महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून राजीनाम्यावर अखेर मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागच्या कित्येक महिन्यांपासून महाराष्ट्राचे मावळते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. दरम्यान राज्यपालांवर विरोधकांनी टीकाही केली होती.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारला आहे. झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय 13 राज्यांचे राज्यपालही बदलण्यात आले आहेत.
रिअल मॅड्रिडने पाचव्यांदा फिफा क्लब वर्ल्ड कपवर कोरलं नाव
रिअल मॅड्रिडने मोरोक्को येथे शनिवारी अल हिलाल संघावर 5-3 असा शानदार विजय मिळवून पाचव्यांदा फिफा क्लब वर्ल्ड कप जिंकला आहे. व्हिनिसियस ज्युनियर आणि फेडे व्हॅल्व्हर्डे यांनी प्रत्येकी दोन वेळा, तर करीम बेन्झेमाने देखील दुखापतीतून परतताना गोल करत प्रतिस्पर्ध्यांवर शानदार विजय मिळवला. जगप्रसिद्ध फुटबॉल स्पर्धेच्या ट्रॉफीवर पाचव्यांदा नाव कोरण्यात यशस्वी झाल्याने रिअल मॅड्रिड संघावर सर्वस्थरावून कौतुकाचा वर्षाव होत आहे.गेल्या हंगामात चॅम्पियन्स लीग विजेते म्हणून पात्र ठरलेल्या कार्लो अँसेलोटीच्या बाजूने त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना हाताळण्यासाठी खूप आक्रमक गुणवत्ता होती. रबातच्या प्रिन्स मौले अब्देल्लाह स्टेडियमवर मॅड्रिडने जबरदस्त विजय मिळवला. मॅड्रिडने 1960, 1998 आणि 2002 मध्ये तीन आंतरखंडीय कप जिंकले आहेत. यात युरोपियन आणि दक्षिण अमेरिकन चॅम्पियन्समधील सामन्याचाही समावेश असून हा 2005 मध्ये क्लब वर्ल्ड कपमध्ये विलीन करण्यात आला होता.
ठाण्यात राष्ट्रवादीला दुसरा मोठा धक्का; बड्या नेत्याचा शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश
ठाण्यात राष्ट्रवादीला गळती सुरूच आहे. शिंदे गटापाठोपाठ आता भाजपने देखील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दशरथ तिवरे यांनी शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये दशरथ तिवरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे ठाण्यातील राष्ट्रवादीचे चार माजी नगरसेवक हे आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या पुढाकराने दशरथ तिवरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती समोर येत आहे. दशरथ तिवरे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात. मात्र त्यांनीच आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानं हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष, पंचायत समिती सदस्य, टीडीसी बँक अध्यक्ष, जिल्हापरिषद सदस्य , जिल्हा परिषद कृषी सभापती, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, मुंबई बँकेचे संचालक, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष, आणि आता महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवण्यात आल्या होत्या.
कंपनीच्या बिझनेस ट्रिपवर गेला तुर्कीला, भूकंपानंतर बेपत्ता भारतीयाचा सापडला मृतदेह
तुर्की आणि सीरियातील भूकंपबळींची संख्या २० हजारांच्या वर पोहोचली आहे. आता या भूकंपात भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. भारतीय दुतावासाने शनिवारी याबाबत माहिती देताना सांगितलं की, विजय कुमार गौंड यांचा मृतदेह तुर्कीमध्ये एका फोर स्टार हॉटेलच्या उद्ध्वस्त इमारतीत आढळला होता. त्याच्या कुटुंबियांनी एका टॅटूच्या आधारे त्याची ओळख पटवली.
