सांडग्यांची भाजी, दाळीचे फुनके, कोथींबिरीच्या वड्यांची मसाला भाजी

भुसावळ खाद्य भ्रमंती : 12

कोणत्याही घरांमध्ये, जेवणाचा एक अविभाज्य घटक म्हणजे त्या त्या घरच्या माऊलीने घरी तयार केलेला ‘गरम मसाला किंवा ‘ ‘गोडा मसाला’ .. विविध जाती, समाज, तिथली भौगौलिक परिस्थिती यानुसार त्याला वेगवेगळी नांव मिळत असतात आणि चवीसुध्दा. भुसावळकरांचा खाण्याचा तराजुु हा जरा तिखटाच्या बाजुने झुकलेला, खरं म्हणजे झुकला ह्या शब्दापेक्षा ‘टेकला’ हा शब्द अधिक योग्य! तापमान हे 40 डिग्रीच्या पुढेच असते, व तितक्याच सहजतेने ते घेतले जाते. पाहुणेमंडळी पैकि कुणी जर चुकून म्हणालं, कि फार उकडतय बुवा तुमच्यकडे, तर या वाक्यावर अस्सल भुसावळकर रागवतं नाही, तर ते तो ‘सन्मानाने’ घेतो. उत्तरादाखल, ‘ ह्ये त काहीच नी बारे ,12 वाजेले पाह्यजा, अस वाटीन कि कुनी भट्टीच लावली हे..हे ही जोडुन देतो..पाहुणा घाबरुन घरातलं, जे कुलर 2 वर असेल ते 4 वर करतो.( आता ए. सी. अँडजेस्ट करत असेल ) पण गरम होतय म्हणुन खाण्याच्या बाबतीत तिथे, कुणी कमी तिखट किंवा गोडाकडे वळलेलं नाही आणि या जन्मात वळणारही नाही..उलट तिखटाचा वापर जास्तच..आणि त्याचा त्रास होतोय, असंही ऐकिवात नाही. उन्हाळा आला कि समस्त भुसावळकरांची,तिखट, हळद,मसाले करण्याची एकच धांदल उडते, त्यासाठी लागणारी सामुग्री खरेदी करण्यासाठी गर्दी व्हायला लागते. ज्याची त्याची दुकान ठरलेली, ते तिथुनच घेणार. सुक्या लाल मिरच्यांचे बरेच प्रकार,त्यात मग नंदुरबारच्या मिरचीला विशेष स्थान..’चपाता’ हे मिरचीचे नांव आहे, स्लिपरचे नाही हे तिथे गेल्यावरच कळतं… विशेषत: रविवारच्या आठवडेे बाजारात या मिरच्यांची दुकाने थाटलेली असतात ,दुकान म्हणजे ,चार बांबु वर ताणुन बसविलेली पांढरी कनात ,त्यामधे मधोमध मिरच्यांचे विविध प्रकारचे ढिग लावलेले असतात,आसपासच्या खेड्यांमघुन हि शेतकरी मंडळी मिरच्या घेवुन येतात..आपआपल्या आवडीनुसार या लाल मिरच्या आणल्या कि त्या घराच्या गच्चीवर किंवा गल्लीत खाटेवर वाळत घालायच्या , एकदा का या मिरच्या व खडे मसाले आणुन दिले कि समस्त पुरूषमंडळी मोकळी ,पुढच काम त्या गृहिणीचं.. “भुसावळची खाट ” यावर एक स्वतंत्र लेख होऊ शकतो..बिबड्या ,ज्वारी ,हातशेवया,मुग वडे ,खरोडे यासाठी खाटेचा मुबलक वापर केला जातो , आता हि प्रथा आहे कि नष्ट झाली माहीत नाही .. नंतर हिच खाट रात्री झोपायला उपयोगी..झोपण्याआधी सर्व गल्लीमध्ये ( खर तर रस्त्यावरच ) व खाटेवर सुध्दा पाण्याचा शिडकाव केला जायचा..व अश्या रितीने समस्त गल्लीचे रुपांतर हे एका सामुदायिक शयनकक्षात व्हायचे ..तसच प्रत्येक घर हे ‘शनिशिंगणापुर’ , शनिशिंगणापुर हा शब्द याकरता वापरतोय कि , प्रत्येक खाटेसमोरील घरांसमोरची दार ही सताड उघडी ,कारँ गरमच एवढं .. रात्री उशिरापर्यंत गप्पा रंगायच्या. नंतर हे सारं विश्व गाढ झोपी जायचं..यातहि काही वेळा थ्रिल असायचं क्वचित प्रसंगी काही मजेशीर प्रसंग घडायचे. तस ह्या गल्ल्या सुरक्षित मानल्या जायच्या पण अपवाद म्हणुन एखाद्या रात्री वाट चुकलेला भुरटा चोर या गल्ल्यांमध्ये शिरायचा , आणि झोप येत नसलेल्या एखाद्या आजोबाने जर त्याला पाहीलं तर काय विचारता महाराज..