विमानाला भीषण आग लागूनही बचावले 379 प्रवाशी!
टोकियोच्या हानेडा विमानतळावर उतरण्यापूर्वी जपान एअरलाइन्सच्या विमानाला आग लागल्याचा भयानक व्हिडिओ समोर आला होता. हे फुटेज बघितल्यानंतर संपूर्ण जगात खळबळ माजली होती. एअरबस A350 ची जपानी कोस्ट गार्ड विमानाशी टक्कर झाली होती त्यानंतर विमानाला मोठ्या प्रमाणात आग लागली होती. या विमानात एकूण ३७९ लोक होते. उल्लेखनीय म्हणजे हे ३७९ सुखरूप बचावले. एवढी मोठी आग लागली तरी देखील कोणाचाही मृत्यू झाला नाही. त्यामुळे सुरक्षा कर्मचारी आणि त्यांच्या उत्तम प्रशिक्षणाचे कौतुक होत आहे.
अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करूनही काही वेळातच विमानाला आणखी आग लागली. सामान्यतः विमानांची रचना अशा प्रकारे केली जाते की आपत्कालीन परिस्थितीत संपूर्ण विमान ९० सेकंदात खाली करता येते. परंतु चिंताग्रस्त आणि वास्तविक परिस्थितीचे अचूक मूल्यांकन केले जाऊ शकत नाही. कोणत्याही विमानात लहान मुले आणि वृद्ध आणि काही असुरक्षित लोक असतात ज्यांना आपत्कालीन परिस्थितीत अतिरिक्त संरक्षण आणि काळजीची आवश्यकता असते.
९० सेकंदाच्या नियमावर भाष्य करताना, ब्रेथवेट म्हणाले परिस्थिती लक्षात घेऊन प्रवाशांना बाहेर काढण्यात विमान दलाची कामगिरी प्रभावी होती. या कालावधीत एकाही प्रवाशाचा मृत्यू झाला नसून केवळ १७ प्रवासी किरकोळ जखमी झाले. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेल्या मेहनतीमुळे प्रवाशांना काही अतिरिक्त वेळही मिळाला.
राम बहुजनांचा ते मांसाहारी होते; जितेंद्र आव्हाडांचा वादग्रस्त दावा
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता तो 14 वर्ष वनवास भोगला होता मग ते शाकाहारी कसे असू शकतात?, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचे शिबिर आयोजन करण्यात आले होते, यावेळी जितेंद्र आव्हाड बोलत होते.
दक्षिण आफ्रिकेची दयनीय अवस्था करण्यात इंग्लंडनंतर भारताचाच नंबर; मायदेशात अप्रिय रेकॉर्ड
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दमदार गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. मोहम्मद सिराजच्या भेदक माऱ्यासमोर मायदेशात खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. आफ्रिकेचा पहिला डाव 55 धावात संपुष्टात आला. याचबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या नावावर एक अप्रिय विक्रम देखील नोंदवला गेला.दुसऱ्या सामन्यात मोहम्मद सिराजने एकट्याने 6 विकेट्स घेतल्या तर जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. आफ्रिकाची केप टाऊन कसोटीत शंभरच्या आत ऑल आऊट होण्याची 10 वी वेळ आहे. भारताच्या दृष्टीकोणातून पहायचं तर केप टाऊन हा दक्षिण आफ्रिकेचा बालेकिल्ला आहे. तिथे भारताने एकदाही कसोटी सामना जिंकलेला नाही. मात्र रोहित शर्माचा संघ यंदा हा इतिहास बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आयसीयूमध्ये रुग्ण दाखल करण्याबाबत रुग्णालयांना दिल्या नव्या गाईडलाईन्स; मोदी सरकारचा मोठा निर्णय
आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्यासाठी केंद्र सरकारने नियमावली जारी केली आहे. आता कोणतेही रुग्णालय कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध कोणत्याही गंभीर रुग्णाला आयसीयूमध्ये दाखल करू शकणार नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आयसीयूमध्ये प्रवेश करण्याच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे की, गंभीर आजारी रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांनी नकार दिल्यास रुग्णालये त्यांना आयसीयूमध्ये दाखल करू शकत नाहीत. आरोग्य मंत्रालयाने 24 डॉक्टरांच्या टीमच्या शिफारशींच्या आधारे ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
छगन भुजबळांनी सावित्रीबाईंना अभिवादन केल्यानंतर मराठा कार्यकर्ते आक्रमक; पुतळ्याचे शुद्धीकरण!
