बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याच्याशी संबंधित सहा ठिकाणी प्राप्तिकर विभागाने बुधवारी छापे टाकले. सोनू सूदच्या घरी आणिऑफिसमध्ये छापे टाकल्यानं बरीच चर्चा रंगली. यावरुन शिवसेनेनं आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे. सोनू सूदला खांद्यावर घेऊन मिरवणाऱ्यांत भाजप पुढे होता. सोनू सूद हा आपलाच माणूस असल्याचे त्यांच्याकडून सतत बिंबविण्यात येत होते, पण या सोनुने दिल्लीच्या केजरीवाल सरकारच्या शैक्षणिक कार्यक्रमाचे ‘ब्रॅण्ड ऍम्बेसेडर’ म्हणून सामाजिक कार्य करायचे ठरवताच त्यांच्यावर आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत,’ अशी शंका शिवसेनेनं व्यक्त केली आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये अभिनेता सोनू सूदने केलेल्या मदत कार्याचा देशभर गवगवा झाला. त्यातून सोनू सूदला ‘मसीहा’ ही पदवी आपसूकच बहाल झाली, अशा खोचक शब्दात शिवसेनेनं भाजपवर टीका केली आहे. भाजपाकडून आपल्या विरोधी विचारांच्या पक्षांना आणि व्यक्तींना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप आजच्या अग्रलेखात करण्यात आला आहे.