पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धन्यवाद प्रस्तावावर काल बोलताना महाराष्ट्राचा अपमान केला. हा महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेचा अपमान आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अवमान आहे. त्यामुळे मोदींनी तात्काळ महाराष्ट्राची माफी मागावी. मोदींनी माफी न मागितल्यास उद्या राज्यभरात भाजपच्या कार्यालयाबाहेर आंदोलने केली जातील, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला आहे. तसेच राज्यातील भाजप नेत्यांना महाराष्ट्राप्रती थोडीफार आस्था असेल तर त्यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याचा निषेध करावा अन्यथा महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांची ‘महाराष्ट्र द्रोही’ म्हणून नोंद केली जाईल अशी टीकाही पटोले यांनी केली.
काल मोदींनी काँग्रेसवर गंभीर आरोप केला होता. मुंबईत काँग्रेसने कोरोना फैलावण्यासाठी मजुरांना त्यांच्या गावी पाठवले. त्यासाठी मजुरांना पैसे दिले होते, असा आरोप मोदींनी केला होता.
नाना पटोले यांनी गांधी भवन येथे पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. महाराष्ट्रातील जनतेने भाजपला सत्तेतून दूर केल्यापासून गल्ली पासून दिल्लीपर्यंतच्या भाजपच्या सर्व नेत्यांना महाराष्ट्र द्वेषाची कावीळ झाली आहे. त्यामुळे ते दररोज महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी खोटी नाटी षडयंत्रे रचत आहेत. आता तर पंतप्रधानांनी महाराष्ट्र द्वेषाच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना त्यांनी महाराष्ट्राचा अवमान केला आहे. पंतप्रधान हे संपूर्ण देशाचा असतो याचाही त्यांना विसर पडला आहे. त्यांनी पंतप्रधानपदाची गरिमा घालवली असून ते फक्त भाजपचे प्रचारक झाले आहेत, असं पटोले म्हणाले.
संकटात, अडचणीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीची मदत करण्याचा मानवधर्म आणि महाराष्ट्र धर्म काँग्रेस पक्षाने आणि महाविकास आघाडी सरकारने निभावला. उपासमारीची वेळ आलेल्या परप्रांतीय बांधवांच्या जेवणाची व्यवस्था केली आणि त्यांचे तिकीट काढून त्यांना त्यांच्या घरापर्यंत सुरक्षित व सन्मानाने पोहोचवले. जेव्हा हे मजूर अडचणीत होते तेव्हा त्यांना मदत करण्याऐवजी पंतप्रधान लोकांना टाळ्या थाळ्या वाजवायला सांगत होते आणि आपल्या निवासस्थानी मोरांना दाणे खाऊ घालण्यात व्यस्त होते, अशी टीकाही त्यांनी केली.
त्यांना सर्वसामान्य जनतेपेक्षा आपल्या उद्योगपती मित्रांची जास्त काळजी आहे. संपूर्ण कोरोना काळात जनतेला मरायला सोडून मोदी आपल्या उद्योगपती मित्रांना देशाची संपत्ती वाटत होते. कोरोनाच्या संकटाच्या सुरुवातील नमस्ते ट्रम्प सारखे कार्यक्रम करून देशात कोरोनाचा प्रसार करणारे नरेंद्र मोदीच कोरोनाचे खरे स्प्रेडर आहेत. मोदीजी ज्यांच्यावर आरोप करत आहेत ते परप्रांतीय मजूर बांधव तर कोरोना वॉरियर आहेत, असा टोला त्यांनी लगावला.