सरकारच्या निष्काळजीपणामुळे
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात
महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. करोनाच्या ताणाबरोबर बोर्डाच्या परिक्षा होणार की नाही? या तणावाला लाखो विद्यार्थी, पालक सामोरे जात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने लवकरात लवकर दहावी, बारावीच्या परीक्षेबाबत योग्य निर्णय घ्यावा.”, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आता वर्षानंतर एक बूस्टर
डोस घेण्याची आवश्यकता
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लसीकरण सुरू असताना लसींचा परिणाम किती वेळ टिकणार यावर सध्या चर्चा सुरू आहे. एकदा लस घेतल्यानंतर अनेक वर्षे कोरोनाच्या गंभीर संक्रमणापासून बचाव होऊ शकतो, असा दावा लसीकरणाचा अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकांनी केला आहे. परंतु संसर्ग रोखण्यासाठी एका वर्षानंतर एक बूस्टर डोस घेण्याची आवश्यकता आहे, असे त्यांचे मत आहे.
वुहानच्या प्रयोगशाळेतून
करोनाचा फैलाव झाल्याचा दावा
करोना महामारीने गेल्या दीड वर्षांपासून जगभरात थैमान घातला असून त्याची सुरुवात नेमकी कुठून झाली याबाबत अद्यापही वाद सुरु आहे. चीनमधूनच करोनाचा फैलाव झाल्याचा अनेक देशांचा आरोप असून चीनने मात्र हा आरोप फेटाळला आहे. यादरम्यान आता एक नवी माहिती समोर आली आहे, ज्यानुसार वुहानच्या ज्या प्रयोगशाळेतून करोनाचा फैलाव झाल्याचा दावा केला जात आहे तेथील तीन कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी जगाला करोना संसर्गाची कोणतीही कल्पना नव्हती.
ऍलोपॅथी बाबतचे विधान
बाबा रामदेवांनी घेतले मागे
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी अॕलोपॕथिक औषधांच्या विरोधात योग गुरू रामदेव बाबा यांचे विधान दुर्दैवी असल्याचे सांगत आपले शब्द परत घेण्याचे आवाहन रामदेव बाबांना केले आहे. त्यानंतर काही तासांतच रामदेव बाबांनी आपले विधान मागे घेतले. उपचारपद्धतिच्या संघर्षावर उद्भवलेल्या वादाला विराम देऊन मी आपले विधान मागे घेत आहे, असे रामदेव यांनी म्हटले आहे. रामदेव यांनी अॕलोपॕथिक उपचारपद्धतीला मुर्ख विज्ञान म्हटले आहे. रेमडेसिविर, फॅबिफ्ल्यू आणि भारतातील औषध महायंत्रक मान्यता असलेली इतर औषधे कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात अपयशी ठरले आहे, असे रामदेव यांचे म्हणणे आहे.
परमबीर सिंग यांना एफआयआर
प्रकरणात अटकेपासून दिलासा
मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी दाखल केलेल्या एफआयआर प्रकरणात अटकेपासून दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी ९ जून पर्यंत पुढे ढकलली आहे. उन्हाळी सुट्टीनंतर नियमीत खंडपीठासमोर यावर सुनावणी होणार आहे.
आयरन डोम सिस्टीम ९० टक्के
मिसाईल्स हवेतच उध्वस्त करतात
इस्त्राईलकडे जगातील सर्वात अत्याधुनिक अशी संरक्षण प्रणाली आहे. त्यातीलच एक म्हणजे हवेतच रॉकेट उद्धवस्त करण्याची यंत्रणा मिसाईल एअर डिफेन्स सिस्टीम अशी ओळख असलेल्या या नव्या तंत्रज्ञानाचे सर्वांनाच आकर्षण आहे. इस्राईलच्या या नव्या एअर डिफेन्स सिस्टीमला आयरन डोम म्हटले जाते. इस्राईलच्या सेनेचा दावा आहे की त्यांची आयरन डोम सिस्टीम शत्रूंच्या ९० टक्के मिसाईल्सला हवेतच उध्वस्त करू शकतात. ही एअर डिफेन्स सिस्टीम शत्रूच्या ड्रोनलाही नेस्तनाबूत करते.
