आज दि.११ जुलै च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

अजितदादा अजूनही वेटिंगवर; मुश्रीफ आणि भुजबळांसह 8 जणांना मंत्रालयात मिळाले दालन!

शिंदे फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आपल्या 8 आमदारांसह सहभागी झाले आहे. अजित पवार गटाच्या मंत्र्यांना कोणती खाते मिळणार याबद्दल अजून निर्णय बाकी आहे. पण त्याआधी राष्ट्रवादीच्या 8 ही मंत्र्यांना मंत्रालयात दालन वाटप करण्यात आले आहे. मात्र, अजित पवार यांच्याबद्दल अजूनही निर्णय गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे.

अयोध्येत धावत्या ‘वंदे भारत’ ट्रेनवर दोन्ही बाजुने दगडफेक

गोरखपूरहून लखनऊला जाणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्सप्रेस ट्रेनवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. वंदे भारत (२२५४९) या हायस्पीड ट्रेनवर लोहमार्गाच्या दोन्ही बाजूंनी दगडफेक करण्यात आली. यामध्ये रेल्वेच्या दोन डब्यांच्या काचा फुटल्या आहेत. ही घटना अयोध्येतील सोहवाल रेल्वे स्थानकाजवळ घडली. विशेष म्हणजे यापूर्वी देशातील विविध मार्गांवर धावणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस ट्रेनला लक्ष्य करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीत खलबतं

राज्यात महत्त्वपूर्ण घडामोडी घडत असताना महाराष्ट्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची आज दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष राहुल गांधी, महासचिव के.सी.वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी एच. के. पाटील आणि प्रदेश अध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकांसदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती नाना पटोले यांनी बैठकीनंतर दिली.

सुप्रीम कोर्टाचा मोदी सरकारला दणका; ईडीच्या संचालकांना तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा ‘तो’ निर्णय ठरवला अवैध

केंद्र सरकारने अलीकडेच सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा यांना तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली होती. या मुदतवाढीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर न्यायालयाने केंद्र सरकारचा हा निर्णय अवैध ठरवला आहे. न्यायालयाने मंगळवारी संजय कुमार मिश्रा यांना तिसऱ्यांदा दिलेली मुदतवाढ अवैध ठरवली. मात्र, त्यांना ३१ जुलैपर्यंत पदावर कायम राहण्याची परवानगी दिली आहे.ही सुनावणी न्यायमूर्ती बीआर गवई, न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठापुढे पार पडली. यावेळी खंडपीठाने सांगितलं की, चालू वर्षात फायनान्शिअल अॕक्शन टास्क फोर्स (FATF) द्वारे आढावा घेण्यासाठी आणि पदभार इतर अधिकाऱ्याकडे सुपूर्द करण्यासाठी मिश्रा यांचा कार्यकाळ ३१ जुलैपर्यंत कायम असेल.

कलम ३७० हटवण्याविरोधातील याचिकेवर सुप्रीम कोर्टात २ ऑगस्टपासून सुनावणी

केंद्र सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारं कलम ३७० हटवलं होतं. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात १० पेक्षा जास्त याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर २ ऑगस्टपासून सुनावणी केली जाईल, असं सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी सांगितलं. सरन्यायाधीश म्हणाले, आम्ही यावरील सुनावणी २ ऑगस्टपासून सुरू करू. सोमवार आणि शुक्रवार वगळता दररोज सकाळी १०.३० वाजल्यापासून याप्रकरणी सुनावणी होईल. सरन्यायाधीशांच्या नेतृत्वातील पाच न्यायाधीशांचं खंडपीठ यावर सुनावणी करेल.

अखेर राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा! सरन्यायाधीशांचा महत्त्वपूर्ण निर्णय

जवळपास गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असणाऱ्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्त्या होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात झालेल्या सुनावणीमध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी या नियुक्त्या करण्यासंदर्भातले निर्देश दिले आहेत. त्यामुळे लवकरच राज्यपालांकडून नियुक्त्या केल्या जाण्याची शक्यता आहे. एकीकडे राज्यातील मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेपाटपाची चर्चा असताना आता सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता विधान परिषदेत कुणाची वर्णी लागणार, याचीही उत्सुकता निर्माण झाली आहे.

रात्रीस खेळ चाले! विंडीज विरुद्धचे सामने पाहण्यासाठी करावे लागणार जागरण

भारतीय संघ १२ जुलैपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेने वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात करणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी डॉमिनिका येथील विंडसर पार्क येथे खेळवली जाणार आहे. यासह, दोन्ही संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC)च्या तिसऱ्या आवृत्तीला सुरुवात करतील. भारतीय संघ तब्बल एक महिन्यानंतर मैदानात उतरणार आहे. यापूर्वी डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.तब्बल महिनाभराच्या विश्रांतीनंतर टीम इंडिया मैदानावर वेस्ट इंडीजशी दोन हात करण्यासाठी उतरणार आहे. रोहित ब्रिगेड पहिलीच मालिका जिंकून नव्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलमध्ये विजयी प्रारंभ करण्याचा भारतीय संघाचा प्लॅन असेल. भारतीय चाहत्यांना मात्र ही मालिका बघण्यासाठी आपल्या दिवसाच्या वेळापत्रकात मोठा बदल करावा लागणार आहे. कारण, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वेळेत खूप मोठी तफावत असल्याने भारतीय चाहत्यांना हे सामने मध्यरात्रीपर्यंत जागून पाहावे लागतील.

