दिल्ली जल मंडळातील कथित २० कोटी रुपयांच्या घोटाळय़ाप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी भाजपने सोमवारी केली. येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामवीरसिंग बिधुरी म्हणाले, की, केजरीवाल दिल्ली जल मंडळाचे (डीजेबी) अध्यक्ष असताना २०१८ मध्ये हा घोटाळा उघडकीस आला होता. हा गैरव्यवहार प्रत्यक्षात २०० कोटींचा आहे. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतरही कोणतीही कारवाई करण्याऐवजी आरोपींचे ‘कमिशन’ वाढवण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शनिवारी दिल्ली जल मंडळाच्या २० कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल केला. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई का केली नाही, असा सवाल बिधुरी यांनी केला.
ग्राहकांकडून पाणी बिलापोटी जमा झालेले २० कोटी रुपये आरोपींनी जल मंडळाच्या बँक खात्यात जमा केले नसल्याचा आरोप आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी सप्टेंबरमध्ये मुख्य सचिवांना ‘डीजेबी’मधील आणि बँकेतील या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर तसेच यात कोणत्याही खासगी संस्थेचा हात आढळल्यास त्या संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश आधीच दिले होते, असे सांगून आम आदमी पक्षाने या चौकशीचे स्वागत केले आहे.