उत्तराखंडच्या कोटद्वार इथं राहणारा विजय हा बंगळुरुतील ऑक्सी प्लांट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत काम करत होता. तुर्कीत जेव्हा भूकंप आला तेव्हा तो बिझनेस ट्रिपवर होता. तुर्कीतील भारतीय दुतावासाने म्हटलं की, आम्हाला ही माहिती देताना दु:ख होतंय की, भूकंपानंतर बेपत्ता झालेला भारतीय नागरिक विजय कुमारचा मृतदेह आढळून आला आहे. मलत्यामधील एका हॉटेलच्या उद्ध्वस्त ढिगाऱ्यात आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली आहे. तो हॉटेलमध्ये एका बिझनेस ट्रिपवर आला होता.
कोश्यारींचा राजीनामा म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण आता नव्या राज्यपालांनी.., संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया
काही दिवसांपूर्वीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. अखेर त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्या जागी रमेश बैस हे आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. भगतसिंह कोश्यारी हे कायमच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चे राहिले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केल्यानंतर राज्यभरातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली होती. संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले यांनी देखील राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी कोली होती.
राज्यात १२ नवीन जिल्हा रुग्णालये उभारण्याची आरोग्य विभागाची महत्त्वाकांक्षी योजना!
कर्करोग व मूत्रपिंड विकारासह वेगवेगळ्या आजारांचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन अनेक नवीन योजना राबविण्यावर भर देतानाच आरोग्यसेवेचा पद्धतशीरपणे विस्तार करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घेतला आहे. यासाठी राज्यात नवीन १२ जिल्हा रुग्णालये स्थापन करण्याची महत्त्वाकांक्षी योजना तयार करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या उच्चपदस्थांनी सांगितले.आजघडीला राज्यात आरोग्य विभागाच्या अखत्यारित कागदावर २३ जिल्हा रुग्णालये आहेत. तथापि गेल्या काही वर्षात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी आरोग्य विभागाच्या तब्बल १८ जिल्हा रुग्णालयांचे वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरण करण्यात आल्याने केवळ पाचच जिल्हा रुग्णालये आजघडीला आरोग्य विभागाच्या अखत्यारित आहेत.
“मोदींसमोर केवळ राहुल गांधींच आहेत हे देशाने मान्य केलं आहे आणि केवळ काँग्रेस…” अशोक गहलोत यांचं विधान!
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांची स्तुती केली आहे. त्यांनी म्हटले की देशाने हे मान्य केल आहे की, मोदींसमोर केवळ राहुल गांधीच आहेत. आमचे सर्व नेते (अन्य पक्षाचे) माझ्या मनात त्या सर्वांसाठी आदर आहे, मात्र वस्तुस्थिती ही आहे की काँग्रेसच एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्याच्याकडे राहुल गांधींच्या रुपात एक एक अद्भुत नेता आहे. भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी हे एक जननायक म्हणून सर्वांसमोर आले आहेत.
अशोक गहलोत म्हणाले की, काँग्रेस एक अखिल भारतीय आणि खरी राष्ट्रीय पार्टी आहे. ती प्रत्येक गावात आहे. भाजपा आता सत्तेत आहे, मात्र एक काळ होता जेव्हा त्यांच्याकडे संसदेत केवळ दोन जागा होत्या. म्हणून जागांच्या संख्येवर नाही गेलं पाहिजे, जेव्हा जनता ठरवते तेव्हा काहीही होऊ शकतं.
रामजन्मभूमी, नोटबंदीचा निकाल देणारे माजी न्यायाधीश अब्दुल नजीर यांची आंध्रप्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अब्दुल नजीर यांना आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्त करण्यात आले आहे. न्यायाधीश नजीर हे ४ जानेवारी २०२३ रोजी निवृत्त झाले होते. निवृत्त होत असताना आपल्या भाषणात नजीर यांनी संस्कृतचा प्रसिद्ध श्लोक “धर्मो रक्षति रक्षितः” म्हटला होता. या श्लोकाचा अर्थ सांगताना ते म्हणाले, “या जगात सर्व काही धर्मावर आधारीत आहे. जो धर्माचा नाश करण्याचा प्रयत्न करतो, धर्म त्याचा नाश करतो. जो धर्माची रक्षा करतो, धर्म त्यांची रक्षा करतो.” राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यपाल आणि उपराज्यपाल यांची बदली केली आहे. यामध्ये नवनियुक्त न्यायाधीशांचीही घोषणा करण्यात आली. ज्यामध्ये न्यायाधीश अब्दुल नजीर यांचा समावेश आहे.
