सर्वच क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज लॉकडाउन/ कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीत राज्यात करोनाचं संक्रमण रोखण्यासाठी कठोर निर्बंध घालण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी निर्णयांची माहिती दिली. राज्यात उद्यापासून कडक नियम लागू होणार असून, रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असून, दिवसा १४४ कलम लागू (जमावबंदी) असेल, असं मलिक यांनी सांगितलं.
नवाब मलिक म्हणाले, करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक नियमावली तयार करण्यात आली आहे. उद्या रात्री (५ एप्रिल) ८ वाजेपासून ही नियमावली लागू होईल. रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात संचारबंदी असेल. इतर वेळी जमावबंदी आदेश लागू असतील. सर्व मॉल्स, रेस्तराँ, बार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. होम डिलिव्हरी आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. शासकीय कार्यालये ५० टक्के क्षमतेनं सुरू राहतील. उद्योग संपूर्ण क्षमतेनं सुरू राहणार असून, कामगारांवर बंधनं नसतील. जिथे कामगारांना राहण्याची व्यवस्था असलेली बांधकामं सुरू राहतील. मंडईत निर्बंध नसतील, पण गर्दी कमी करण्यासाठी नियम करण्यात आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाउन असेल. हा निर्णय मंत्रिमंडळाने एकमताने घेतला आहे,” असं नवाब मलिक यांनी सांगितलं.
“राज्यात शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत कठोर लॉकडाऊन लागू असणार आहे. हा निर्णय एकमतानं घेण्यात आला आहे. निर्णय घेण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेत्यांशी, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याशीही चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत हॉटेल व्यावसायिक, उद्योजक, जीम चालक आणि सिनेसृष्टीतील दिग्गजांशीही चर्चा केली आहे. राज्यात करोना वाढत असताना एकजुटता दिसली पाहिजे, त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी राजकीय नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा केली,” असं नवाब मलिक म्हणाले.
हे असेल बंद
राज्यात आठवड्याला लॉकडाऊनमध्ये बंद पाळण्यात येणार आहे. या काळात राज्यातील गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळं बंद राहतील. तसेच सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमही बंद राहणार आहेत. फक्त पुजाऱ्यांना मंदिरात पूजा करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र या काळात सार्वजनिक आणि खासगी वाहतूकीवर कोणतेही निर्बंध नसतील, अशी माहिती मलिक यांनी सांगितलं.