जागतिक लोकसंख्येनं गाठला आठ अब्जांचा टप्पा; ‘या’ देशात जन्मली आठ अब्जवी मुलगी
आजकाल काहीजण मुलीचा जन्म झाला की, आनंद साजरा करतात. काही ठिकाणी तर अगदी वाजतगाजत जल्लोषात मुलीच्या जन्माचं स्वागत केलं जातं. काही घरांमध्ये ‘पहली बेटी धन की पेटी’, असं म्हणून मुलगी झाल्याबद्दल आनंद व्यक्त होतो. एकूणच काय तर आता मुलींच्या जन्मालाही मोठ्या प्रमाणात महत्त्व दिलं जातं. अशी स्थितीत जर तुमच्या घरात जन्मलेली मुलगी जागतिक लोकसंख्येच्या दृष्टीनं अद्वितीय असेल तर? नक्कीच तुम्हाला जास्त अभिमान वाटेल.
फिलिपिन्सची राजधानी मनिलामध्ये अशाच एका अद्वितीय मुलीचा जन्म झाला आहे. ही मुलगी जगातील आठ अब्जवी व्यक्ती असल्याचं म्हटलं जातं आहे. मनिलातील विनिस मेबनसॅग या मुलीच्या जन्मासह जगाची लोकसंख्या आठ अब्ज झाली आहे, असा दावा करण्यात आला आहे.
ब्रिजभूषण सिंह पुण्यात येणार! राज ठाकरेंचे मनसे कार्यकर्त्यांना महत्त्वाचे आदेश
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपचे खासदार बृजभूषण सिंह पुण्यात येणार आहेत. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामना ब्रिजभूषण सिंह यांच्या हस्ते लावण्यात येणार आहे, त्यानिमित्त आगामी काही दिवसात ब्रिजभूषण पुण्यात येतील.
ब्रिजभूषण सिंह यांच्या पुणे दौऱ्याबाबत मनसे काय भूमिका घेणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. आता मनसे ब्रिजभूषण सिंह यांना कोणताच विरोध करणार नाही. खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच यासंदर्भातले आदेश दिले आहेत, असं मनसे नेते वसंत मोरे यांनी सांगितलं. राज ठाकरे यांनी आदेश दिला आहे म्हणून, अन्यथा आम्ही त्यांना महाराष्ट्रात पाय ठेवू दिला नसता, असंही वसंत मोरे सांगायला विसरले नाहीत.
पाकिस्तानने विकेटच फिरवली, दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा संघ फिरकीच्या जाळ्यात फसला
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज मुल्तान क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जात आहे. पहिल्या सामन्यात धावांचा डोंगर उभा करणाऱ्या इंग्लंडचा दुसऱ्या सामन्यात मात्र डाव गडगडला. रावळपिंडीत गोलंदाजांची धुलाई झाली तर मुल्तानमध्ये खेळपट्टी गोलंदाजांना पोषक अशी आहे.
इंग्लंडचा दुसऱ्या सामन्यात पहिला डाव २८१ धावात संपुष्टात आला. यात पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या अबरार अहमदने तब्बल ७ गडी बाद केले. तर जाहिद महमूदने ४८ व्या षटकात सलग दोन गडी बाद करत अबरार अहमदचं एका डावात दहा गडी बाद करण्याचं स्वप्न तोडलं. यानंतर ५२ व्या षटकात जाहिदने ५२ व्या षटकात अँडरसनला बोल्ड केलं.
महाविकास आघाडीमध्ये बिघाडी; सुप्रिया सुळे यांच्या ‘त्या’ निर्णयाविरोधात ठाकरे गट आक्रमक
महाविकास आघाडीच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. महाविकास आघाडीमधील बिघाडी पुन्हा एकदा समोर आली आहे. संसदेच्या दालनातच महाविकास आघाडीमधील मतभेद समोर आले आहेत. आज कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा प्रश्न तसेच राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी महाविकास आघाडीचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार होते. महाविकास आघाडीमधील खासदारांची अमित शाह यांच्यासोबत बैठक होती. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटातील दोन खासदारांना या बैठकीत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र ठाकरे गटाकडून सुप्रिया सुळे यांच्या या निर्णयाला विरोध झाला.
शरद पवार की अरविंद केजरीवाल? कुणाच्या पक्षाला लवकर मिळाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा?
गुजरात विधानसभा निवडणुकीचा काल निकाल लागला. यात भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला. मात्र या निवडणुकीचा फायदा जसा भाजपला झाला, तसाच तो आणखी एका पक्षाला झाला आहे. आणि हा पक्ष म्हणजे आम आदमी पक्ष!
