मुंबई : बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं आज निधन झालं. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राहत्या घरात दुपारी 12 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. 70 च्या दशकात अनेक सिनेमांमधून शशिकला यांनी त्यांच्या अभिनयाची छाप उमटवली आहे.
शशीकला यांनी जवळपास 100 हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. सिनेमातील नायिकेच्या भूमिकेसोबतच खलनायिकेच्या भूमिकेतूनही त्यांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. मुळच्या सोलापूरच्या असलेल्या शशिकला यांचं संपूर्ण नाव शशिकला जवळकर असं होतं. ओमप्रकाश सैगल यांच्याशी नंतर त्यांनी विवाह केला. शशिकला यांना लहानपणापासूनच नृत्य आणि अभिनयाची आवड होती. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्यांनी नृत्य शिकण्यास सुरुवात केली होती.