मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच मंचावर येणार

येत्या 9 ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे एकाच मंचावर येणार आहेत. राणेंची केंद्रीय मंत्रीपदी लागलेली वर्णी आणि जन आशीर्वाद यात्रेत राणेंना झालेली अटक या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते पहिल्यांदाच एकाच मंचावर येणार असल्याने त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी काल आणि शिवसेना नेते विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन चिपी विमानतळाचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला. यावेळी दोन्ही नेत्यांनी आपल्या प्रयत्नामुळेच चिपी विमानतळ सुरू होत असल्याचा दावा केला. त्यानंतर सोशल मीडियावरूनही शिवसेना आणि राणे समर्थकांमध्ये चिपीच्या श्रेयवादावरून चढाई सुरू झाली आहे.

येत्या 9 ऑक्टोबर रोजी 12.30 वाजता चिपी विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. यावेळी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, स्थानिक खासदार आणि आमदारही उपस्थित राहणार आहेत. या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच ठाकरे आणि राणे आमनेसामने येणार आहेत.

ज्योतिरादित्य ठाकरे हे विमानतळाचं उद्घाटन करतील. त्यासाठी मुख्यमंत्री हवाच असं काही नाही, असं नारायण राणे म्हणाले होते. त्यावर राऊत यांनी आज पलटवार केला. कालच उद्धव ठाकरे आणि ज्योतिरादित्य शिंदें यांच्यात सकाळी 11 वाजता चर्चा झाली. यावेळी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा दिवस ठरला. दोघांनी चर्चा करून दिवस ठरवला, असं सांगतानाच काल 11 वाजता ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी बोलणं झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी मला 12 वाजता फोन करून सांगितलं की, आम्ही 9 तारीख फिक्स केली. मी त्यांना सांगितलं तुमच्या सोयीनुसार तारीख ठरवा, असं राऊत म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांना बोलवायचं की नाही बोलवायचं याचा अधिकार राणेंना कुणी दिला?, राणे कोण लागून चालले? असा सवालही त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.