गुजरातच्या निवडणुकीत निकालानंतर आम आदमी पक्षाला फक्त 5 जागा मिळाल्या आहेत. मात्र, असे असले तरी त्यांचा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मात्र, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कसा दिला जातो? त्याचे काही निकष असतात का? आणि राष्ट्रीय पक्ष बनल्यावर काय फायदे होतात? हेच जाणून घेऊयात.एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवायचा असेल तर त्या पक्षाला तीन महत्त्वाच्या अटींची पूर्तता करावी लागते. पहिली अट म्हणजे, या पक्षानं तीन वेगवेगळ्या राज्यांमधून लोकसभेतील किमान 2 टक्के जागा जिंकलेल्या असायला हव्यात. दुसरी अट म्हणजे लोकसभेत किमान 4 खासदार असावेत. तसंच ४ राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत किमान 6 टक्के मतं मिळायला हवीत. आणि तिसरी अट अशी की, त्या पक्षाला किमान 4 राज्यांमध्ये राज्य पक्षाचा दर्जा असावा. या तीन अटी जर एखाद्या पक्षानं पूर्ण केल्या तरच पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल केला जातो.
मोदींसोबतच्या बैठकीत महाराष्ट्राच्या खासदारांच मौन, शिवरायांच्या अपमानावर चर्चाच नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समवेत आज खासदारांची बैठक संपन्न झाली. यामध्ये विविध राज्यातील सर्वच भाजप खासदार उपस्थित होते. यामध्ये महाराष्ट्रातील भाजपचे 26 खासदार उपस्थित होते. दरम्यान पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत खासदारांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाबद्दल कोणतीही चर्चा केली नसल्याची माहिती समोर आली आहे. आज महाराष्ट्र,कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात राज्यातील खासदारांची बैठक पार पडली.
यामध्ये शिवरायांच्या अपमानाविषयी आणि महाराष्ट्र -कर्नाटक सीमाभागाविषयी चर्चा होणे अपेक्षित होते परंतु चर्चा झाली नसल्याने याबाबत महाराष्ट्राच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींसमोर का मौन पाळलं यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले, राज्यसभा खासदार प्रकाश जावडेकर, राज्यसभा खासदार आणि मंत्री पियुष गोयल, राज्यसभा खासदार अनिल बोंडे उपस्थित होते.
संघ बाहेर पडल्यानंतर स्पेनचे प्रशिक्षक एनरिक यांची हकालपट्टी
फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत स्पेनच्या सुपर १६ राउंडमधून बाहेर पडला आहे. त्यानंतर संघाचे प्रशिक्षक लुईस एनरिक यांना पहिला धक्का देण्यात आला आहे. एनरिक यांची राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. स्पेनने त्यांच्या पहिल्या सामन्यात मोठा विजय मिळवून स्पर्धेची दमदार सुरुवात केली होती, परंतु त्यांनी शेवटचा गट सामना गमावला. सुपर १६ च्या फेरीत मोरोक्कोकडून पेनल्टीवर पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडला.
‘शाळा सुरू करण्यासाठी फुले-आंबेडकर-कर्मवीरांनी भीक मागितली’, चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त विधान
गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांबाबत होत असलेल्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे. यामध्ये आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनीही उडी घेतली आहे. शाळा सुरू करण्याकरता सरकारच्या अनुदानावर अवलंबून का राहता? असा सवाल करत चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. ‘महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली होती,’ असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
औरंगाबादच्या पैठण संतपीठच्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील बोलत होते. ‘या देशात शाळा कुणी सुरू केल्या? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केल्या, बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केल्या. महात्मा फुलेंनी केल्या. या शाळा सुरू करताना गर्व्हनमेंटने त्यांना अनुदान दिलं नाही, त्यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा सुरू करतोय पैसे द्या,’ असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
सांगली : जिल्ह्यातील ४४७ गावापैकी ३८ गावच्या सरपंचांची निवड बिनविरोधी
सांगली जिल्ह्यातील निवडणूक होत असलेल्या ४४७ गावापैकी ३८ गावच्या सरपंचांची बिनविरोधी निवड झाली असून ग्रामपंचायतीचे ५७० सदस्यही बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित ४०९ गावच्या सरपंच आणि ४ हजार १४६ ग्रामपंचायत सदस्य निवडीसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे.
महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’संदर्भात कायदा होणार?
श्रद्धा वालकर खून प्रकरणाची देशभर चर्चा असताना लव्ह जिहादवरही पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात याआधीही अनेक प्रकरणांमध्ये लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे आता अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कायदा मंजूर करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. काही राज्यांमध्ये यावर गांभीर्याने विचार होत आहे. महाराष्ट्रातही असा कायदा करण्याची मागणी समोर येऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारची त्यासंदर्भातली भूमिका स्पष्ट केली आहे. याशिवाय, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर महाविकास आघाडीच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
SD Social Media
9850 60 3590