भाजपने पुन्हा बाजी मारलीच, उपराष्ट्रपती निवडणुकीत NDA चा विजय, जगदीप धनखडांचा जयजयकार

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांचा विजय झाला आहे. तर यूपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव झाला आहे. जगदीप यांना 528 मतं मिळाल्याची माहिती समोर आली आहे. देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी काल निवडणूक पार पडली. यूपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा आणि एनडीएचे जगदीप धनखड यांच्यात लढत झाली. पण या लढतीत भाजपच्या लोकसभा आणि राज्यसभेत सर्वाधिक जागा असल्याने जगदीप धनखड यांचा विजय निश्चित मानला जात होता.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काल 780 पैकी 725 खासदारांनी मतदान केलं. यापैकी तृणमूल काँग्रेसच्या लोकसभा आणि राज्यसभा मिळून एकूण 36 खासदारांनी तटस्थ राहण्याचं ठरवलेलं होतं. त्यामुळे ते मतदान करणार नाहीत हे आधीच ठरलं होतं. दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील खासदारांनी मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा दर्शवला होता. पण प्रत्यक्ष निवडणुकीत शिवसेनेच्या सहा खासदारांनी मतदानाचं केलं नाही.

जगदीप धनखड हे सध्या पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत. त्यांचे राजस्थानशी घट्ट नाते आहे. त्यांचे जन्मस्थान झुंझुनू आणि कर्मस्थळ जयपूर उच्च न्यायालय होते. ते राजस्थान हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष राहिले आहेत. धनखड हे राजकारणातील अनुभवी खेळाडू आहेत. ते 11 वर्षे काँग्रेसमध्ये होते. त्यांचे मेहुणे धरमपाल चौधरी हे अलवर न्यायालयात वरिष्ठ वकील आहेत.

धनखड हे कायदा, राजकारण, राजकीय डावपेच यासाठी ओळखले जातात. ते राजस्थानातील जाट समाजातून येतात. राजस्थानमध्ये जाटांना आरक्षण मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. धनखड यांना या समाजात चांगली प्रतिष्ठा आहे. धनखड हे केंद्रीय मंत्रीही होते. 1989 ते 91 पर्यंत ते झुंझुनू येथून जनता दलाचे सदस्य होते. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी अजमेरमधून काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली पण पराभव झाला. नंतर 2003 मध्ये धनखड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि किशनगडमधून आमदार म्हणून निवडून आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.