गजानन महाराजांच्या दर्शनाने नववर्षाची सुरुवात, हजारो भाविकांनी घेतले ‘श्रीं’चे दर्शन
सलग सुट्ट्या व नवीन वर्षाचे औचित्य साधून लाखो भाविक संतनगरी शेगावात दाखल झाले. वर्षाअखेर (दि.३१) मंदिर रात्रभर खुले राहिल्याने भाविकांनी ‘श्रीं’चे दर्शन घेतले. यामुळे ‘गण गण गणात बोते’च्या गजराने मंदिर परिसर दुमदुमला.गजानन महाराज मंदिरावर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई, मूर्ती व मंदिर परिसरात केलेली सजावट, संस्थानतर्फे करण्यात आलेली व्यवस्था, रात्रभर भाविकांच्या सेवेत तैनात शेकडो सेवेकरी असा रविवारच्या रात्रीचा थाट होता. कडाक्याच्या थंडीची तमा न बाळगता जिल्हा, विदर्भसह राज्यातील हजारो भक्तांनी समाधीस्थळाचे दर्शन घेतले. मंदिर व आजूबाजूचा परिसर भाविकांनी गजबजल्याचे दिसून आले. लाखो भाविकांनी आपल्या लाडक्या दैवताजवळ नवीन वर्षाचा संकल्प बोलून दाखविला.
शनिवार व रविवार पाठोपाठ आज सोमवारी नवीन वर्षानिमित्त संतनगरी भाविकांनी गजबजल्याचे दिसून आले. राज्यभरातील भाविक नववर्षारंभाला श्रीचरणी नतमस्तक होतात. आज सोमवारी सकाळीदेखील भाविकांच्या दीर्घ रांगा कायम होत्या. यामुळे दर्शनासाठी अडीच तास लागत आहे. मुखदर्शन वीसेक मिनिटांत होत असल्याचे चित्र आहे.
‘सर्वात वाईट अवस्था माझी’, जितेंद्र आव्हाडांची खंत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गेल्या काही दिवसांपासून ‘टू द पॉईंट’ या पॉडकास्ट कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. पहिल्या भागात त्यांनी जयंत पाटील यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमधून जयंत पाटील यांनी अजित पवार गट आणि भाजपावर शरसंधान साधले होते. आता दुसऱ्या भागात जितेंद्र आव्हाड यांची मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीची एक झलक नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या दीड मिनिटाच्या व्हिडिओमध्ये साधारण मुलाखतीमध्ये काय काय असेल, याचा अंदाज येत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केलेली दिसते. छगन भुजबळ यांना तर त्यांनी पोपट म्हणून संबोधले आहे.
‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’मुळे हवामानात बदल, महाराष्ट्रावर पावसाचे सावट
‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’मुळे हवामानात प्रचंड बदल होत असून आठवड्याच्या उत्तरार्धात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. किमान तापमान १२ अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे.देशभरात सर्वच ठिकाणी हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. महाराष्ट्रातील विदर्भात किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपेक्षाही कमी गेला होता. त्यामुळे आता तरी कडाक्याची थंडी अनुभवायला मिळणार असे वाटत असताना हवामानात पुन्हा एकदा बदल घडून आलेत. पहाटेच्या सुमारास धुक्याची चादर अनेक ठिकाणी असली तरी ढगाळ हवामानदेखील राज्यात दिसून येत आहे. त्यामुळे पहाटे व रात्री साधारण थंडी तर दिवसा मात्र उकाडा आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसांत विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे. पुण्यातदेखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील काही आणि विदर्भातील नागपूरसह काही अशा एकूण २२ जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहील असा अंदाज आहे.
नव्या वर्षांत सरकारी महोत्सवांची रेलचेल; प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक, युवा महोत्सव, महानाटय़
सोमवारपासून सुरू होणारे २०२४ हे नवे वर्ष निवडणुकीचे असल्याने राज्य शासनाने पहिल्या सहा महिन्यांतच विविध विभागांच्या माध्यमांतून अनेक महोत्सवांचे आयोजन केले असून त्यासाठी घसघशीत आर्थिक तरतूदही केली आहे.२०२३ पासूनच अनेक सरकारी कार्यक्रमांच्या माध्यमातून शासनाच्या कामाची प्रसिद्धी व प्रचार सुरू आहे. कधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विविध गावांमधील माती गोळा करणे असो किंवा विकास यात्रेच्या माध्यमातून केंद्राच्या योजनांची माहिती देणे असो. महाराष्ट्र सरकारही यात मागे नाही, ‘सरकार आपल्या दारी’च्या माध्यमातून राज्यभर अनेक कार्यक्रम राज्याच्या विविध भागात झाले आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या २०२४ ची सुरुवातही विविध महोत्सवांच्या माध्यमातून होत आहे. सांस्कृतिक विभागाच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १५ जानेवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात सलग पाच दिवस महासंस्कृती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विविध राज्यातील संस्कृतीचे आदानप्रदान, लुप्त होत चाललेल्या संस्कृतीचे जतन व संवर्धन आणि स्वातंत्र्यलढय़ाची माहिती लोकांपर्यंत पोहचवणे यासाठी हा कार्यक्रम असल्याचे या खात्याच्या २२ डिसेंबरला काढलेल्या शासन निर्णयात नमूद आहे.
झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्याजागी त्यांच्या पत्नी मुख्यमंत्री होणार? भाजपा खासदाराचा दावा
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे लवकरच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असून त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेऊ शकतात, असा खळबळजनक दावा भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी केला आहे. झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) पक्षाच्या आमदाराने नुकताच आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून विधीमंडळाने तो स्वीकारला आहे. तसेच मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीचे सातवे समन्स प्राप्त झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपा खासदार दुबे यांनी हा दावा केला आहे.
जपानमध्ये तीव्र भूकंपानंतर समुद्रात उसळल्या १.२ मीटर उंचीच्या लाटा
जपानमध्ये सोमवारी ( १ जानेवारी ) ७.६ ‘रिश्टर स्केल’ तीव्रतेचा जोरदार धक्का बसला आहे. यानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. अशातच जपानच्या किनारपट्टीवर १.२ मीटर उंचीच्या लाटेनं धडक दिली आहे. इशिकावा परिसरातील वाजिमा किनाऱ्यावर १.२ मीटर उंचीच्या लाटा उसळल्या आहेत.
मागच्या १० वर्षातील भारताच्या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं? पंतप्रधान मोदींनी मागितला अभिप्राय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आता दहा वर्ष पूर्ण होत आहेत. पुढील काही महिन्यात भारतात लोकसभा निवडणुका संपन्न होणार आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदींनी सरकारच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी थेट जनतेकडून अभिप्राय मागितला आहे. आज नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोदी यांनी आपल्या एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट टाकली आहे. यामध्ये ‘जन मन सर्व्हे’ या उपक्रमाअंतर्गत भारताने मागच्या दशकभरात कोणकोणत्या क्षेत्रात प्रगती साधली, याबद्दलचा अभिप्राय मागितला आहे.
SD Social Media
9850603590