मंत्रालयातल्या 602 क्रमांकाच्या दालनाला प्रत्येक मंत्री का देतो नकार? काय आहे कारण
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर आता मंत्रालयामध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसाठी दालनांची डागडुजी केली जात आहे, पण मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील 602 क्रमांकाचं दालन अद्यापही बंद आहे. सामान्य प्रशासन विभागाने हे दालन नवनियुक्तमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना दिलं आहे, पण अद्याप त्याची साफसफाई काही करण्यात आली नाही. खरं तर या दालनाविषयी राजकारण्यांमध्ये फारसं चांगलं मत नसल्याचं बोललं जातंय.मंत्र्यांना 602 क्रमांकाच्या दालनाची धास्ती आहे का? याबाबत चर्चा व्हायचं कारण म्हणजे या दालनाचा इतिहास. 1999 साली छगन भुजबळ यांना हे दालन मिळालं, पण बनावट स्टॅम्प पेपरप्रकरणी भुजबळांना राजीनामा द्यावा लागला. अजित पवारांनाही उपमुख्यमंत्री झाल्यानंतर हे दालन मिळालं, पण सिंचन घोटाळ्याच्या आरोपामुळे त्यांना मंत्रिपद सोडावं लागलं.2014 साली एकनाथ खडसे यांच्या वाट्याला हे दालन आलं, पण एमआयडीसी जमीन घोटाळ्याच्या आरोपांमुळे खडसे यांचं मंत्रिपद गेलं. यानंतर सदाभाऊ खोत आणि अर्जुन खोतकर यांनाही हे दालन देण्यात आलं, पण 2019 च्या निवडणुकीत अर्जुन खोतकरांचा पराभव झाला आणि सदाभाऊ खोत यांना आमदारकी मिळाली नाही. आता धर्मरावबाबा आत्राम हे दालन स्वीकारणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
अजित पवार दिल्लीला रवाना, खातेवाटपाचा तिढा ‘राजधानी’मध्ये सुटणार?
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांचा शपथविधी पार पडून 10 पेक्षा जास्त दिवस उलटूनही अद्याप मंत्री खात्याविनाच आहेत. गेल्या वर्षभरापासून मंत्रिपदाची वाट पाहणाऱ्या शिवसेनेतील आमदारांचा, नव्याने आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना महत्त्वाची खाती देण्यास विरोध असल्याची चर्चा आहे, त्यामुळेच खातेवाटप लांबलं जात असल्याचं बोललं जातंय, त्यामुळे खातेवाटपावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला रवाना झाले आहेत.खातेवाटपाचा तिढा सोडवण्यासाठी दिल्लीमध्ये अजित पवार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. खातेवाटपाला हिरवा कंदील मिळाल्यानंतरही शिवसेनेमुळे विलंब होत असल्याचं सांगण्यात येतंय. वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सलग दोन दिवस विस्तार आणि खातेवाटपाबाबत रात्री उशिरापर्यंत बैठका झाल्या, मात्र अद्यापही खातेवाटपाचा तिढा कायम आहे. शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असून, राष्ट्रवादीलाही अपेक्षित खाती मिळत नसल्याने डेडलॉक कायम आहे.
चिंता मिटली! पुढचे 48 तास विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा
राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. अजूनही संपूर्ण महाराष्ट्रात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही, त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. दरम्यान पुढचे 48 तास राज्यात कसं असेल हवामान याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 4,5 दिवसात कोकणात जोरदार पावसाचा अंदाज आहे.राज्याच्या आतल्या भागात मध्यम पावसांची शक्यता. पुढच्या 2 दिवस विदर्भातही मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.गेल्या 24 तासात विदर्भात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाउस झाला. IMD ने जुलैसाठी वर्तवलेला हंगामी अंदाज महाराष्ट्राच्या काही भागांसह मध्य भारतात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता दर्शवत आहे.
नरेंद्र मोदींना टिळक पुरस्कार; विश्वस्त सुशीलकुमारांचे मौन
लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवून गांधी-नेहरूंचा वैचारिक वारसा संपविण्यासाठी आणि देशात हुकूमशाही लादण्यात कार्यमग्न असल्याचा ज्यांच्यावर आक्षेप घेतला जातो, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यावरून वादंग माजले असतानाच लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता मौन बाळगले आहे.लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्यावतीने पंतप्रधान मोदी यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. टिळक पुण्यतिथीनिमित्त १ आॕगस्ट रोजी हा पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह प्रमुख सत्ताधारी नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत.