एव्हरेस्टवर १०० हून अधिक
जणांना करोनाची लागण
करोनाचा प्रादुर्भाव जगातील सर्वात उंच शिखर असणाऱ्या माऊंट एव्हरेस्टवरही झालाय. माऊंट एव्हरेस्टवर कमीत कमी १०० हून अधिक जणांना करोनाची लागण झाली आहे. गिर्यारोहक आणि त्यांच्या साथीदारांना करोनाची लागण झाल्याचा दावा एका गाइडने केला आहे. मात्र करोना रुग्ण आढळल्याचा गाईडचा दावा नेपाळ सरकारने फेटाळून लावला आहे. त्यामुळे गाइड खरं बोलतोय की नेपाळ सरकार काही लपवतंय याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
हिंदू पुनर्जागरणासाठी दिल्लीचे
नाव इंद्रप्रस्थ करणे आवश्यक
भाजप नेते व राज्यसभा सदस्य डॉ. सुब्रमण्यम स्वामी त्यांच्या आणखी एका विधानासाठी देशात चर्चेत आले आहेत. त्यांनी देशाची राजधानी दिल्लीचे नाव बदलून इंद्रप्रस्थ करण्याची मागणी केली आहे. त्यांनी एका ट्वीटमध्ये ‘हिंदू पुनर्जागरणासाठी दिल्लीचे नाव इंद्रप्रस्थ करणे आवश्यक आहे, असे म्हटले आहे. तामिळनाडूतील एका महान संतांने मला सांगितले आहे की, जोपर्यंत आपण राजधानीचे दिल्ली नाव बदलून इंद्रप्रस्थ करीत नाही, तोपर्यंत देशात विविध घटनांच्या माध्यमातून उलथापालथ होत राहील, असेही स्वामी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
सुशील कुमारने १९ दिवसात ५ राज्यातील
१९ ठिकाणे आश्रयासाठी वापरली
सुशील कुमारने ओळखीतील व्यक्तींच्या मदतीने ठिकठिकाणी आश्रय घेतला. ऋषिकेशमधील हरिद्वार येथील आश्रमशाळेत तीन ठिकाणी सुशीलकुमार थोडा वेळ थांबला. त्यानंतर दिल्लीतच त्याने चार वेळा आपले लपण्याचे ठिकाण बदलले. बहादूरगडमध्येही तो तीन वेगवेगळ्या ठिकाणी थांबला. यानंतर तो झज्जरमध्येही दोन ठिकाणी थांबला. त्यानंतर चंदीगडला गेला, तेथे त्याने दोन ठिकाणे बदलली. पश्चिमी दिल्लीला तो पोहोचला. येथूनच पोलिसांनी त्याला अटक केली. सुशील कुमारने दिल्लीपासून फरार झाल्यानंतर पुन्हा दिल्लीत येण्यापर्यंत १९ दिवसात ५ राज्यातील १९ ठिकाणे आश्रयासाठी वापरली.
केंद्र सरकारने २१ कोटींपेक्षा जास्त
लसींच्या मात्रा उपलब्ध केल्या
कोविड19 प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील व्यापक आणि गतिशील धोरणाला १ मे २०२१ पासून सुरुवात झाली. नियोजित धोरणानुसार, दर महिन्याला कोणत्याही लस उत्पादकाकडून ५० टक्के मात्रा, केन्द्रीय औषध प्रयोगशाळा (CDL) केंद्र सरकारच्या माध्यमातून खरेदी करेल. आधी ठरल्याप्रमाणे या मात्रा राज्य सरकारांना मोफत उपलब्ध केल्या जात राहतील. मोफत आणि राज्यांकडून थेट खरेदी अशा दोन्ही माध्यमातून केंद्र सरकारने आतापर्यंत २१.८० कोटींपेक्षा जास्त लसींच्या मात्रा (२१,८०,५१,८९०) राज्ये, केन्द्र शासित प्रदेशांना उपलब्ध केल्या आहेत.
संसर्ग दर १० टक्क्यांहून खाली
व्यवहार सुरळीत होण्याची शक्यता
संसर्ग दर १० टक्क्यांहून खाली आला असून, तो आणखी खाली येण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.. तेथे व्यवहार सुरळीत करता येऊ शकतात. कोरोनाच्या दुस-या लाटेतून देश बाहेर पडत असल्याचे संकेत मिळत आहेत. दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, छत्तीसगड, बिहारसारख्या राज्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर पाच टक्क्यांहून कमी आला आहे.
काँगो देशात ज्वालामुखी
एक लाखाहून अधिक लोक बेघर
आफ्रिकन खंडाच्या मध्यभागी असलेल्या काँगो देशातील गोमा शहराजवळील विरुंगा डोंगरावर १९ वर्षांनंतर अचानक निरागंगा ज्वालामुखीचे पुनरुत्थान झाले. जगातील सर्वात धोकादायक आणि सक्रिय ज्वालामुखींमध्ये याची गणना केली जाते. स्थानिक प्रशासनाने इशारा दिल्याबरोबर शहरातील हजारो लोक जीवनावश्यक वस्तू घेऊन रवांडाला जायला लागले. पळापळी दरम्यान झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. लावामुळे ५०० हून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. एक लाख वीस हजाराहून अधिक लोक बेघर झाले.
पुण्यात वादळी
पावसाची शक्यता
पुणे शहरात मंगळवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागातून वर्तविण्यात आली आहे. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास पुण्यात पावसाला (Rain) सुरुवात होईल. हा पाऊस मुसळधार स्वरुपाचा असू शकतो. त्यानंतर बुधवारी सकाळपासून पुण्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मान्सूनचा पाऊस केरळच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.
माजी मुख्यमंत्री कमलनाथ
यांच्या विरुद्ध तक्रार दाखल
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याविरोधात क्राईम ब्रँचमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम 188 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 54 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोटी माहिती पसरविल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.
26 मे हा दिवस काळा दिवस
पाळण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार
मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरु झालेल्या शेतकरी आंदोलनाला 26 मे रोजी 6 महिने पूर्ण होत आहेत. 6 महिने होऊनही सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत. त्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी 26 मे हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. या दिवशी देशभरात आंदोलनं होणार आहेत. याला काँग्रेसह देशातील 12 विरोधी पक्षांनी पाठिंबा दिलाय.
SD social media
9850 60 3590