आज दि.२९ डिसेंबरच्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

भागवत साहेब संघ मुख्यालयाचे कोपरे तपासा, शिंदेंच्या भेटीनंतर ठाकरेंनी दिला धोक्याचा इशारा!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघ मुख्यालयाला भेट दिली. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे एकनाथ शिंदे रेशीमबागेत गेले होते. मुख्यमंत्र्यांच्या या भेटीवरून उद्धव ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना सल्ला देत शिंदेंवर निशाणा साधला आहे.

‘भागवत साहेब कोपरे-कोपरे तपासून बघा, कुठे लिंबं-टाचण्या पडल्यात का ते बघून घ्या. काल आमचं कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, आज आरएसएसच्या मुख्यालयावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला असेल. यांची नजर फार वाईट आहे, याचा अनुभव आम्ही घेतला. जे चांगलं आहे ते आपण नाही करू शकत, मग त्या चांगल्यावर कब्जा कसा मिळवायचा, ही त्यांची वृत्ती आहे. ही वृत्ती घातक आहे, त्यामुळे आरएसएसनेही काळजी घ्यायची गरज आहे,’ अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

गुगलची नवीन रिव्ह्यू सिस्टीम ठरणार कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी; हजारो कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात

अमेरिकेमध्ये आर्थिक मंदीच्या संकटाची चाहूल लागल्यामुळे अनेक लहान-मोठ्या कंपन्यांनी कर्माचारी कपात सुरू केली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये फेसबुक, मेटा, अ‍ॅमेझॉन आणि ट्विटरसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. एकूणच काय तर टेक्नॉलॉजी सेक्टरमधील कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा धडाका सुरू केलेला आहे. लवकरच यामध्ये ‘टेक जायंट’ गुगलचाही समावेश होणार आहे. कंपनीनं तयार केलेली नवीन रिव्ह्यू सिस्टीम यासाठी कारणीभूत ठरणार आहे. कंपनीच्या रिव्ह्यू सिस्टीममुळे सुमारे 10 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ‘टीव्ही 9 भारतवर्ष’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

चेन्नईच्या फ्रँचाइजीकडून खेळणार नाही 13.25 कोटींचा खेळाडू

आयपीएल 2023 च्या मिनी ऑक्शममध्ये काही खेळाडुंना कोट्यवधींची किंमत मिळाली. यातच 13.25 कोटी रुपये बोली लागलेला खेळाडू चेन्नईच्या फ्रँचाइजीकडून खेळू शकणार नाही. कोट्यवधींची बोली लागलेला हा खेळाडू चेन्नई सुपर किंग्जच्या फ्रँचाइजीकडून टी२० लीगमध्ये  खेळणार नाही. हॅरी ब्रूकला आयपीएल ऑक्शनमध्ये सनरायजर्स हैदराबादने 13.25 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. मात्र तो नव्या वर्षात होणाऱ्या दक्षिण आफ्रिका टी२० लीगमध्ये खेळणार नाही. तो चेन्नईची फ्रँचाइजी असलेल्या जोहान्सबर्ग सुपरकिंग्जकडून खेळणार होता. पण तो संपूर्ण लीगला मुकणार आहे.

बेशरम रंग पठाणमधून काढून टाकणार? सेन्सॉर बोर्डानं दिले मेकर्सना आदेश

पठाण या सिनेमावरून मागच्या काही दिवसांपासून चांगलाच वाद निर्माण झाला आहे.सिनेमातील बेशरम रंग गाण्यातील दीपिकाच्या भगव्या बिकिनीवरून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत अनेक संघटनांकडून यावर टीका करण्यात आली.पठाण या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. अशात पठाण सिनेमातील आणखी दोन गाणी देखील रिलीज झाली. ज्यांनी उत्तम प्रतिसाद मिळत आहे.सिनेमातील बारकावे CBFCने लक्षात घेतल्यानंतर आता कमिटीने पठाण सिनेमाच्या निर्मात्यांनी सिनेमात महत्त्वाचे बदल करण्याचे आदेश दिले आहेत.सिनेमातील काही दृश्यांसह गाण्यांमध्येही बदल करण्याचे आदेशCBFCनी दिले आहेत. तसंच सिनेमा रिलीज होण्याआधी सिनेमाचं रिवाइज वर्जन सबमिट करण्याचे आदेशही देण्यात आलेत

जिओ 5G नेटवर्क सुविधा; रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानींनी केली घोषणा

यंदाच्या वर्षी 1 ऑक्टोबर (2022) या दिवशी नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर झालेल्या इंडियन मोबाईल काँग्रेसच्या सहाव्या आवृत्तीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतात 5 G नेटवर्क लाँच केल्याची अधिकृत घोषणा केली.

