देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवण्यात आला आहे. अशातच गणेशोत्सव सुरु आहे आणि येत्या दोन महिन्यात अनेक सण देशात साजरे होणार आहे. यामुळे लसीकरणावर पुन्हा एकदा भर देण्यात आला आहे. सणांचे दिवस पाहता गुरुवारी केंद्र सरकारने पुन्हा एकदा कोरोना लसीकरणावर भर दिला आहे. यासोबतच सण साजरे करताना जबाबदारी विसरू नका अशा सूचनाही सरकारने दिल्या आहेत.
सणांच्या दिवसात मास्क लावायला विसरू नका आणि सोशल डिस्टन्सिंग नियम लक्षात ठेवा, अशा स्पष्ट सूचना केंद्रानं दिल्या आहेत. मिझोरममधील कोरोनाच्या स्थितीबाबत केंद्राकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय, देशातील कोविड पॉझिटिव्हिटी रेट गेल्या 11 आठवड्यांपासून 3 टक्क्यांच्या खाली राहिला आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे डायरेक्टर बलराम भार्गव यांनी म्हटलं की, कोरोनाविरोधात राज्यांकडून पावले उचलली जात आहेत. केरळसारख्या राज्यांमध्ये संक्रमणाचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. कोरोनाची वाढती प्रकरणे रोखण्यासाठी इतर राज्येही यशस्वी होतानाच चित्र आहे. तरीही आपल्याला माहित आहे की सण जवळ येत आहेत आणि गर्दी जास्त असल्याने व्हायरस पसरण्यास मदत होते. हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.