१२८ तासानंतर ढिगाऱ्याखालून नवजात बाळ सुखरुप बाहेर
टर्की आणि सीरियामध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे मोठा प्रलय माजला. दोन्ही देशांमध्ये मिळून २८ हजार लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा आकडा आणखी वाढू शकतो, असेही सांगण्यात येत आहे. दोन्ही देशामध्ये बचावकार्य सुरु आहे. बचावकार्य करणाऱ्या पथकाने मृत्यूचा आकडा आणखी वाढू शकतो, अशी शक्यता वर्तविल्यामुळे भूकंपाचा विनाश काही थांबताना दिसत नाही. मात्र या दरम्यान संपूर्ण जगाला अचंबित करणारी एक घटना घडली. टर्कीच्या हेते प्रॉविन्स येथे एका घराच्या ढिगाऱ्याखालून एक नवजात बाळाला सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. १२८ तासांच्या अथक प्रयत्नानंतर या बाळाला जिवंत बाहेर काढण्यात आले. या बाळाचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सोशल मीडियावर लोक या घटनेला चमत्कार असल्याचे म्हणत आहेत.
हार्दिक पांड्या दुसऱ्यांदा चढणार बोहोल्यावर; राजस्थानमध्ये करणार शाही विवाह
हार्दिक पांड्या कोणा दुसऱ्या सोबत नाही तर त्याचीच पत्नी नताशा स्टॅंकोव्हिक सोबत दुसऱ्यांदा विवाह करणार आहे. तीन वर्षांपूर्वी हार्दिक पांड्या याने त्याची गर्लफ्रेंड नताशा सोबत कोर्ट मॅरेज केले. नताशा आणि हार्दिकच लग्न होण्यापूर्वीच नताशा गरोदर होती. त्यानंतर तिने अगस्त्य या गोंडस मुलाला जन्म दिला.हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा हे अनेकांसाठी कपल गोल्स आहेत. परंतु नताशाच्या गरोदरपणामुळे या दोघांचे शाही विवाह करण्याचे स्वप्न अधुरे राहिले होते. परंतु यंदा व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी हे दोघे विवाह करणार असल्याची माहिती मिळत आहे.
ऑस्ट्रेलिया अन् इंग्लंडची विजयी सलामी, आज भारत-पाक भिडणार
महिला टी20 वर्ल्ड कपची सुरुवात दक्षिण आफ्रिकेत झाली आहे. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात न्यूझीलंडवर एकतर्फी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने 97 धावांनी विजय मिळवत टी20 मध्ये न्यूझीलंडवर सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. एलिसा हिलीने केलेल्या 55 धावा या तिच्या 2022 च्या टी20 वर्ल्ड कप फायनलनंतर केलेल्या सर्वाधिक धावा ठरल्या. तर कर्णधार मेन लेनिंगने 41 आणि एलिस पेरीने 40 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 173 धावा केल्या होत्या.ऑस्ट्रेलियानं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला पहिल्याच चेंडूवर धक्का बसला. सूझी बेट्स बाद झाल्यानंतर सुरु झालेली पडझड संघाचा डाव 76 धावांवर संपुष्टात आल्यावरच थांबली. ऑस्ट्रेलियाच्या एश्ले गार्डनर हिने सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना 12 धावात 5 विकेट घेतल्या. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने टी20 वर्ल्ड कप पाच वेळा जिंकला आहे.
SD Social Media
9850 60 3690