श्रेयस, किशनच्या दमदार खेळींमुळे आफ्रिकेवर सात गडी राखून विजय
मुंबईकर श्रेयस अय्यरचे शानदार शतक आणि इशान किशनच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारताने रविवारी झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
रांची येथे झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत ७ बाद २७८ अशी धावसंख्या उभारली. त्यानंतर भारताने ४५.५ षटकांतच विजयी लक्ष्य गाठताना ३ बाद २८२ धावा केल्या. श्रेयसने एकदिवसीय कारकीर्दीमधील सर्वोच्च खेळी करताना १११ चेंडूंत नाबाद ११३ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत १५ चौकारांचा समावेश होता. तसेच श्रेयसने डावखुऱ्या किशनच्या साथीने तिसऱ्या गडय़ासाठी १६२ धावांची भागीदारी करताना भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला होता.
श्रेयस आणि किशन यांनी आव्हानात्मक खेळपट्टीवर केलेली फलंदाजी हेच या सामन्याचे वैशिष्टय़ ठरले. २४ वर्षीय किशनने आपल्या फलंदाजीचे वेगवेगळे स्तर ९३ धावांच्या खेळीत दाखवले. कर्णधार शिखर धवन (२० चेंडूंत १३) आणि शुभमन गिल (२६ चेंडूंत २८) हे दोघे लवकर बाद झाल्यावर किशनने संयमाने खेळ केला. त्यानंतर स्थिरावल्यावर किशनने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीवर केलेले आक्रमण तेवढेच विलक्षण होते. रांचीच्या संथ खेळपट्टीवर आनरिख नॉर्किएच्या ताशी १४५ किमीच्या वेगाने येणाऱ्या चेंडूला किशनने मैदानाची सफर घडवली. त्याने फिरकीविरुद्धही फटकेबाजी केली. किशनने आपल्या ८४ चेंडूंच्या खेळीत ४ चौकार आणि ७ षटकारांची आतषबाजी केली. श्रेयसनेही कमालीचे सातत्य दाखवताना एकदिवसीय कारकीर्दीतील दुसरे शतक झळकावले.
तत्पूर्वी, एडीन मार्करम (८९ चेंडूंत ७९) आणि रिझा हेंड्रिक्स (७६ चेंडूंत ७४) यांनी मधल्या षटकांत केलेल्या १२९ धावांच्या भागीदारीने आफ्रिकेचे २७८ धावांचे आव्हान उभे केले. मात्र, मोहम्मद सिराजने आफ्रिकेच्या आक्रमणावर अंकुश ठेवला. धीम्या गतीच्या चेंडूंचा अचूक वापर करून सिराजने उत्तरार्धातील षटकांत अप्रतिम मारा केला. त्याने आक्रमक पवित्र्यात असलेल्या डेव्हिड मिलरलाही (३४ चेंडूंत नाबाद ३५) जखडून ठेवले. यामुळेच आफ्रिकेची धावसंख्या मर्यादित राहिली.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका : ५० षटकांत ७ बाद २७८ (एडीन मार्करम ७९, रिझा हेंड्रिक्स ७४; मोहम्मद सिराज ३/३८) पराभूत वि. भारत : ४५.५ षटकांत ३ बाद २८२ (श्रेयस अय्यर नाबाद ११३, इशान किशन ९३, संजू सॅमसन नाबाद ३०; वेन पार्नेल १/४४, बॉर्न फॉर्टिन १/५२)
सामनावीर : श्रेयस अय्यर