आज पॉप क्वीन उषा उत्थुप यांचा वाढदिवस,जाणून घेऊया त्यांच्या विषयी

जन्म ८ नोव्हेंबर १९४७


तब्बल पन्नास हून अधिक वर्षे गायन क्षेत्रात असलेल्या व विशिष्ट आवाज व शैलीमुळे रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या ज्येष्ठ गायिका उषा उत्थुप यांचे गाणे फक्त वेगळे म्हणून सगळ्यांनी लक्षात ठेवले नाही , तर त्यातील नवेपणा त्यांना अधिक भावला. पहिल्यांदा हा आवाज कानावर पडला देव आनंद यांच्या ‘हरे राम हरे कृष्ण ’ या चित्रपटातील याच ओळींच्या गाण्यात जेव्हा भारतीय रसिकांनी ऐकला, तेव्हा त्यांना तो नुसता वेगळा वाटला नाही , तर त्यात एक प्रकारचा ताजेपणा आणि ताकदीचा अनुभव त्यांनी घेतला. उषा उत्थुप नावाच्या या गायिकेचे हिंदी चित्रपटातील हे पदार्पण चित्रपट संगीताला जसे उपकारक ठरले तसे रसिकांनाही ते आनंदाचे ठरले. संगीतात नव्याने येणाऱ्याला सहन करावी लागणारी मानहानी आणि अवहेलना उषा उत्थुप यांना तेवढय़ा प्रमाणात सहन करावी लागली नाही. तरीही क्लबसिंगर ते पाश्र्वगायिका हा त्यांचा प्रवास जागतिक संगीतात त्यांचे स्वत:चे स्थान निर्माण करणारा आहे , यात वाद नाही. केवळे आवाजाचे वेगळेपण हे त्यांच्या गळ्याचे वैशिष्टय़ नाही. पाश्चात्य धाटणीची म्हणजे त्या स्वररचनांची गाणी त्यांच्या गळ्याला शोभतात, असा समज त्यांच्या पदार्पणातल्याच गाण्याच्या लोकप्रियतेमुळे संगीतकारांचा होणे स्वाभाविक होते. पण उत्थुप यांनी वेगवेगळ्या प्रकारची गाणी गाऊन आपले वेगळेपण सिद्ध केले. ‘रम्बा हो.. सांबा हो..’ किंवा ‘हरी ओम् हरी ’ ही दोन गाणी लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ झाली असली , तरी खरे तर त्यांनी गायलेली अनेक गाणी रसिकांच्या स्मरणात राहणारी ठरली आहेत. उषा उत्थुप यांनी वयाच्या नवव्या वर्षी गायिका म्हणून काम सुरू केले तरीही संगीत क्षेत्रात त्यांचे खरे पदार्पण १९६९ मध्ये झाले. उषा उत्थुप यांचे वडिल पोलीस अधिकारी. त्यांचे बालपण गेलं ते भायखळ्यातल्या पोलीस क्वार्टरमध्ये. पारंपारिक तामिळ ब्राम्हण घरात शास्त्रीय संगीत शिकण्याची पद्धतच असते त्यामुळे उषा उत्थुप यांच्या घरात शास्त्रीय संगीत होतेच. पण मुळात उषा उत्थुप यांचा आवाजच वेगळ्या पठडितला. त्यामुळे संगीत शिकताच येणार नाही, आवाज सुरेल नाही म्हणून संगीताच्या वर्गातून बाहेर घालवण्यात आलेल्या उषाला शाळेतील संगीत शिक्षिकेने बरोबर ओळखले. उषा उत्थुप यांच्या मोठ्या बहिणी कधी रेडिओवर गात असत. त्यांच्याबरोबरच रेडिओ स्टेशन वर आलेल्या नऊ वर्षाच्या उषाचा आवाज अमिन सयांनींनी ऐकला आणि त्यांना एक गाणं गाण्याची संधी दिली. ‘मॉकींगबर्ड हिल’ हे रेडिओवर गाजणारं गाणं सादर झालं. आणि त्यानंतर बरेचदा रेडिओवर पॉप संगीत म्हणण्याची संधी मिळाली. रंगमंचावर गाणं सादर करण्यासाठी मात्र आपल्या मुळगावी, चेन्नईला जावं लागलं. चेन्नईमध्ये च्या माऊंट रोडवरच्या नाईन जेम्स नाईटक्लबमध्ये सहज म्हणुन नातेवाईकांबरोबर गेलेल्या उषा यांनी त्यांच्या आग्रहास्तव क्लबच्या बॅंण्डबरोबर गाणं सादर केलं. कपाळावर भली मोठी बिंदी आणि केसात गजरा अशा वेगळ्याच पण लक्ष वेधून घेणाऱ्या वेषभूषेत उषा उत्थुप जेव्हा नाइट क्लबमध्ये गाणे गायला हजर झाल्या तेव्हा अनेकांनी भुवया उंचावल्या. पण पुढे बिंदी आणि गजरा हेच या लोकप्रिय पॉपसिंगरचे ट्रेडमार्क ठरले. पंधरा भारतीय भाषा आणि डच, फ्रेंच , इटालियन, रशियन, नेपाळी अशा अनेक परकीय भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली. या भाषांमधील त्यांचे अल्बम खूपच नावाजले. जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या कार्यक्रमांना आजही अफाट गर्दी असते. कलकत्त्याच्या त्रींकास नाईट क्लब मध्ये गात असतांनाच त्यांची गाठ जानी चाको उत्थुप यांच्याशी पडली. मुळच्या केरळमधील कोट्टायमच्या असलेल्या या युवकाशी विवाह करून त्या उषा अय्यरच्या उषा उत्थुप झाल्या.
पॉप सिंगरबद्दलची जनमानसातील बुरसट कल्पना पुसून टाकणाऱ्या या गायिकेने ‘ पोथन पावा ’ या मल्याळी चित्रपटात भूमिकाही केली. उषा उत्थुप यांनी केदार शिंदे यांच्या ‘खोखो’ मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले आहे. कोलकात्यातील कॅन्सर रिसर्च सेंटरच्या कार्यक्रमात गाण्याचे निमंत्रण उषा उत्थुप यांना होते, पण त्या वेळचे सार्वजनिक बांधकाममंत्री जतीन चक्रवर्ती यांनी त्यांच्या गाण्यावर बंदी आणली. आपल्या शालीनतेवर झालेल्या या आघाताने व्यथित झालेल्या उत्थुप यांनी चक्रवर्ती यांच्यासह त्या वेळचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांच्यावरही न्यायालयात फिर्याद ठोकली. बंगालच्या सांस्कृतिकतेवर झालेला हा आघात न्यायालयानेच मिटवला आणि उत्थुप यांचा विजय झाला. भारतीयांच्या मनात असलेल्या पॉप सिंगरबद्दलच्या कल्पनांना उत्थुप यांनी छेद दिला आणि कलावंत म्हणून प्रतिष्ठा प्राप्त केली. सध्या कोलकात्यात निवास करत असलेल्या उषा उत्थुप यांनी आपल्या कर्तृत्वाने भारतीय संगीतात नवेपणा आणला. माध्यमांनी या कार्याची म्हणावी तशी दखल घेतली नाही पण रसिकांनी त्यांना मनापासून दाद दिली. समाजासाठीचे दायित्वही त्या तितक्याच उत्कटपणे पार पाडतात. अनेक सामाजिक उपक्रमांच्या आर्थिक मदतीसाठी त्या कार्यक्रम करतात. भारत सरकाने त्यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला आहे.

संजीव वेलणकर ,पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.