अमेरीकेत कोरोनाचा अक्षरश: स्फोट झालाय. तिथं दिवसाला 1 लाख नवे कोरोना रुग्ण सापडतायत. गेल्या पाच दिवसात रुग्ण मिळण्याची ही संख्या कायम आहे. त्यामुळेच दुसऱ्या लाटेतही अमेरीकेनं जगाला धडकी भरवली होती आणि आता ऐन ख्रिसमसच्या आधी एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण मिळत असल्यानं भीती व्यक्त केली जातेय. राष्ट्रपती बायडन यांनी अनेक नव्या नियमांची, निर्बंधांची घोषणा केलीय. विशेष म्हणजे यात ओमिक्रॉनच्या संशयित रुग्णांची संख्या मोठी आहे. तर दुसरीकडे पश्चिम यूरोपात जवळपास प्रत्येक देशात आता ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळेच आफ्रिका, पश्चिम यूरोप आणि अमेरीका हे तिनही खंड कोरोनाच्या विळख्यात सापडलेत.
अमेरीका तसच आफ्रिकेतल्या कोरोनाच्या लागण होण्याच्या प्रमाणात एक गोष्ट स्पष्टपणे दिसून आलीय. ती म्हणजे लसीचा इफेक्ट. अमेरीकेत ज्यांनी लस घेतलेली नाही अशांना कोरोनाची लागण तसच ओमिक्रॉनची लागण होण्याचं प्रमाण जास्त आहे. तसच लस न घेतलेल्यांचं मृत्यूचं प्रमाणही घेतलेल्यांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे आपल्याकडेही ज्यांनी एकच लस घेतलीय त्यांनी दुसरी लस घेणही गरजेचं आहे. ओमिक्रॉनविरुद्धच्या लढ्यात लस हाच फॅक्टर मोठी भूमिका वठवण्याची शक्यता जाणकार व्यक्त करतायत.
अमेरीकेत दिवसाला एक लाख रुग्ण सापडतायत, आफ्रिका, यूरोपची आकडेवारीही चिंताजनक आहे. आगामी काळ ख्रिसमसच्या सुट्ट्यांचा आहे. त्यामुळे गर्दी, पर्यटन, भेटीगाठी ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर ह्या आकडेवारीत आणखी भर पडण्याची भीती व्यक्त केली जातेय. दक्षिण आफ्रिकेतल्या बहुतांश देशातही ओमिक्रॉनचे रुग्ण सापडलेत. दक्षिण आफ्रिकेत दिवसाला 4 हजार रुग्ण सापडतायत. पॉझिटिव्हिटी रेट हा 24 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. 16,055 एवढे नवे रुग्ण सापडलेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही टक्केवारी 468 टक्क्यानं अधिक आहे. इंग्लंडमध्ये ओमिक्रॉनचे 75 नवे रुग्ण सापडलेत. एकूण संख्या 134 एवढी आहे. इस्त्रायलमध्ये सलग दुसऱ्या दिवशी कोरोनानं एकही मृत्यू नाही. ओमिक्रॉनची भीती इस्त्रायलमध्येही आहे. इतर देशांशी सीमाही बंद केल्या गेल्यात. ओमिक्रॉन हा डेल्टापेक्षा (Delta) घातक आहे पण अजून तरी कुठल्याच देशातून मृत्यूचा भीतीदायक आकडा समोर आलेला नाही. पण म्हणून हुरळून जाण्याचं कारण नाही. कारण ओमिक्रॉनचा अभ्यास प्राथमिक टप्यात आहे. आता त्याचे गंभीर परिणाम दिसत नसले तरी पुढं त्यामुळे काय उद्भवेल याची माहिती नसल्याचं जाणकारांना वाटतं.