राम लल्लाची मूर्ती झाली निश्चित; प्रसिद्ध शिल्पकार योगिराज अरुण यांना मिळाले भाग्य
राम मंदिरातील प्रभु रामाची मूर्ती निश्चित झाली आहे. देशातील प्रसिद्ध शिल्पकार योगिराज अरुण यांनी बनवलेली राम लल्लाची मूर्ती राम मंदिरात ठेवण्यात येणार आहे. मंत्री प्रल्हाद जोशी यांनी एक्सवर पोस्ट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे.प्रल्हाद जोशी यांनी म्हटलंय की, जेथे राम, तिथे हनुमान. अयोध्यामध्ये भगवान रामाच्या प्राण प्रतिष्ठेसाठी मूर्तीची निवड करण्यात आली आहे. आपल्या देशातील प्रसिद्ध शिल्पकार योगीराज अरुण यांची मूर्ती अयोध्येतील राम मंदिरात विराजमान होईल.२२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी मूर्तीची निवड करण्यात येणार होती. अखेर प्रसिद्ध शिल्पकार योगिराज अरुण यांनी बनवलेली मोहक मूर्ती निवडण्यात आली आहे. योगिराज अरुण यांच्या आई सरस्वती यांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे.
नवे तीन फौजदारी कायदे २६ जानेवारीपूर्वी नोटिफाय होणार; त्यानंतर होतील देशभरात लागू
केंद्र सरकारनं इंग्रजांच्या काळातील IPC, CrPC आणि Evidence Act हे तीन फौजदारी कायद्यांमध्ये बदल करुन नवे कायदे आणले आहेत. हे कायदे २६ जानेवारीपूर्वी नोटिफाय करण्यात येणार आहेत. त्यानंतर लगेचच ते देशभरात लागू होतील.
सुनील केदार यांनी जामिनासाठी हायकोर्टात धाव
सुनील केदार यांची जामीन आणि शिक्षेवरील स्थगितीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली असून या प्रकरणावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.
दाखवण्यापुरतं केलं असतं तर एवढं काम झालं नसतं; CM शिंदेंनी जरांगेंना स्पष्ट सांगितलं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यात आज ऑनलाइन बैठक पार पडली. या बैठकीत नोंदींच्या आकडेवारीवर मनोज जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली. तर कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सरकारची भूमिका फक्त दाखवण्यापुरती असती तर एवढं काम झालं नसतं, असं दखील शिंदे म्हणाले.उपोषण सोडताना सरकारच्या शिष्टमंडळाने अनेक आश्वासने दिले. मात्र ठरलेल्या मुद्द्यांवर चर्चा झाली नाही. मराठा समाजाने शब्द मोडला नाही. सगे-सोयरे यांच्याबाबत देखील मनोज जरांगे यांनी मुद्दा उपस्थित केला. पात्र व्यक्तीच्या सगेसोयऱ्यांना आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली.
पाणबुडी प्रकल्प सिंधुदुर्गातच होणार, राज्य सरकारची ग्वाही; मंत्रीमंडळ बैठकीत शिक्कामोर्बत
महाराष्ट्र सरकारने २०१८ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्रातील विविध भागाच्या पर्यटन विकासासाठी १ हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करणार असल्याची घोषणा केली होती. यांतर्गत सिंधुदुर्गात देशातील पहिली पाणबुडी उपलब्ध करून देण्यात येणार होती. सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक येथे समुद्रविश्व पाहण्यासाठी हा प्रकल्प राज्य सरकार राबवणार होतं. परंतु, हा प्रकल्प आता गुजरातच्या द्वारका येथे होणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. यावरून प्रचंड राजकीय गदारोळ झाला. राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकल्प गुजरातला गेला अशी टीका विरोधकांनी केली. यावर आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी हा प्रकल्प सिंधुदुर्गातच होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्पासंदर्भात आज मंत्रालयात बैठक झाली असल्याची माहिती रविंद्र चव्हाण यांनी एक्स पोस्टद्वारे दिली.
जात सर्वेक्षण डेटा सार्वजनिक करा; सर्वोच्च न्यायालयाचा बिहार सरकारला आदेश
बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारने जात सर्वेक्षण केले आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आपली आकडेवारी आणि तपशील सार्वजनिक करण्याचे मोठे आदेश दिले आहेत. जातीच्या आधारावर केलेल्या सर्वेक्षणाचा तपशील सरकारला सार्वजनिक करावा लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
टेनिस कोर्टवरील शांतता झाली भंग… अखेर ‘बादशाह’ 349 दिवसांनी परतला!