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त छगन भुजबळ हे साताऱ्यातील नायगाव येथे आले होते. भुजबळांनी सावित्रीबाई यांना अभिवादन केल्यानंतर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून सावित्रीबाईंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला आहे. भुजबळांच्या अभिवादनानंतर मराठा कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी यावेळी घोषणाबाजी केली.
छगन भुजबळ यांनी सावित्रीबाईंच्या स्मारका ठिकाणी जाऊन त्यांना अभिवादन केले. यावेळी मराठा कार्यकर्त्यांनी स्मारकाठिकाणी आंदोलन केले. भुजबळांनी अभिवादन करताच, मराठा कार्यकर्त्यांनी पुतळ्याला दुग्धाभिषेक करत छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेचा निषेध केला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
महायुतीनं लोकसभेचं रणशिंग फुंकलं! 14 जानेवारीपासून राज्यभर मेळावे; संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती
महायुतीची आज संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी तिन्ही पक्षातील प्रमुख नेते पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते.राज्यभरात महायुतीचे मेळावे घेण्याचे नियोजन आहे. त्यानुसार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १४ जानेवारीपासून राज्यात मेळावे घेतले जातील, अशी माहिती अजित पवार गटाचे नेते सुनिल तटकरे यांनी दिली.तीन पक्ष एकत्रपणे निवडणुकाला सामोरे जाणार आहोत. सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहेत. जानेवारीमध्ये जिल्हा आणि गाव पातळीवर मेळाव्यांचे आयोजन केले जाईल. फेब्रुवारीमध्ये विभागस्तरावर मेळावे होतील. फेब्रुवारीमध्ये मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात मेळावे होतील, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी दिली.
“सरकारने आडकाठी केली तर आम्ही चारही बाजूंनी…”, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. तत्पूर्वी ते अंतरवाली सराटी (जालना) ते मुंबई अशी पदयात्रा काढणार आहेत. यासाठी लाखोंच्या संख्येने मराठा समाजबांधवांनी मुंबईत यावं, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. अंतरवाली सराटी येथून निघणारी पदयात्रा सहा जिल्ह्यांतून जाणार असून यामध्ये हजारो मराठा बांधव सहभागी होणार आहेत. या पदयात्रेदरम्यान, “पोलिसांनी मराठा आंदोलकांची वाहनं अडवली तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर आणि मुंबईतील घरी जाऊन बसू,” असं मनोज जरांगे पाटील दोन दिवसांपूर्वी एका सभेत म्हणाले होते. त्यापाठोपाठ जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला आहे.
मॉडेल दिव्या पहुजाची गुरुग्रामच्या हॉटेलमध्ये हत्या; गँगस्टरची हत्या केल्याप्रकरणी भोगला होता कारावास
गुरुग्राममधील हॉटेलमध्ये एका मॉडेलची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. हत्या झालेल्या मॉडेलचे नाव दिव्या पहुजा असल्याचे सांगितले जाते. हत्या करण्यात तीन आरोपींचा समावेश असून त्यापैकी एक सीटी पॉईंट हॉटेलचा मालक अभिजीत सिंह असल्याचे पोलिसांनी सांगितले. याच हॉटेलमध्ये दिव्याची हत्या झाली. हॉटेल मालक अभिजीतने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने दिव्याची हत्या केली आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी १० लाख रुपये दिले, असेही सांगितले जाते.हॉटेलबाहेर असलेल्या एका निळ्या बीएमडब्लू गाडीतून दिव्याचा मृतदेह बाहेर नेल्याचे सीसीटीव्ही चित्रण हस्तगत करण्यात आले आहे. २ जानेवारी रोजी दिव्यासह अभिजीत आणि त्याचे साथीदार हॉटेलमधील खोली क्र. १११ मध्ये आल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले. त्यानंतर त्याच रात्री अभिजीत आणि त्याचे साथीदार दिव्याचा मृतदेह एका चादरीत गुंडाळून बाहेर नेत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसले. त्यामुळे या संपूर्ण गुन्ह्याची उकल होण्यास मदत झाली.
आयएएस अधिकाऱ्याला ट्रक चालकाची ‘औकात’ काढणं पडलं महागात; जिल्हाधिकारी पदावरून तडकाफडकी बदली!
