शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी गेल्या अनेक दिवसांपासून गुवाहाटीतील रॅडिसन ब्लू या हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला आहे. काल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन सध्याचं सरकार अल्पमतात असल्याने बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीनंतर गुवाहाटीतही हालचाली सुरू झाली आहे. यानंतर एकनाथ शिंदेंनीही आमदारांची बैठक घेतली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी 30 जून रोजी राज्यपाल सरकारला बहुमत चाचणीसाठी बोलावले आहे.उद्या गुवाहाटीतील बंडखोर आमदार आपला मुक्काम मुंबईत हलवणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ते सर्वजण विशेष विमानाने निघणार आहे. त्यांना मुंबईतच आणणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. केंद्रीय पोलीस यंत्रणेच्या सुरक्षेत सर्व आमदार मुंबईत येणार असल्याची सूत्रांची माहिती समोर आली आहे.
एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदार महाराष्ट्रात कधी परतणार याची प्रतीक्षा होती. याबाबत एकनाथ शिंदे यांनी स्वत: माहिती देत उद्या मुंबईत पोहोचणार असल्याचं सांगितलं. गुवाहाटीताल कामाख्या देवीच्या दर्शनासाठी एकनाथ शिंदे आज गेले होते, तेथे त्यांनी ही माहिती दिली.
राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याच्या आशयाचं पत्र महाविकास आघाडीला दिल्यानंतर शिंदे गटाच्या निर्णयाकडे सर्वाचं लक्ष होतं. त्यावर बोलताना एकनाथ शिंद यांनी म्हटलं की, सर्व आमदारांना घेऊन आम्ही बहुमत चाचणीसाठी उद्या मुंबईमध्ये पोहोचणार आहोत. सर्व प्रक्रिया आम्ही पूर्ण करु.