“नख लावाल तर फाडून टाकणार” निलेश राणे यांचा दीपक केसरकरांना धमकीवजा इशारा
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार स्थापन झाल्यापासून राणे कुटुंब आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यात वादाला सुरुवात झाली आहे. दीपक केसरकर यांनी अलीकडेच एका पत्रकार परिषदेत राणे कुटुंबासोबत आपला वैयक्तिक वाद नसून आपण त्यांच्यासोबत काम करायला तयार असल्याचं म्हटलं आहे. केसरकर यांच्याकडून मैत्रीचा हात पुढे केल्यानंतरही भाजपा नेते निलेश राणे यांनी त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची नवी तारीख समोर; फडणवीसांकडे गृहखाते
शिदे-फडणवीस सरकार राज्यात स्थापन होऊन महिना उलटून गेला आहे. तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यावर विरोधकांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. दरम्यान आता मंत्रिमंडळ विस्ताराची नवीन तारीख समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 15 ऑगस्टपूर्वी किमान 15 मंत्र्यांचा समावेश करून त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करतील. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महत्त्वपूर्ण गृहखाते सांभाळतील अशी अपेक्षा आहे. सूत्रांनी रविवारी ही माहिती दिली. इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीमुळे राज्यातील निवडणुकांना विलंब होत असल्याचेही उच्च सरकारी सूत्रांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्टीकरण मिळाल्यानंतर त्या ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले.
“शिवसेना सोडून गेलेल्या प्रत्येकाला बाळासाहेबांची हाय लागली”; सुनील राऊतांचा बंडखोर आमदारांवर निशाणा
एकीकडे शिंदेच्या बंडखोरीमुळे शिवसेना डळमळीत झाली आहे. तर दुसरीकडे पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडीने अटक केली आहे. राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना देखील ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. या संपूर्ण प्रकरणानंतर संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे.प्रत्येक बंडखोर आमदारांना बाळासाहेबांची हाय लागली असल्याचे म्हणत संजय राऊतांनी बंडखोर आमदारांवर टीका केली आहे. खूप कष्टाने बाळासाहेबांनी हा पक्ष निर्माण केला आहे. ज्या ज्या व्यक्तींनी हा पक्ष सोडला त्या प्रत्येकाला बाळासाहेबांची हाय लागली असल्याची टीकाही सुनील राऊत यांनी केली आहे. गेले महिनाभर आम्ही लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याच्या चर्चा ऐकत आहोत. दामिनी चित्रपटातील तारीख पे तारीख सारखी राज्याची अवस्था झाली असल्याचेही राऊत म्हणाले.
पोपटाच्या सततच्या शिट्ट्यांना वैतागून आजोबांनी गाठलं थेट पोलीस स्टेशन
पुण्यातील शिवाजीनगर परिसरात राहणार्या एक ७२ वर्षीय आजोबांनी पोपटाच्या सततच्या शिट्ट्यामुळे होणार्या त्रासाला वैतागून थेट पोलीस स्टेशन गाठल्याचे समोर आले आहे. या आजोबांनी थेट खडकी पोलिस स्टेशन गाठत, पोपट पाळणार्या व्यक्ती विरोधात तक्रार केली आहे. तर या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
एकूण पदकतालिकेत भारत आता चौथ्या स्थानावर!
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची घोडदौड जोरात सुरु आहे. आज स्पर्धेच्या दहाव्या दिवशी अॅथलेटिक्समध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळालं. इतकच नव्हे तर तिहेरी उडीत सुवर्णपदकासह रौप्यपदकही भारताच्या झोळीत पडलं आणि एक इतिहास घडला. पुरुषांच्या तिहेरी उडीत भारताच्या एलदोस पॉलनं गोल्ड मेडल पटकावलं. तर याच इव्हेंटमध्ये रौप्यपदक पटकावणाराही अॅथलीट भारताचाच होता. तिहेरी उडीत अब्दुल्ला अबूबबकरनं दुसऱ्या स्थान मिळवत भारताच्या शिरपेचात मानाचा नवा तुरा खोवला.
