कोरोना नियंत्रणात येण्यास आणखी काही दिवस लागतील. त्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या विविध अभ्यासक्रमांचे प्रात्यक्षिक ऑनलाइन पद्धतीने घेण्याबाबत आवश्यक तयारी सुरू केली आहे. त्यासाठी संबंधित प्राध्यापकांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांची ऑनलाइन पद्धतीने प्रॅक्टिकल परीक्षा घेणे आता शक्य होणार असल्याचे दिसून येत आहे. करोनामुळे पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यलायातील विज्ञान, अभियांत्रिकी औषधनिर्माणशास्त्र आदी अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षा होऊ शकल्या नाहीत. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात येऊन प्रात्यक्षिक करणे शक्य नाही.
तसेच आणखी किती दिवसांनी करोनाच्या परिस्थितीत सुधारणा होणार हे सांगता येत नाही. दोन्ही सत्राच्या प्रॅक्टिकल परीक्षा वर्षाच्या शेवटी घेण्याचा निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
मात्र, वर्षभर हीच परिस्थिती कायम राहिली तर विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये येऊ शकणार नाहीत. त्यामुळे विद्यापीठाने ऑनलाइन पद्धतीने प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याबाबत तयारी सुरू केली आहे. त्यासाठी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी गुणवत्तापूर्ण व्हिडिओ तयार केले आहेत. विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेअंतर्गत काही विषयांच्या शिक्षकांची कार्यशाळा घेऊन त्यांना ऑनलाइन प्रॅक्टिकलबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. सर्व प्राध्यापकांना प्रशिक्षण दिल्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांची ऑनलाइन प्रॅक्टिकल परीक्षा घेणे शक्य होणार आहे, असे विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.एम.जी.चासकर यांनी सांगितले.