असा काही धुरळा उडायचा कि ज्याच नांव ते..ते आजोबा ओरडुन उठायचे..’ कोन हे रे तिकडे..ओ इजुभाऊ उठ रे ,काय जपी राह्यला ,अरे चोर घुसला ना बे गल्लीत..असा दमदार आवाज आल्यावर बरेच जण उठायचे ,मग त्या भुरट्या चोराला पळता भुई थोडी व्हायची..जर का तो हाती लागला कि सर्वजण आपआपले हात साफ करुन घ्यायचे..कानून के हाथ लंबे असतात हे माहीत असल्यामुळे तसच त्यांना इथवर पोहोचायला बराच वेळ लागेल म्हणुन आपण स्वत:च त्या चोराला ‘ लंबे’ ( खर तर आडवेचं करायचे ) करायचे.. आणि चोर जर निसटला तर त्यावर पहाटेपर्यंत गप्पा रंगायच्या , त्यात एखादा भावड्या असायचा..त्याच्या पुड्या सोडण्याचा कार्यक्रम सुरू व्हायचा.. “भावड्या ” : काय सांगु तुमाले मोतीरामभाऊ, हा येवढा चाकु होता बारे त्याचा जोळ , भावड्या चाकुची लांबी साधारण ,अर्ध्या खाटेएवढी दाखवायचा..,पन तुमाले त मालुम हे ,आपलं काम ..मी न बी जो गच्ची ( मान ) धरली त्याची अन् येकच गुद्दा मारला ,तो तढीच लंबा झाला.अन मी त्याले पकडीसन आननार ,त्येवढ्यामदि ,हा रामकिस्नाचा पो-या आला ,तो बोल्ला कि सोडा त्याले , आपुन पोलीसायले बलावु..मंग काय तेवढ्या गोंधयात तो पयी गेला ( पळुन गेला ) ,इकडे रामकिस्नाचा पो-या गोंधळात ‘ साला मी तर बारे खाटेखाली बी उतरलो नी ‘ …पण बोलायची सोय नाही. अस सगळ चालायचं..तर मुळ विषय अश्या मिरच्या वाळवुन झाल्या, कि त्या खडे मसाले ,सुक खोबर वगैरे सोबत , तेलात चांगल्या खमंग भाजुन ,त्याचा खमंग मसाला तयार करायचा आणि आपल्या ठरलेल्या कांडप मशिनवर कुटून आणायचा,दळायचा नाही.. मसाला कुटायला या गृहिणी चार पाच जणी मिळुन ..कारण गाँसिपिंगला तेवढाच वावं..शिवाय वाट्या, दोन वाट्यांची देवाण घेवाणही व्हायची..त्यामुळे चवीतही बदल..असे हे मसाले ,तिखट घराघरात स्थानापन्न झाल्यावर ,गृहिणींच्या हाताला या मसाल्याची जणु झिंग चढते मग सुरू होतात फर्माईशी…या मसाल्यांची खमंग शेव भाजी, फौजदारी डाळ , पंचम डाळ ,सांडग्यांची मसाला भाजी ,दाळीचे फुनके,कोथींबिरीच्या वड्यांची मसाला भाजी , अळुच्या पानांना दाळीच पीठ व चिचंगुळ ,तीळ घालुन केलेल्या वड्यांची रस्सा भाजी अश्या अनेक प्रकारच्या रस्सा भाज्यांचा मौसम सुरु होतो ,एवढच काय तर साधे बटाटे उकडुन त्याची देखील रस्सा भाजी ..असे अनेक प्रकार हे घडीच्या पोळ्या व भाकरीसोबत स्वाहा केले जातात..आता तेथे तयार मसाल्यांची अनेक दुकाने आहेत..बोंडे मसाला ( या नावांला पर्याय नाही ),चौधरींचा मसाला, बहुदा अनिल मसाले अस काहीस नांव होत,गुरुकृपा मसाले,दिपक मसाले , हे आणि असे अनेक मसाले तिथलेे प्रसिध्द..आजच्या घडीला पुणे ,मंबई ,नाशिक व अन्य शहरांमधली मंडळी इथुनच मसाले घेवुन जातात किंवा मागवतात..सध्या मसाल्यांचा सिझन सुरू आहे म्हणुन हे सगळ वर्णन ..जरा लांबलय पण असो, रंगतदार मसाल्यांसोबत चालवुन घ्या.

सारंग जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.