केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या कामांसाठी, धडाडीच्या उपक्रमांसाठी ओळखले जातात. भाजपमधल्या ज्येष्ठ नेत्यांपैकी ते एक आहेत. सत्तेत असताना कोणत्याही पदाची जबाबदारी दिली, तरी ते यशस्वीपणे ती पेलतात. काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांना कोरोना झाला. एकदा व्यासपीठावर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांचं वजनही खूप वाढलं होतं. या घटनांमुळे त्यांच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त होत होती; मात्र गडकरींनी हे आव्हानही व्यवस्थित पेललं आहे. आता त्यांनी त्यांचं वजन 135 किलोग्रॅमवरून 89 किलोग्रॅमपर्यंत कमी केलंय. आपल्याप्रमाणे सगळ्यांनी फिटनेसकडे लक्ष द्यायला हवं, असं त्यांनी म्हटलंय. ‘अजेंडा आज तक’ या कार्यक्रमात त्यांनी अनेक गोष्टींवर मनमोकळं भाष्य केलं.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमीच मनमोकळं बोलतात. नागरिकांशीही मोकळेपणानं संवाद साधतात. त्याप्रमाणेच ते या कार्यक्रमातही बोलले. मधल्या काळात गडकरी यांचं वजन 135 किलोग्रॅमपर्यंत पोहोचलं होतं; मात्र आता ते 89 किलोग्रॅमवर आणल्याचं ते म्हणाले. त्यांच्या खाण्याच्या आवडीविषयीही त्यांनी भरपूर गप्पा मारल्या. ‘खाणं मला मनापासून आवडतं. त्यामुळे रोज संध्याकाळी 7नंतर आज कोणत्या हॉटेलमध्ये जायचं व काय खायचं हा माझ्यासमोरचा मुख्य प्रश्न असतो; मात्र वजन कमी करण्यासाठी खाण्याच्या सवयी नाही, तर किती प्रमाणात खायचं यावर नियंत्रण ठेवलं,’ असं ते म्हणतात. त्यांचा सकाळचा दिनक्रम सव्वा तास प्राणायाम आणि त्यानंतर व्यायाम असा असतो. त्यामुळे फिटनेस आणि एनर्जी वाढली असून इतरांनीही असा फिटनेस राखावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्याबद्दल त्यांनी सरकारचं कौतुक केलं. भाजप सरकार सुप्रशासन आणि विकासाच्या मुद्द्यावर काम करतं. गुजरातमध्ये त्याची प्रचिती आली; मात्र हिमाचलमध्ये भाजपला नशिबाची साथ मिळाली नाही असं ते म्हणाले. अर्थात दोन्ही पक्षाच्या मतांमध्ये फारसा फरक नव्हता; मात्र आणखी 1-2 टक्के जास्त मतं मिळाली असती, तर भाजपचं सरकार आलं असतं, असं सांगायला ते विसरले नाहीत.
गडकरी यांच्या रस्ते आणि महामार्ग मंत्रालयातल्या कामाचं बरंच कौतुक झालं. आता त्यांनी आणखी महत्त्वाकांक्षी प्रकल्प हातात घेतले आहेत. त्यांच्याबद्दल कार्यक्रमात त्यांनी माहिती दिली. त्याच वेळी टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांच्याबद्दलही त्यांना विचारण्यात आलं. चीनमध्ये उत्पादन करून भारतात केवळ मार्केटिंग करण्याचा उद्देश असेल, तर त्यांना सरकारकडून काहीही सवलती मिळणार नाहीत, असं त्यांनी सुनावलं.
नितीन गडकरी यांनी दिल्लीतल्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली. बायो सीएनजी व बायो बिटुमेन प्रकल्पांबाबतही त्यांनी माहिती दिली. दिल्लीत उद्योगधंदे आणि वाहतुकीच्या साधनांमुळे जास्त प्रदूषण होतं. आजूबाजूच्या राज्यांतले शेतकरी शेतातले अवशेष जाळत असल्याने त्यात वाढ होते. पुढच्या 5 वर्षांत हे प्रदूषण नष्ट करण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला. शेतातल्या अवशेषांपासून बायो बिटुमेन तयार करण्याचा प्रकल्प सुरू होणार असून शेतकरीच तो तयार करतील. सरकार त्यांच्याकडून खरेदी करील, असंही गडकरी यांनी सांगितलं. सध्या त्यापासून बायो सीएनजी तयार करण्याचं काम सुरू आहे, असंही ते म्हणाले. त्याव्यतिरिक्त केसांपासून अमिनो आम्ल तयार करण्याचे प्लांट सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यासाठी तिरुपतीमधून केस खरेदी केले जात आहेत. त्या आम्लाच्या वापराने त्यांच्या शेतात 80 टन उसाचं उत्पादन झाल्याचा दाखला त्यांनी दिला.