दिवाळीला सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर खरेदी होते. सोने-चांदी आणि इतर मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी लोक वर्षभर या सणाची वाट पाहत असतात. कित्येक लोक मौल्यवान दागिन्यांसह त्यांची वर्षभराची बचत वाहने आणि मालमत्ता इत्यादींमध्ये गुंतवतात. दिवाळीचा मुख्य सण धनत्रयोदशीपासून सुरू होतो आणि पुढील पाच दिवस चालतो.
धनत्रयोदशीचा दिवस सोन्या-चांदीसारख्या मौल्यवान धातूंच्या खरेदीसाठी शुभ मानला जातो. या दिवसाला खरेदीसाठी विशेष महत्त्व आहे. आपल्या देशातील बहुसंख्य लोक धार्मिक श्रद्धेमुळे मौल्यवान वस्तूंच्या खरेदीसाठीही शुभ मुहूर्त पाहतात.
धनलक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते –
धनत्रयोदशी हा संपत्ती आणि समृद्धीचा सण मानला जातो. या दिवशी लोक कुबेर आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात. हिंदूंसाठी आणि विशेषतः व्यावसायिकांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी संपत्ती आणि समृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या जातात तसेच गुंतवणुकीसाठी या दिवसाला महत्त्व दिले जाते. यावेळी धनत्रयोदशीचा सण जवळ आल्याने देशभरातील ज्वेलर्स या सणाला मोठ्या प्रमाणात खरेदीची अपेक्षा करत आहेत. म्हणूनच ते खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रकारच्या ऑफर देत आहेत.
खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम वेळा –
यावर्षी 23 ऑक्टोबर रोजी उदयतिथीला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जाणार आहे. मात्र सोने, चांदी, भांडी, कपडे आणि इतर वस्तूंच्या खरेदीचा मुहूर्त 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. म्हणजे धनत्रयोदशीच्या सणाआधीच तुम्ही खरेदीला सुरुवात करू शकता.
धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदीसाठी शुभ मुहूर्त –
धनत्रयोदशीच्या सणानिमित्त खरेदीसाठी शुभ मुहूर्त किंवा चौघडिया मुहूर्त शनिवार, 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 05:02 ते 06:27, सायंकाळी 06:02 ते 07:20 आणि रात्री 08:55 ते अर्द्धरात्री 01:56 पर्यंत आहे. 23 ऑक्टोबर रोजी सोने खरेदीचा शुभ मुहूर्त सकाळी 6.27 ते सायंकाळी 6.03 पर्यंत आहे. या दिवसाचे इतर मुहूर्त सकाळी 08:02 ते दुपारी 12:23, दुपारी 1:50 ते दुपारी 3:16 आणि संध्याकाळी 5:44 ते 06:03 पर्यंत आहेत.