पुण्यात अजूनही आयटी कंपन्यांचे वर्क फ्रॉम होम सुरू

कोरोना महामारीमुळे आयटी सेक्टरमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ची संस्कृती चांगलीच रुजल्याचे चित्र आहे. आयटी कंपन्यांचे प्रमुख हब बनू पाहत असलेल्या पुण्यातील बहुतांश आयटी कंपन्यांचे अजूनही ‘वर्क फ्रॉम होम’च सुरु आहे. एकीकडे राज्यातील कोरोनाचा प्रसार आटोक्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने कार्यालये सुरु करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. असे असताना पुण्यातील बहुतांश आयटी कंपन्यांनी आपली कार्यालये सुरु करण्याचा मुहूर्त नव्या वर्षातच ढकलल्याचे समोर आले आहे.

राज्य सरकार ऑक्टोबरपासून कोविडच्या निकषांमध्ये आणखी शिथिलता आणण्याच्या तयारीत आहे. असे असले तरी पुणे शहरातील बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपन्यांनी अजूनही “कार्यालयातून काम” पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला नाही. काही कंपन्यांनी सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आधीच आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलविणे सुरू केले आहे. बहुतांश कंपन्या अजूनही कोरोनाच्या धक्क्यातून सावरलेल्या नाहीत. पुणे शहरात हिंजवडी, खराडी, कल्याणी नगर आणि विमान नगरमध्ये मोठ्या प्रमाणावर आयटी कंपन्या आहेत. नवे वर्ष उजाडण्याला आता चार महिने बाकी आहेत. त्यामुळे नव्या वर्षात नवी सुरुवात करण्याचा संकल्प अनेक कंपन्यांनी केल्याचे स्पष्ट होत आहे. राज्य सरकारने 11 ऑगस्ट रोजी नवीन निर्देश जारी केले. त्यानुसार कंपन्या पूर्णपणे लसीकरण केलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयातून काम करण्यास परवानगी देऊ शकतात. परंतु प्रत्येक शिफ्टमध्ये केवळ 25% कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावण्याच्या सरकारच्या सूचना आहेत. ही सूचना अमलात आणण्यास पुण्यातील आयटी कंपन्यांनी अजून सुरुवात केलेली नाही.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले. पण त्यानुसार कर्मचाऱ्यांनी आवश्यक ती सर्व सुविधा पुरवली. आमच्या सामग्री, विक्री आणि ऑपरेशन्स टीमने ऑफिसमधून पुन्हा काम सुरू केले आहे व ते सुरूच ठेवतील. कारण कर्मचारी त्याच भौतिक जागेत अधिक कार्यक्षमतेने कार्य करतात. कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले आहेत, असे एका आयटी कंपनीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. सर्व कर्मचाऱ्यांना संपूर्ण आठवडा कार्यालयात रहावे लागणार नाही. त्यांना दिवस ठरवून दिले जातील, ज्या दिवशी त्यांना कार्यालयात यावे लागेल. सर्व कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी वेगवेगळ्या रणनीती आखात आहेत, असे औंध येथील आयटी फर्मच्या कर्मचारी नेहा आर यांनी सांगितले. इतर अनेक औद्योगिक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा घरून काम करण्याच्या लवचिकतेसह कार्यालयात बोलविणे सुरू केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.