कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात अनुचित प्रकार टाळण्यासाठी 7 हजार पोलीस तैनात केले जाणार आहेत. या काळात पोलिसांकडून सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाईल. त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी केले आहे.
पोलिसांकडून पुण्यात गणेशोत्सवासाठी यापूर्वीच आचारसंहिता जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार यंदा श्रींच्या आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुका निघणार नाहीत. गणेश उत्सवासाठीच्या बंदोबस्तामध्ये सुमारे सात हजार पोलीस कर्मचारी, 700 अधिकारी, शीघ्र कृती दल, गुन्हे शाखेची पथके, श्वान पथक, छेडछाड विरोधी पथक, होमगार्ड, फिरते नियंत्रण कक्ष, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांचा समावेश असेल.
गणेशोत्सवात गुन्हे घडू नयेत यासाठी वेगळा बंदोबस्त तैनात करण्यात येईल. महत्त्वाच्या ठिकाणावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहील. उत्सव कालावधीतील चित्रीकरण संग्रहित ठेवले जाईल.
कोरोना रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी जमावबंदी
गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी पुण्यात जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या काळात 10 सप्टेंबर 2021 ते 19 सप्टेंबर 2021 पर्यंत कलम 144 लागू असेल.
गणेश चतुर्थीला दीड लाख मोदकांचं बुकिंग
येत्या 10 तारखेला गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गणपतीची प्रतिष्ठापना होईल. गणेशोत्सवाच्या या पहिल्या दिवशी पुण्यात दीड लाख मोदकांचं बुकिंग झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा ग्राहकांकडून फ्रोझन मोदक आणि तळणीच्या मोदकांसाठीची मागणी वाढली आहे. केवळ पुण्यातूनच नव्हे तर पुण्याबाहेरूनही मोदकांसाठी ऑर्डर आल्या आहेत. घरगुती मोदक बनवणाऱ्या व्यावसियकांकडेही मोदकांच्या मोठ्या ऑर्डर असल्याचे किशोर सरपोतदार यांनी सांगितले.