‘एमपीएससी’ची दिरंगाई! मागणीपत्र असूनही अद्याप ‘या’ पदांसाठी जाहिरात नाही
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे राज्य सरकारकडून विविध पदांच्या भरतीची मागणी करण्यात आली आहे. मात्र, मागणीपत्र आल्यानंतरही अनेक पदांसाठी अद्यापही जाहिरात न आल्याची विद्यार्थ्यांची ओरड आहे. राज्य सरकारकडून एप्रिल महिन्यात सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी मागणीपत्र देण्यात आले होते. मात्र, तीन महिने उलटूनही सहाय्यक प्राध्यापक भरतीची जाहिरात आलेली नाही.करोनानंतर राज्य शासनाने विविध पदांची भरती सुरू केली आहे. एमपीएससीच्या कक्षेतील विविध पदांसाठी जाहिरात दिली जात आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विभागांसाठी सहाय्यक प्राध्यापकांची भरती होणार आहे. तसे ९४ पदांचे मागणीपत्रही देण्यात आले आहे. मात्र, असे असतानाही अद्याप जाहिरात आलेली नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी आहे. सहाय्यक प्राध्यापकपदासाठी आवश्यक असणारी नेट, सेट परीक्षेची पात्रता अनेक उमेदवारांकडे आहे. मात्र जाहिरात येत नसल्याने त्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे.
ममता बॅनर्जी यांचा मोठा विजय भाजपसाठी धोक्याचा इशारा
पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मिळालेल्या निर्विवाद यशामुळे आगामी लोकसभा निवडणुकीकरिता भाजपला धोक्याचा इशारा मानला जातो. कारण गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला यश मिळालेल्या राज्याच्या उत्तर भागातही तृणमूल काँग्रेसने यश संपादन केले आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपने अनपेक्षितपणे मुसंडी मारली होती. लोकसभेच्या ४२ पैकी १८ जागा जिंकून भाजपने तृणमूलला मोठा धक्का दिला होता. तृणमूलचे २२ खासदार निवडून आले होते. भाजपला मिळालेल्या यशाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यासुद्धा गोंधळल्या होत्या. पण दोन वर्षांत त्यांनी भाजपला राजकीयदृष्ट्या रोखण्यावर भर दिला. लोकसभेच्या यशाने भाजपला सत्तेची स्वप्ने पडू लागली. सत्ता नाही मिळाली तरी १०० पेक्षा अधिक आमदार निवडून आणण्याचे उद्दिष्ट भाजपचे होते. पण विधानसभा निवडणुकीत २९४ पैकी २०० पेक्षा अधिक जागा जिंकून ममता बॅनर्जी यांनी भाजपला धक्का दिला.
शासनाकडून डी.एड, बी.एड धारकांची थट्टा, सेवानिवृत्त शिक्षक पुन्हा मानधन तत्वावर कामावर
राज्य शासनाने राज्यात मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या जागेवर सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना नेमणुका देण्याचा शासन निर्णय नुकताच जाहीर केला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे डी.एड, बी.एड धारक सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींची थट्टा केली जात आहे.या निर्णयाला महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने विरोध करीत सेवानिवृत्त शिक्षकांना मानधन तत्वावर घेण्यापेक्षा बेरोजगार डी. एड, बी. एड. धारकांना तात्काळ नेमणुका देण्याची मागणी केली आहे. सेवानिवृत्त कर्मचारी हा वयोमानानुसार निवृत्त होत असतो. वयोमान झाल्यामुळे कार्य करण्याची तीव्र इच्छा त्यांच्यामध्ये नसते तर काही कर्मचारी विविध वैद्यकीय कारणास्तव स्वेच्छा निवृत्ती घेत असतात.