17 सुवर्ण 🥇
12 रौप्य 🥈
19 कांस्य 🥉
एकूण 48 पदके!
उद्धव ठाकरेंना फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा देणार का? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात विषयच संपवला!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीमध्ये आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीसाठी देशभरातल्या जवळपास सगळ्याच मुख्यमंत्र्यांनी सहभाग दर्शवला. पंतप्रधानांसोबतच्या या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये शिंदे यांनी वेगवेगळ्या मुद्द्यावर भाष्य केलं.एकनाथ शिंदे यांना या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंना फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा देणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. सुरूवातीला एकनाथ शिंदे यांनी यावर उत्तर देणं टाळलं, पण नंतर फ्रेंडशिप डे सगळ्यांसाठी असतो, माझ्या सगळ्यांना शुभेच्छा असं एकनाथ शिंदे म्हणाले.
महाराष्ट्रात पावसाचं धूमशान, दोन दिवस प्रचंड महत्त्वाचे, पाच दिवसांचा अलर्ट, पूरस्थितीचा धोका
महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने उसंत घेतलेली होती. पण दोन आठवड्यांच्या ब्रेकनंतर पावसाने पुन्हा एन्ट्री मारली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड मुसळधार पाऊस पडतोय. अनेक ठिकाणी त्याने थैमान घालायला सुरुवात केली आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात तर अक्षरश: वैरी होवून कोसळतोय की काय अशी भीती वाटेल इतक्या जोरात पाऊस कोसळताना दिसतोय. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत होईल की काय, अशी भीती सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जातेय. पावसाचं हे आक्राळविक्राळ रुप पुढच्या पाच दिवसांसाठी तसंच असू शकतं, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्याचा दिवस हा पावसासाठी फार महत्त्वाचा आहे. कारण काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या अलर्टनंतर प्रशासनही सतर्क झालं आहे. काही ठिकाणी खरंच नद्यांना पूर आल्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे प्रशासनावरील दबाव वाढताना दिसतोय. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे.
दोन महिन्यांच्या संघर्षानंतर शिंदे-ठाकरे एकत्र येणार! जागा आणि मुहूर्तही ठरला
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेना अडचणीत सापडली आहे. शिवसेनेच्या इतिहासातलं हे सगळ्यात मोठं बंड आहे. 55 पैकी 40 आमदार तसंच 19 पैकी 12 खासदार यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला आहे. 20 जूनला विधानपरिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे शिवसेना आमदारांना घेऊन पहिले सुरत आणि मग गुवाहाटीला गेले, यानंतर महाराष्ट्रात सत्तानाट्य घडलं. याच्या दोन महिन्यांनी शिंदे आणि ठाकरे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवी मुंबईमध्ये उभारण्यात येणाऱ्या तिरुपती बालाजी मंदिराच्या भुमीपूजनाला एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.21 ऑगस्टला नवी मुंबईमध्ये बालाजी मंदिराच्या भुमीपुजनाचं निमंत्रण मंदिराच्या विश्वस्तांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह ठाकरे कुटुंबालाही दिलं आहे.
टॅटू काढणे आले अंगाशी, 14 तरुणांना HIV ची लागण, घटनेने शहरात खळबळ
गेल्या काही वर्षांत तरुणांमध्ये टॅटू बनवण्याची क्रेझ झपाट्याने वाढली आहे. मात्र, अनेकदा फॅशनमुळेही समस्या निर्माण होतात. असाच एक धक्कादायक प्रकार धर्मनगरी वाराणसीमध्ये समोर आला आहे. याठिकाणी 14 तरुणांना एकाच सुईने टॅटू काढल्याने एचआयव्हीची लागण झाली आहे. टॅटू बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सुईमुळे संसर्ग पसरला असल्याची भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. तर या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे.
SD Social Media
9850 60 3590