचा तपास पोलीस करत आहे.