नाशिकमध्ये पुन्हा एकदा मंगळवारी गोदावरी नदीला पूर आला आहे. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पुराचे पाणी आले असून, प्रशासनाने नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला आहे. तर जळगावला रेड अलर्ट देण्यात आला आहे.
नाशिकमध्ये 13 सप्टेंबर रोजी गोदावरीला पहिला पूर आला होता. त्यानंतर 22 सप्टेंबर रोजी दुसऱ्यांदा पूर आला. आता आजही पुन्हा एकदा गंगापूर धरणातून विसर्ग सुरू केल्याने हा वर्षातला तिसरा पूर गोदावरीला आला आहे. सध्या नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे मंगळवारी दुपारी बारापासून पुन्हा एकदा धरणातून एकूण 3000 क्यूसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे गोदावरी नदी पुन्हा एकदा ओसंडून वाहते आहे. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आले असून, नागरिकांनी नदी क्षेत्रात जावू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. काश्यपी धरण 98 टक्के भरले आहे. गौतमी गोदावरी धरणही 100 टक्के भरले आहे, तर आळंदी धरण 99 टक्के भरले आहे. हवामान विभागाने आज दिवसभर जिल्ह्यात अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
मुंबईच्या प्रादेशिक मौसम विज्ञान केंद्राच्या सूचनेनुसार 28 सप्टेंबर रोजी विभागातील नाशिकसह काही जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. नाशिक जिल्ह्यातील काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सर्व पूर प्रवण क्षेत्रातील गावांनी सावधानतेच्या अनुषंगाने नदी-नाले काठच्या परिसरातील लोकांनी सतर्क राहावे. नदी व धरण पात्रात कोणी उतरू नये.
दरम्यान, गुलाब चक्रीवादळामुळे उत्तर महाराष्ट्राला पुन्हा पाऊस झोडपून काढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नाशिक जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हस्त नक्षत्राला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. सोमवारी सकाळी 6 वाजून 42 मिनिटांनी सूर्याने हस्त नक्षात्रात प्रवेश केला. या नक्षत्राचा वाहन घोडा आहे. त्यामुळे खंडित स्वरूपाचा पाऊस होईल. यापूर्वीच्या उत्तरा नक्षत्राचे वाहन म्हैस असल्याने जोरदार पाऊस झाला, असा अंदाज दाते पंचांगामध्ये वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, हवामान विभागाने जळगावला रेड अलर्ट जारी केल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्हा आपत्ती विभागाच्या पथकांना दक्ष राहण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात जून ते ऑगस्ट दरम्यान सरासरी पेक्षा कमी पावासाची नोंद झाली. मात्र, सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला आहे.