दोन दिवसांपासून हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मध्य प्रदेशच्या शाजापूरचा असून इथले जिल्हाधिकारी किशोर कन्याल हे एका बैठकीत असभ्य भाषेत बोलल्याचं व्हिडीओत दिसत आहे. ही बैठक दोन दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या ट्रकचालकांची होती. या बैठकीत एक ट्रकचालक जिल्हाधिकाऱ्यांशी हुज्जत घालू लागल्यानंतर “तुम्हारी औकात क्या है”, असा प्रश्न त्यांनी केला. त्यावर ट्रकचालकानं “यही तो लडाई है की हमारी कोई औकात नहीं है”, असं म्हणत प्रत्युत्तर दिलं.हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकारी किशोर कन्याल व मध्य प्रदेश सरकारवरही मोठ्या प्रमाणावर टीका सुरू झाली. परिणामी मुख्यमंत्री मोहन यादव यांनी तातडीने कन्याल यांची शाजापूरच्या जिल्हाधिकारीपदावरून उचलबांगडी केली आहे. त्यांच्याजागी नरसिंहपूरचे जिल्हाधिकारी रिजू बाफना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कन्याल यांना उपसचिवपदी नियुक्ती देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
हिंडेनबर्ग प्रकरणात SC च्या निकालानंतर गौतम अदाणींची पहिली प्रतिक्रिया; ”सत्यमेव जयते…”
सर्वोच्च न्यायालयाने हिंडेनबर्ग प्रकरणात बुधवारी दिलेल्या निर्णयात अदाणी समूहाला मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर गौतम अदाणींनी आनंद व्यक्त केला आहे. अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिले आहे की, सत्याचा विजय झाला. सत्यमेव जयते. जे आमच्या पाठीशी उभे राहिले, त्यांचा मी आभारी आहे. भारताच्या विकासाच्या मार्गात आमचे विनम्र योगदान कायम राहील. जय हिंद….,” असंही ते म्हणाले.
रामराज्याचा आदर्श! ‘या’ राज्यात २२ जानेवारीला असणार ‘ड्राय डे’, सुशासनाचा आठवडाही साजरा
छत्तीसगड या राज्याने २२ जानेवारीच्या दिवशी म्हणजेच रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या दिवशी ड्राय डे जाहीर केला आहे. मुख्यमंत्री विष्णु देव साय यांनी या दिवसाची घोषणा केली आहे. तसंच २५ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत आम्ही सुशासन सप्ताह ठेवला होता असंही त्यांनी सांगितलं. त्याचवेळी त्यांनी २२ जानेवारी रोजी ड्राय डे असेल अशी घोषणा केली. आमचा राज्य चालवण्याचा आदर्श रामराज्य आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
सूर्यकुमार यादवसह ‘या’ चार खेळाडूंना मिळाले आयसीसी टी-२० ‘क्रिकेटर ऑफ द इयर’साठी नामांकन
जून २०२४ मध्ये होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या संयोजनावर सातत्याने चर्चा होत आहे. संघाचा सर्वात मोठा टी-२० फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या दुखापतीने त्रस्त आहे. दक्षिण आफ्रिकेत दुखापत झाल्यानंतर, चाहत्यांना आशा आहे की स्काय लवकरात लवकर तंदुरुस्त होईल, दरम्यान त्याच्यासाठी एक आनंदाची बातमी देखील समोर आली आहे. वास्तविक, सूर्याला आयसीसीकडून वर्ष २०२३ च्या टी-२० क्रिकेटर ऑफ द इयरसाठी नामांकन दिले आहे.आयसीसीने या वेळी पुरुषांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूसाठी नामांकन केलेले खेळाडू. त्यात भारताचा झंझावाती फलंदाज सूर्यकुमार यादवच्या नावाचाही समावेश आहे. या यादीत सूर्याशिवाय झिम्बाब्वेचा स्टार अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझाचे नाव आहे. युगांडाचा उदयोन्मुख स्टार अल्पेश रामजानी याच्या नावाचाही या यादीत समावेश आहे. या यादीत न्यूझीलंडचा फलंदाज मार्क चॅपमननेही आपले स्थान निर्माण केले आहे. आयसीसीने नामनिर्देशित केलेल्या या चार खेळाडूंमध्ये कोणता खेळाडू बाजी मारतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
SD Social Media
9850603590