सोयाबीनचा पेरा आणि उत्पादन वाढल्याने बियाणे कंपन्यांचे मराठवाडय़ात लक्ष केंद्रित झाले आहे. विविध कंपन्यांचे प्रतिनिधी बाजारपेठेमध्ये सोयाबीन खरेदीकडे डोळे लावून बसले आहेत थोडासा बरा दिसणारा माल बियाणासाठी वापरला जातो व त्यावर वेगवेगळय़ा वाणांचे लेबल लावले जाते व असे बियाणे बाजारपेठेत पुढील हंगामासाठी विकले जाते .काही कंपन्या महाराष्ट्रातील माल मध्य प्रदेशात विकतात, काही मराठवाडय़ातील माल विदर्भात, तर विदर्भातील माल मराठवाडय़ात या पद्धतीने विक्री केली जाते. एकूणच सोयाबीनच्या खरेदीसाठी कंपन्यांचा सुळसुळाट झाला आहे.
गेल्या काही वर्षांत सोयाबीनचे क्षेत्र महाराष्ट्रात झपाटय़ाने वाढत असून देशातील सर्वाधिक लागवडीखालील क्षेत्र असणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. सोयाबीनचा पेरा ४२ लाख हेक्टर्सपेक्षादेखील महाराष्ट्रात अधिक असतो. सोयाबीनचे उत्पादन वाढावे यासाठी कृषी विद्यापीठांच्या वतीने नवीन बियाणे संशोधित केले जातात, त्याचे प्रयोग केले जातात व ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील यासाठी प्रयत्न केले जातात. शासकीय कंपन्यांमार्फत प्रमाणित बियाणे विक्री केले जातात, मात्र अशा बियाणांचा पुरवठा पुरेसा होत नाही. त्यामुळे खासगी कंपन्या गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात बाजारपेठेत उतरलेल्या आहेत. त्यांचे विक्री तंत्र अतिशय आक्रमक असते. विश्वासार्हतेने काम करणाऱ्या कंपन्यांचे प्रमाण कमी आहे व काही करून आपला माल विकणे यावर भर देणाऱ्या अनेक कंपन्या बाजारपेठेत उतरलेल्या आहेत. सध्या सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू झाला असून बाजारपेठेत नवीन सोयाबीन दाखल होत आहे .बियाणांचे प्रमाणित बियाणे व दुसरे सत्यतायुक्त (ट्रुथफूल) असते. प्रमाणित बियाणांचे प्रमाण कमी असल्याने व त्यात बाजारपेठेची गरज भागत नसल्याने सत्यतायुक्त बियाणांची विक्री मोठय़ा प्रमाणावर होते. कंपन्यांची कोणतीच जबाबदारी असत नाही. त्यातून शेतकऱ्याची मोठी फसवणूक होते .
पेरलेले उगवले नाही, उगवले तर त्याची नीट वाढ झाली नाही व वाढ झाली तरी पुरेशा शेंगा लागल्या नाहीत, अशा तक्रारी शेतकऱ्यांच्या येत आहेत. गेल्या तीन-चार वर्षांत सोयाबीनचे फुले संगम हे वाण बाजारपेठेत चांगले चालले आहे. हे वाण १२० दिवसांचे असून याचा उतारा चांगला आहे. काढणीच्या वेळी दरवर्षी पाऊस येतो. हे वाण पेरले तर थोडा उशीर लागत असल्यामुळे काढणीच्या वेळी पावसात सापडत नाही. त्यामुळे या वाणाच्या पेरणीचे क्षेत्र वाढते आहे. बाजारपेठेत एखाद्या शेतकऱ्याने माझे सोयाबीन फुले संगमचे आहे असे सांगितले तर त्याच्या मालाला बाजारपेठेतील भावापेक्षा क्विंटलला २०० ते ३०० रुपये वाढवून दिले जातात .तो माल खराच फुले संगम वाणाचा आहे का, हे कोणीही पाहत नाही. इथपासूनच फसवणूक करण्यामध्ये सर्व प्रकारच्या लोकांचा समावेश आहे. आपल्याला अधिकचे पैसे मिळाले पाहिजेत, ही भूमिका प्रत्येकाची असते. त्यात शासकीय यंत्रणेचा हस्तक्षेप कुठेच नसतो, त्यामुळे सगळे काही राजरोस चालते.