अखेर राफेल नदाल टेनिस कोर्टवर परतला! 22 ग्रँडस्लॅम जिंकणारा चॅम्पियन राफेल जवळपास वर्षभरानंतर टेनिस कोर्टवर परतला असून ब्रिसबेनच्या टेनिस चाहत्यांनी त्याचं पुनरागमन जल्लोषात साजरं केलं. ज्यावेळी राफेल नदाल आपल्या शेवटच्या ग्रँडस्लॅम खेळत आहे. गेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत दुखापतीमुळे तो राऊंड ऑफ 64 मध्येच बाहेर पडला होता. त्यानंतर त्याचे रँकिंग 672 स्थानापर्यंत घसरले.
दरम्यान, राफेल नदाल दुखापतीतून सावरत पुन्हा एकदा ब्रिसबेनच्या टेनिस कोर्टवर अवतरला. त्यावेळी चाहत्यांनी त्याचे टाळ्यांच्या गजरात आणि स्टँडिग ओवेशन देत स्वागत केलं. नदालने देखील चाहत्यांच्या प्रेमाने भारावून गेला. त्याने हात उंचावत चाहत्यांच्या प्रेमाला दाद दिली.राफेल नदाल त्याच्या कारकिर्दीतील शेवटचे वर्ष आहे. तो आपली शेवटची 4 ग्रँडस्लॅम स्पर्धांची मोहीम ऑस्ट्रेलियन ओपनपासून सुरू करत आहे.
यंदा १३२ दिवस उच्च न्यायालयाची दारे बंद
मुंबई उच्च न्यायालयाची दारे २०२४ सालातील ३६५ दिवसांपैकी १३२ दिवस बंद राहणार आहेत. टक्केवारीनुसार बघितले तर वर्षातील ३६ टक्के दिवस उच्च न्यायालयात कामकाज होणार नाही. ब्रिटिशकालीन परंपरेचे पालन करत यंदाही उच्च न्यायालय प्रशासनाने सुट्टया जाहीर केल्या आहेत. अलिकडेच न्यायालयीन प्रशासनाने २०२४ सालच्या सुट्ट्यांची दिनदर्शिका प्रकाशित केली आहे.मुंबई उच्च न्यायालयातील सर्व खंडपीठात ही दिनदर्शिका लागू राहणार आहे. यानुसार, उच्च न्यायालयाला ग्रीष्मकालीन ३० दिवस सुट्टी तर दिवाळीनिमित्त १६ दिवस न्यायालय बंद राहणार आहे. नाताळनिमित्त देखील उच्च न्यायालयात १० दिवसाचा अवकाश राहील. उच्च न्यायालयात १३ मे ते ९ जून पर्यंत उन्हाळी सुट्ट्या राहतील. दिवाळीच्या सुट्ट्या २८ ऑक्टोबर पासून ८ नोव्हेंबर पर्यंत राहतील. महिन्यानुसार बघितले तर उच्च न्यायालय सर्वाधिक २३ दिवस मे महिन्यात बंद राहील. जून, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात प्रत्येकी १४ दिवस न्यायालयीन कामकाज होणार नाही. सणानिमित्त १८ दिवस न्यायालयाची दारे बंद राहतील. याशिवाय ५२ रविवार तसेच प्रत्येक दुसरा आणि चौथा शनिवार असे २६ शनिवार देखील न्यायालय बंद राहील. खंडपीठानुसारही काही विशेष दिवशी न्यायालयाला सुट्टी देण्यात आली आहे.
देशभरातील ट्रकचालकांच्या संपामुळे इंधन पुरवठा खंडित, वाहनचालकांची पेट्रोलपंपावर धाव
‘हिट अँड रन’ प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या नवीन कायद्याविरोधात देशभरातील ट्रक आणि बसचालकांनी सोमवारीपासून निदर्शने सुरू केली. राज्यातही या आंदोलनाचा प्रभाव जाणवत असून मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही पेट्रोल पंपावर इंधनपुरवठा ठप्प झाला आहे. मंगळवारीही हे आंदोलन सुरू राहिल्याने राज्यासह देशातील इंधन पुरवठा खंडित झाला आहे.
