‘आयसीसी’ जेतेपद मिळवण्यासाठी उत्सुक असलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघासमोर ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या लढतीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे आव्हान असणार आहे.भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात चुरस पाहायला मिळते, मात्र भारतीय संघाचे पारडे जड असल्याने पाकिस्तानला चमकदार कामगिरी करता आलेली नाही. पाकिस्तानने भारताला गेल्या वर्षी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पराभूत केले होते. गेल्या पाच वर्षांत दोन्ही संघांच्या खेळात बराच फरक पाहायला मिळाला आहे. भारत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या संघांना आव्हान देत आहे, तर पाकिस्तानच्या महिला संघाला काही विशेष कामगिरी करता आलेली नाही. पहिल्या महिला प्रीमियर लीगच्या लिलावाच्या एक दिवसआधी होणाऱ्या या सामन्यात भारतीय खेळाडूंकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा असेल.
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर च्या तंदुरुस्तीला घेऊनही शंका कायम आहे. या दोन्ही खेळाडू दुखापतींचा सामना करत आहेत. ‘‘दोन्ही वरिष्ठ खेळाडू संघासाठी महत्त्वपूर्ण आहेत. त्यांच्या तंदुरुस्तीला घेऊन आम्हाला जराही शंका आली, तर आम्ही जोखीम घेणार नाही, कारण भारताचा हा पहिला सामना आहे,’’ अशी माहिती ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी दिली. भारताला नुकत्याच झालेल्या तिरंगी क्रिकेट मालिकेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पराभूत केले होते. विश्वचषकापूर्वी झालेल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताने हार पत्करली, मात्र बांगलादेशला पराभूत केले.
अनुभवी शिखा पांडेने गेल्या महिन्यातील पुनरागमनानंतर एकही बळी मिळवलेला नाही. फिरकी गोलंदाजांची कामगिरीही अपेक्षेनुसार झालेली नाही. अष्टपैलू दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्रकार यांची सामन्यातील भूमिका निर्णायक असेल. पाकिस्तानसाठी निदा दारवर संघाची मदार असेल. पाकिस्तानने सराव सामन्यात बांगलादेशला नमवले, मात्र दक्षिण आफ्रिकेकडून त्यांनी हार पत्करली.
मानधना खेळण्याची शक्यता कमी – कानिटकर
भारताची उपकर्णधार स्मृती मानधना दुखापतीतून सावरली नसल्याने ती पाकिस्तानविरुद्ध सामन्यात खेळण्याची शक्यता कमीच असल्याचे भारताचे कार्यवाहक प्रशिक्षक ऋषिकेश कानिटकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ती दुसऱ्या सामन्यात उपलब्ध होण्याची अपेक्षा आम्हाला आहे, असेही कानिटकर पुढे म्हणाले.
वेळ : सायं ६.३० वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदूी, स्टार स्पोर्ट्स २