कसोटी क्रमवारीत मोठा बदल! बाबर आझमला फायदा तर स्टीव्ह स्मिथला झाला तोटा
हेडिंग्ले कसोटी सामना संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. त्यानुसार टॉप-५ स्थानांमध्ये मोठा बदल झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रॅव्हिस हेडने आपल्याच संघातील अनुभवी खेळाडू स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांना मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे. हे त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी आहे.इंग्लंडविरुद्धच्या अॅशेस मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात शानदार कामगिरी करत ट्रॅव्हिस हेडने दोन स्थानांनी झेप घेतली आहे. तो आता न्यूझीलंडचा अनुभवी केन विल्यमसन दुसऱ्या स्थानावर आहे. २९ वर्षीय खेळाडूने अॅशेसमध्ये ४४.३३च्या सरासरीने २६६ धावा केल्या आहे, तो इंग्लिश गोलंदाजांना सतत त्रास देत आहे. या क्रमवारीत पुन्हा एकदा केन विल्यमसन नंबर वनच्या खुर्चीवर विराजमान झाला आहे. गेल्या सुमारे चार महिन्यांपासून तो कसोटी खेळला नाही, पण त्यानंतरही गेल्या आठवड्यात त्याने पहिल्या क्रमांकाची खुर्ची काबीज केली होती, जी अजूनही अबाधित आहे. त्याचे ८८३ गुण आहेत.
आपत्ती निवारणासाठी केंद्र सरकारकडून राज्यांना ७,५३२ कोटी रुपये निधी जारी
अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाने आज २२ राज्य सरकारांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) साठी ७,५३२ कोटी रुपये जारी केले आहेत. गृह मंत्रालयाच्या शिफारसीनुसार ही रक्कम जारी करण्यात आली आहे. यापैकी महाराष्ट्राला १४२० कोटी ८० लाख रुपये जारी करण्यात आले आहेत. देशभरात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक तत्त्वे शिथिल करण्यात आली आहेत. गेल्या आर्थिक वर्षात राज्यांना जारी केलेल्या रकमेच्या वापराच्या प्रमाणपत्राची वाट न पाहता राज्यांना तात्काळ मदत म्हणून ही रक्कम जारी करण्यात आली आहे.आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ४८ (१) (अ) अंतर्गत प्रत्येक राज्यात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची (एसडीआरएफ) स्थापना करण्यात आली आहे. हा निधी अधिसूचित आपत्तींना प्रतिसाद देण्यासाठी राज्य सरकारांकडे उपलब्ध असलेला हा प्राथमिक निधी आहे. केंद्र सरकार सर्वसाधारण राज्यांमध्ये एसडीआरएफ मध्ये ७५% तर ईशान्य प्रदेश आणि हिमालयातील पर्वतरांगांमध्ये वसलेल्या राज्यांमध्ये ९०% योगदान देते.
महागड्या भाज्यांनी गाठला ३ महिन्यांतील उच्चांक; जूनमध्ये किरकोळ महागाई दर ४.८१ टक्क्यांवर पोहोचला
महागाई कमी होण्याचा ट्रेंड जवळपास संपुष्टात आला असून, जून महिन्यात किरकोळ महागाई दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. अन्नधान्याच्या किमती वाढल्याने जूनमध्ये किरकोळ महागाई दर तीन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. जूनमध्ये किरकोळ महागाई ४.८१ टक्क्यांवर पोहोचली आहे, जी मेमध्ये ४.३१ टक्क्यांवर होती. सरकारने बुधवारी ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) वर आधारित महागाईची आकडेवारी जाहीर केली. किरकोळ महागाई मे महिन्यात ४.३१ टक्के होती, तर एक वर्षापूर्वी जून २०२२ मध्ये ती सात टक्के होती.सरकारी आकडेवारीनुसार, जूनमध्ये खाद्यपदार्थांचा महागाई दर ४.४९ टक्के होता, तर मे महिन्यात तो २.९६ टक्के होता. सीपीआयमध्ये अन्न उत्पादनांचे वजन जवळपास निम्मे मोजले जाते. जूनमध्ये किरकोळ महागाई वाढली असली तरी ती रिझर्व्ह बँकेच्या सहा टक्क्यांच्या समाधानकारक पातळीपेक्षा खाली आहे.