निवडणुकीसाठी भाजपाचं नवीन घोषवाक्य ठरलं; “अबकी बार…”
लोकसभा निवडणुकीला अवघे काहीच महिने बाकी आहेत. त्यामुळे देशभरातील सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय जनता पार्टी याबाबतीत आघाडीवर आहे. भाजपाने निवडणुकीच्या कामाला सुरुवात केली आहे. दरम्यान, या पक्षाने निवडणुकीसाठीचं घोषवाक्यदेखील तयार केलं आहे. हे घोषवाक्य भाजपा पदाधिकाऱ्यांनी समाजमाध्यमांवर शेअर करण्यास सुरुवात केली आहे. नवी दिल्लीत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची मंगळवारी (२ डिसेंबर) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाचं नवीन घोषवाक्य ठरवण्यात आलं. या बैठकीला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, पक्षाचे सरचिटणीस सुनील बन्सल, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, रेल्वेमंत्री अश्विनी वैश्णव आणि मनसुख मांडविया उपस्थित होते.
भाजपाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ‘अबकी बार ४०० पार, तीसरी बार मोदी सरकार’ हे घोषवाक्य जाहीर केलं केलं आहे. आगामी निवडणुकीच्या काळात टीव्हीवर, रेडिओवर, सोशल मीडियावर, भाषणं आणि प्रचारसभांमध्ये हेच घोषवाक्य सतत आपल्या ऐकायला मिळणार आहे. यासह भाजपाने लोकसभा आणि विधानसभा स्तरावर संयोजकांची नेमणूक केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह , संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा देशव्यापी दौरा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा २२ जानेवारीपासून सुरू होईल.
तिकीट बुकिंग ते ट्रेन ट्रॅकिंग आता एकाच अॅपवर!
भारतीय रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. प्रत्येक शहर ते खेड्यापर्यंत रेल्वेचे जाळं पसरलं आहे, त्यामुळे प्रत्येकाला चांगल्या सुविधा, सेवा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, अलीकडेच जलद प्रवासासाठी भारतीय रेल्वेच्या ताफ्यात हायटेक वंदे भारत ट्रेन दाखल झाल्या. यानंतर रेल्वे प्रशासन आता प्रवाशांच्या सोयीसाठी असे एक ॲप लाँच करत आहे, ज्याच्या माध्यमातून प्रवाशांना ट्रेन तिकीट बुकिंगपासून ट्रेन ट्रॅकिंगपर्यंत, रेल्वेबाबतची A to Z माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे.भारतीय रेल्वे हे सुपर ॲप लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, ज्यावर तुम्हाला रेल्वेसंबंधित अनेक कामे एकाच ठिकाणी करता येतील. रेल्वेच्या सुपर ॲपच्या माध्यमातून तिकीट बुकिंग ते रिअल टाइममध्ये ट्रेन ट्रॅक करणे अशी अनेक कामे करता येतील, असे सांगण्यात येत आहे. अहवालानुसार, या ॲपवर एकूण ९० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून यासाठी तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. CRIS द्वारे रेल्वेचे सुपर ॲप तयार केले जाईल, जे रेल्वेचे आयटी काम पाहते.
आमिर खानची लेक लवकरच बोहल्यावर चढणार, हळदीला झाली सुरुवात
आमिर खान आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी रीना दत्ता यांची मुलगी आयरा खान उद्या (३ जानेवारी) लग्नबंधनात अडकणार आहे. बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर आयरा सातफेरे घेऊन आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. त्यामुळे सध्या आयरा आणि नुपूरच्या घरी लग्नाची लगबग सुरू आहे. आज आयरा आणि नुपूरला हळद लागणार आहे, याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. यासंबंधित व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.आमिर खानचा होणार जावई हा मराठी आहे. तो पेशाने फिटनेस ट्रेनर आणि डान्सर आहेत. Fitnessismची सुरुवात त्याने केली आहे. नुपूरला फिटनेस तज्ज्ञ आणि सल्लागार म्हणून ओळखले जाते. आमिर खान , आयराचा तो फिटनेस ट्रेनर होता. याशिवाय त्याने दशकभर सुष्मिता सेनला फिटनेस ट्रेनिंग दिलं आहे. अशा लोकप्रिय फिटनेस ट्रेनरशी आमिरची लेक आयरा लग्नगाठ बांधणार आहे. आज दोघांची हळद असून याची जोरदार तयारी सुरू आहे. हळदीसाठी आयराची आई म्हणजे रीना दत्ताने खास मराठमोळा लूक केला आहे. या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अजूनही २००० च्या नोटा लोकांकडेच
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)ने 8 महिन्यांपूर्वी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या होत्या, परंतु आजपर्यंत बाजारात असलेल्या नोटा 100 टक्के परत आलेल्या नाहीत. RBI ने या 2000 रुपयांच्या नोटांबाबत अपडेट जारी केले असून या आकडेवारीनुसार देशातील लोकांकडे अजूनही 9,330 कोटी रुपयांच्या 2000 च्या नोटा आहेत.
SD Social Media
9850603590