5G नेटवर्क कमालीचा स्पीड, लोअर लेटन्सी आणि डेटा नेटवर्कला अधिक सक्षम करतं. त्यामुळे देशात 5 G नेटवर्कची गरज भासू लागली होती. सध्या भारतातील मोजक्या शहरांमध्ये रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलनं आपल्या ग्राहकांना 5G नेटवर्क देऊ केलं आहे.

करोना रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

चीन आणि इतर देशांमध्ये करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. करोनाच्या BF.7 या व्हेरियंटचा धोका वाढू नये यासाठी काही निर्णय घेण्यात येत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. १ जानेवारी २०२३ पासून चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड या देशातून येणाऱ्या प्रवाशांना आता आरटी पीसीआर टेस्ट बंधनकारकर करण्यात आली आहे.या सहा देशांमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांना आता प्रवास सुरु करण्याआधी एअर सुविधा पोर्टलवर टेस्टचा रिपोर्ट अपलोड करावा लागणार आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या सहा देशातून येणाऱ्या प्रवाशांना आता १ जानेवारीपासून आरटी-पीसीआरचा निगेटीव्ह रिपोर्ट सादर करावा लागणार आहे. चीन आणि पूर्व आशियाई देशांमध्ये करोनाचे रुग्ण वाढल्यानंतर हा खबरदारीचा उपाय घेण्यात येत आहे.

रशियाचा पुन्हा युक्रेनवर हल्ला, डागली १०० पेक्षा जास्त क्षेपणास्त्रे; वीजपुरवठाही खंडीत

रशियाने गुरुवारी सकाळी युक्रेनवर १०० पेक्षा जास्त क्षेपणास्रे डागल्याच्या दावा युक्रेनच्या राष्ट्रपती कार्यालयाकडून करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळपासून संपूर्ण युक्रेनमध्ये सायरन वाजत असून राजधानी कीवसह अनेक शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, या हल्ल्यात तीन जण जखमी झाले असून संपूर्ण युक्रेनमध्ये वीज पुरवठा खंडीत करण्यात आला असल्याचीही महिती आहे.

क्रिकेटर ऑफ द इयर २०२२ साठी नामांकन जाहीर

इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (आयसीसी) ने गुरुवारी पुरूष टी-२० क्रिकेटर ऑफ द इयर २०२२ साठी नामांकित खेळाडूंची यादी जाहीर केली. या पुरस्कारासाठी एकूण ४ खेळाडूंचे नामांकन करण्यात आले आहे. त्यात एका भारतीयाचा खेळाडूचा समावेश आहे. या चार खेळाडूंपैकी इतर तीन खेळाडू झिम्बाब्वे, इंग्लंड आणि पाकिस्तानचे आहेत. भारतासाठी या पुरस्कारासाठी मिस्टर ३६० म्हणून प्रसिद्ध असलेल्या सूर्यकुमार यादवच्या नावाचा समावेश आहे, तर इतर तीन खेळाडू सिकंदर रझा, सॅम करण आणि मोहम्मद रिझवान आहेत.

सूर्यकुमार यादवसाठी हे वर्ष चांगले गेले. सूर्याच्या बॅटने यावर्षी ३१ सामन्यांमध्ये ४६.५६ च्या सरासरीने आणि १८७.४३ च्या अविश्वसनीय स्ट्राइक रेटने ११६४ धावा केल्या. या वर्षी सूर्यकुमार यादव हा टी-२० क्रिकेटमध्ये १००० धावांचा टप्पा पार करणारा एकमेव फलंदाज होता. या वर्षी सूर्याच्या बॅटमधून एकूण ६८ षटकार आले आहेत. तो या यादीत इतर खेळाडूंपेक्षा खूप पुढे आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.