‘मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्या’, राजकीय कलंका’वरून फडणवीसांचा ठाकरेंवर दुसरा पलटवार

विदर्भ दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी नागपूरमधल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्यावर वादग्रस्त टीका केली. देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे कलंक असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी कालच प्रत्युत्तर दिलं. फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचे दोन व्हिडिओ आणि आठ मुद्दे टाकत पलटवार केला.यानंतर आता पुन्हा एकदा फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘मला या गोष्टीचं अत्यंत दु:ख आहे, की आमचे आजचे विरोधक आणि माजी मित्र यांच्यावर आताच्या राजकीय परिस्थितीचा फारच विपरीत परिणाम झालेला दिसतो, त्यामुळे कदाचित त्यांना मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा लागेल. अशा मानसिकतेतून जर एखादा व्यक्ती बोलत असेल तर त्याच्यावर रिएक्शन देणंही योग्य नाही’, असं फडणवीस म्हणाले.

 चाहत्यांसाठी खूशखबर! वर्ल्डकप २०२३च्या सामन्यांच्या तिकिटांचे दर झाले जाहीर

आयसीसी विश्वचषक २०२३चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यावेळी ह्या स्पर्धेचे यजमानपद भारताकडे असणार आहे. ५ ऑक्टोबरपासून या विश्वचषकाला सुरूवात होणार आहे. त्याच वेळी, वर्ल्ड कपचा पहिला आणि अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. या स्पर्धेत १० ठिकाणी ४८ सामने खेळवले जाणार आहेत. पण या सगळ्यामध्ये विश्वचषकाच्या काही सामन्यांची तिकिटे जाहीर करण्यात आली आहेत.अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी थेट स्टेडियममध्ये विश्वचषक सामने पाहण्याची ही उत्तम संधी आहे. कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर होणाऱ्या सामन्यांची तिकिटांच्या दरांची यादीही आली आहे. त्यामुळे जर तुम्ही स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला सर्व उपयुक्त माहिती येथे मिळेल.

दीप्ती-शफालीची जबरदस्त गोलंदाजी! भारताचा बांगलादेशवर आठ धावांनी रोमहर्षक विजय

भारत आणि बांगलादेशच्या महिला संघांमधील तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना ढाका येथे खेळला गेला. टीम इंडियाने पहिला टी२० सात विकेट्सने जिंकला होता. आता हा सामना जिंकून भारतीय संघाने मालिकेत २-० अशी अजेय आघाडी घेतली आहे. अटीतटीच्या सामन्यात हरमनब्रिगेडने आठ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. दीप्ती शर्मा आणि शफाली वर्मा या फिरकी जोडगोळीने शानदार गोलंदाजी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. शफाली वर्माला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

सुकन्या मोने अभिनयाबरोबरच समाजकार्यातही पुढे, दरवर्षी घेतात एका मुलाला दत्तक

अभिनेत्री सुकन्या मोने या मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. गेली अनेक वर्षं त्या विविध नाटकं, मालिका, चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. तर सध्या त्या त्यांच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटामुळे चांगल्याच चर्चेत आहेत. अशातच एका वेगळ्या कारणाने सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे वेधलं गेलं आहे.सुकन्या मोने यांनी ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. गेले अनेक दिवस त्या या चित्रपटाचं प्रमोशन करत होत्या. आतापर्यंत या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी अनेक मुलाखती दिल्या आहेत. या मुलाखतींमधून त्यांनी त्यांच्या कामाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या. त्यांच्या कामाबरोबरच त्या सामाजिक कार्यातही तितक्याच सक्रिय असतात. त्या दरवर्षी एका मुलाला दत्तक घेतात असा खुलासा करत त्यांनी त्या मागचं कारण सांगितलं आहे.

कारकिर्दीत तब्बल 180 फ्लॉप चित्रपट देऊनही ‘हा’ अभिनेता ठरला सुपरस्टार

बॉलिवूडमध्ये एक असा अभिनेता होता ज्याचे एक दोन नाही तर तब्बल 180 चित्रपट फ्लॉप झाले होते. त्याच्या हिट चित्रपटांपेक्षा फ्लॉप चित्रपटांचीच संख्या जास्त आहे. पण तरीही हा अभिनेता सुपरस्टार झाला होता. त्याचे जगभरात प्रचंड चाहते आजही आहेत. या सुपरस्टारच नाव आहे मिथुन चक्रवर्ती. त्याच्या फ्लॉप चित्रपटांची संख्या जास्त असली तरी त्याला बॉलीवूडचा सुपरस्टार म्हटले जाते, कारण मिथुनचे स्टारडम इतर अभिनेत्यांपेक्षा थोडे वेगळे आहे.मिथुन चक्रवर्ती हे एक ज्येष्ठ अभिनेते तसेच निर्माता आणि राजकारणी आहेत. त्यांनी प्रामुख्याने हिंदी आणि बंगाली भाषेतील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ते राज्यसभेचे माजी खासदारही आहेत. त्यांना तीनदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे. पण एक काळ असा होता की मिथुन यांचे लागोपाठ चित्रपट सोशल मीडियावर फ्लॉप होत होते.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.