देशभरात कोरोना थैमान घालत आहे. कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. यात अनेक कुटुंबांमध्ये तर घरातील कर्ता माणूसच कोरोनामुळे मृत्यू पावल्यानं उपासमारीची वेळ आली. याच पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने अशा कुटुंबांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत 4 मोठ्या घोषणा केल्या. यात कोरोनामुळे आपला जीव गमावावा लागलेल्या रुग्णांच्या कुटुंबांना मदतीचा हात दिलाय. तसेच ज्या घराती कर्ता माणूस गेला त्या कुटुंबाला पेन्शनचीही घोषणा केली.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, “दिल्लीत अनेक कुटुंबांमध्ये कमावणाऱ्या व्यक्तीचाच कोरोनामुळे मृत्यू झालाय. अनेक मुलांच्या डोक्यावरील आई वडिलांचं छत्र हरलंय. दुसरीकडे अनेक आईवडिलांच्या कमावणाऱ्या मुलांचा मृत्यू झालाय. अशा कुटुंबांना कशी मदत करता येईल यावर दिल्ली सरकार विचार करत होती. आज यावरील निर्णयांची घोषणा करत आहोत.”
ज्या लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला त्यांच्याबद्दल आम्हाला दुःख आहे. संकटाच्या काळात मदत म्हणून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबांना प्रत्येकी 50 हजार रुपये देणार.
ज्या कुटुंबातील कमावती व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालाय त्या कुटुंबांना दरमहा 2500 रुपयांची पेन्शन दिली जाणार.
ज्या मुलांना कोरोनामुळे आपले आई वडील गमवावे लागलेत त्यांना दरमहिना 2500 रुपये पेन्शन देणार. तसेच त्यांना मोफत शिक्षणाची व्यवस्था करणार.
दिल्लीतील केजरीवाल सरकार 72 लाख रेशनधारकांना दर महिन्याला 5 किलो रेशन देते. या महिन्यात केंद्र सरकार देखील 5 किलो देणार आहे. या महिन्यातील रेशन मोफत असणार आहे.