आमदार रवी राणा यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर शिंदे गटात जाणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर रवी राणा यांच्या दाव्याचा किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला आहे.
किशोरी पेडणेकर यांनी ठाकरे गटाचा किल्ला जोरदारपणे लढवला आहे, पण रवी राणा यांनी याच किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. ठाकरेंपासून वेगळं होत शिंदेंनी वेगळा गट स्थापन केला, यानंतर शिवसेनेवर दावाही सांगितला. नेत्यांची मोठी फळीच शिंदेंकडे गेली. यानंतर ठाकरेंची कमकुवत झालेली बाजू किशोरी पेडणेकर आक्रमकपणे माध्यमांसमोर मांडत आहेत, पण ठाकरेंची ही मुलुख मैदानी तोफही शिंदेंसोबत जाणार असल्याचा दावा रवी राणा यांनी केला आहे.
मुंबईतील ठाकरे गटाचे 80 टक्के नगरसेवक शिंदे गटात असतील असा दावाही रवी राणा यांनी केला आहे. शिंदे गटाने शिवसेना भवनवरही ताबा घेतला पाहिजे, कारण ते बाळासाहेबांच्या विचारांचं भवन आहे, अशी मागणीही रवी राणा यांनी केली आहे.
आमदार रवी राणा यांच्या दाव्याची किशोरी पेडणेकर यांनी चांगलीच खिल्ली उडवली आहे. माध्यमांचं लक्ष वेधून घेण्यासाठी रवी राणा बेताल वक्तव्य करत आहेत, असा टोला पेडणेकर यांनी लगावला आहे.