टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये गुरुवारी (१० नोव्हेंबर) होणाऱ्या उपांत्य फेरीतील सामन्याआधीच भारतीय क्रिकेट चाहत्यांना चिंतेत टाकणारी एक बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा सरावादरम्यान किरकोळ जखमी झाला आहे. रोहितच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. सराव करताना उसळी घेणारा एक चेंडू लागल्याने रोहित जखमी झाला. मात्र ही जखम किती गंभीर आहे याची माहिती सध्या समोर आलेली नाही. मात्र रोहित या उपांत्य सामन्यामध्ये खेळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तरीही त्याच्या दुखापत किती गंभीर आहे यावर अंतिम निर्णय घेतला जाईल अशीही चर्चा आहे.
भारतीय संघ सध्या उपांत्य फेरीतील सामन्याआधी सराव करत असून याच सरावादरम्यान एक उसळी घेणारा चेंडू रोहितच्या उजव्या हाताला लागला. यानंतर रोहितने सराव थांबवला. भारतीय संघ नेट्समध्ये सराव करत असताना घडलेला हा प्रकार आणि त्यानंतर रोहितने सराव थांबवून ब्रेक घेतल्याचं या सराव सत्रांमधील व्हिडीओंमध्ये दिसत आहे. ॲडलेडच्या मैदानावर होणाऱ्या सामन्याआधी सुरु असलेल्या सरावातील दुखापतीमुळे भारतीय चाहत्यांंबरोबर संघ व्यवस्थापनाचंही टेन्शन वाढलं आहे. रोहितला नेमकी काय दुखापत झाली आहे यासंदर्भात भारतीय क्रिकेट नियमन मंडळाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
रोहितच्या जागी कोण खेळू शकतं?
रोहितची दुखापत गंभीर असेल तर दिपक हुडाला किंवा दिनेश कार्तिकला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान दिलं जाईल. दिपक हुडा आणि ऋषभ पंत हे भारतीय संघामध्ये सलामीवीर म्हणून फलंदाजीला उतरु शकतील. झिम्बाब्वेविरुद्धचा सामना पंत खेळला होता. हुडा आणि पंत दोघांनीही यापूर्वी सलामीला फलंदाजी केली आहे. याशिवाय विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवचाही सलामीवीर म्हणून विचार केला जाऊ शकतो. मात्र भारत मधल्या फळीतील फलंदाजांना हात लावण्यासंदर्भात नक्कीच शासंक असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
याच वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिका दौऱ्याला रोहित मुकला होता. तर जुलै महिन्यात इंग्लंडविरुद्ध झालेल्या एकमेव कसोटी सामन्यातही करोनाची बाधा झाल्याने रोहितला मैदानात उतरता आलं नव्हतं. त्यामुळे आता रोहितची जागा कोण घेणार की रोहित खेळणार हे येणाऱ्या दिवसांमध्ये स्पष्ट होईल. दरम्यान दीड ते दोन तासांचा ब्रेक घेतल्यानंतर रोहित पुन्हा सरावासाठी नेट्समध्ये दिसून आल्याचं वृत्तही समोर आलं असून त्यामुळे रोहितची दुखापत गंभीर नसावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तरी बीसीसीआयकडून अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही.
रोहितला यंदाच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये फलंदाजीत फारशी कमाल दाखवला आली नसली तरी कर्णधार म्हणून तो यशस्वी ठरला आहे.