अकोला जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अकोला शहरापासून 23 किमी अंतरावर बार्शीटाकळी जवळ आज संध्याकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. पण या धक्क्याची तीव्रता कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवतहानी झालेली नाही. संबंधित वृत्ताला जिल्हा आपत्ती व्यावस्थापन कक्षानेदेखील दुजोरा दिला आहे.
अकोलाचे वैज्ञानिक सहायक मिलिंद धकिते आणि कार्तिक वनवे यांनी याबाबत भारतीय सेस्मॉलॉजिकल विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाच्या आधारे माहिती दिली आहे. त्यानुसार काल सायंकाळी 5 वाजून 41 मि. 18 सेकंदांनी या धक्क्यांची नोंद झाली. 20.530N आणि 77.080E या अक्षांश रेखांशावर हे केंद्र असून रिश्टर स्केलवर 3.50 इतकी तीव्रता नोंदविण्यात आली. या धक्क्यांमुळे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही, असे प्रशासनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी स्पष्ट केले आहे.