देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीतून गंभीर आजाराच्या गरीब रुग्णांना सर्वाधिक मदत मिळाली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर करोनासह इतर कारणांनी मदतीवर मर्यादा आली, परंतु एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर मदतीचा ओघ पुन्हा वाढला आहे. परंतु प्रति रुग्ण सर्वाधिक मदत फडणवीस यांच्याच काळातच झाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसत आहे.
दुर्मीळ व विविध गंभीर आजाराचे गरीब रुग्णांना तांत्रिक कारणाने राजीव गांधी व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळत नसल्याने त्यांना उपचार घेता येत नव्हते. हा प्रकार तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीद्वारे मदतीची प्रक्रिया सोपी केली. त्यानुसार मुंबईच्या धर्तीवर नागपुरातील मुख्यमंत्री सचिवालयातही हे कार्यालय सुरू केले. त्यामुळे विदर्भासह जवळपासच्या रुग्णांना मुंबईत चकरा न मारता नागपुरात मदतीसाठी अर्ज करणे शक्य झाले. फडणवीस मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीतून हृदय रुग्णांना बायपास शस्त्रक्रियेसाठी दीड लाख, एन्जिओप्लास्टीसाठी १ ते १.३० लाख रुपये, कर्करोगग्रस्तांना ७५ हजार ते १ लाख, अस्थिरोगाच्या रुग्णांच्या हिप व नी प्रत्यारोपणासाठी ७५ हजार ते १ लाख व इतर आजारासाठीही मदत दिली जात होती, परंतु उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर करोनासह इतर नवीन संकटामुळे प्रति रुग्ण मदतीची रक्कम खूपच कमी झाली. यावेळी हृदय रुग्ण, कर्करुग्ण, हिप व नी प्रत्यारोपणाच्या रुग्णांला ३० हजार ते ५० हजारांपर्यंतच मदत मिळाली. आता शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर हृदय रुग्ण, कर्करुग्णासह इतरही रुग्णांना प्रति रुग्ण एक लाखापर्यंत मदत मिळत आहे.
अर्थसाहाय्य मिळालेले रुग्ण
वर्ष अर्ज अर्थसाहाय्य प्राप्त रक्कम
१-०१-१५ ते ३१-०३-१६ ७,०९३ ४,८६७ ३४,८२,०८,६७९
१-०४-१६ ते ३१-०३-१७ १७,१५० १३,१४ ६१,४५,७६,१५,५०१
१-०४-१८ ते ३१-०३-१९ ३४,२६१ १८,८३६ १,८८,७१,९९,२०६
१-०४-१९ ते ३१-०३-२० २२,०९३ ९,८१० ६९,४९,८८,७१५
१-०४-२० ते ३१-०३-२१ ४,३९५ १,७८४ ८,३९,८२,८००
१-०४-२१ ते ३१-०३-२२ ६,३१७ २,४६३ ११,८९,३९,८६०