‘72 हूरें’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला
‘द कश्मीर फाइल्स’ आणि ‘द केरला स्टोरी’नंतर प्रदर्शित झालेला वादग्रस्त ’72 हूरें’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते संजय पूरन सिंह चौहान दिग्दर्शित या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. पहिल्याच दिवशी ’72 हूरें’नं अत्यंत निराशाजनक कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या गल्ल्यात थोडीशी वाढ झाली, पण त्यानंतर कमाईत उतरती कळा सुरू झाली.’72 हूरें’ चित्रपटानं पहिल्या दिवशी ०.३५ कोटी, दुसऱ्या दिवशी ०.४५ कोटी, तिसऱ्या दिवशी ०.४५ कोटी, चौथ्या दिवशी ०.१७ कोटी आणि पाचव्या दिवशी फक्त ०.१८ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटानं एकूण १.६ कोटींचा गल्ला जमवला आहे. अशोक पंडित निर्मित ’72 हूरें’ चित्रपट १० कोटींमध्ये बनवण्यात आला होता, पण तो अजून २ कोटींचा आकडाही पार करू शकला नाही.
आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार…
‘मुन्नाभाई एम. बी. बी. एस.’ चित्रपट श्रुंखला लोकप्रिय झाल्यानंतर खऱ्या अर्थाने दिग्दर्शक राजकुमार हिरानीची जोडी जमली ती अभिनेता आमिर खानबरोबर. या जोडगोळीने केलेल्या ‘थ्री इडियट्स’ आणि ‘पीके’ या दोन्ही चित्रपटांनी अमाप यश मिळवले. आता जवळपास दशकभराने पुन्हा ही जोडी एका नव्या चरित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येणार आहे.राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘पीके’ हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झाला होता. त्यानंतर या दोघांनी एकत्र काम केले नव्हते. आमिर खान आणि राजकुमार हिरानी गेली काही वर्ष एकत्रित चित्रपट करण्यासाठी प्रयत्नशील होते. हिरानी यांनी आमिरला काही कथाकल्पना ऐकवल्याही होत्या. अखेर हिरानी यांनी ऐकवलेली एक कथा आमिरच्या पसंतीस उतरली असून पटकथा लेखनाच्या प्रक्रियेलाही लवकरच सुरुवात होणार आहे. सध्या हिरानी आगामी ‘डंकी’ चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहेत. खुद्द हिरानी चार – साडेचार वर्षांनंतर दिग्दर्शक म्हणून ‘डंकी’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. शाहरुख खानबरोबरचा त्यांचा पहिला चित्रपट असलेला ‘डंकी’ या वर्षाच्या अखेरीस नाताळच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर हिरानी आमिरच्या चित्रपटावर काम सुरू करणार असल्याचे समजते.
सावधान! फ्री फायर गेमचं व्यसन; मुलाने गमावलं मानसिक संतुलन
शहरी भागासह ग्रामीण भागातील तरुणांना देखील मोबाईल गेमचे वेड लागले आहे. सध्या लहान मुलांसह मोठी माणसे व्हिडिओ गेम खेळताना दिसतात. सध्या तेच करमणुकीचे साधन झाले आहे. मोबाईल आणि ऑनलाईन गेमचं व्यसन असं भिनतं की त्यासाठी वाटेल ते करायला मुलं तयार होतात. आपली तहान आणि भूक विसरून गेममध्ये मशगूल असणारी मुलं तर आपण पाहतोच.पण आता मुलं झोपदेखील विसरत असल्याचं दिसतं. रात्र-रात्रभर जागून मोबाईल गेम खेळत असतात. सध्या असाच एक भयानक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गेम खेळून एका मुलाचं मानसिक संतुलन बिघडलं आहे.राजस्थानमध्ये एक मुलगा ऑनलाईन गेम्सच्या इतका आहारी गेला आहे की यामध्ये त्याचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. तो थरथरत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. स्पेशल टीचर भवानी शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार तो फ्री फायर सारख्या खेळाच्या आहारी गेला होता. यामध्ये मुलांना अपयश जिव्हारी लागतं. अनेकजण यामध्ये एकतर आत्महत्या करतात किंवा मानसिक संतुलन गमवतात. दरम्यान आता यामध्ये थेरपी म्हणू अशा काही स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटीज प्लॅन केल्या आहेत ज्याद्वारा त्याला त्या जिंंकून पुन्हा आत्मविश्वास दिला जाणार आहे.
SD Social Media
9850 60 3590