काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी अचानक भगवानगडाला भेट दिली. त्यापाठोपाठ काल, रविवारी सायंकाळी अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह माजी मंत्री धनंजय मुंडे यांनीही भगवानगडाला भेट देत भगवानबाबांचे दर्शन घेतले. नेत्यांच्या या अचानक भेटीचे रहस्य काय? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पक्षचिन्ह व शिवसेना नावाबाबत दिलेला निर्णय म्हणजे भाजपने उघड उघडपणे शिवसेना संपवण्यासाठी टाकलेली पावले दिसतात, असाही आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केला.भगवानबाबांचे दर्शन घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पाटील व माजी मंत्री मुंडे यांनी गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. त्यानंतर बोलताना पाटील म्हणाले, शिवसेनेच्या बाबतीत जो निर्णय झाला तो इतिहासात यापूर्वी कधीही झाला नव्हता. चिन्ह गोठवणे एक वेळ समजू शकतो, मात्र पक्षच हिसकावून घेणे ही भाजपची खेळी आहे. या खेळीने लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. अंधेरीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हा निर्णय झाला, याबाबत आश्चर्य वाटते. भाजपने शिवसेना संपवण्यासाठी कशी पावले टाकली ते सर्वाना दिसत आहे. आता हा प्रकार भाजपाच्या अंगलट येऊ लागल्याने भाजपचेच बगलबच्चे राष्ट्रवादीवर बेछूट आरोप करत आहेत.
बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांची मैत्री होती. जुन्या काळी पवार दसरा मेळाव्याला गेलेले छायाचित्रे मी पाहिली आहेत. त्यामुळे पवार शिवसेना संपवतील या आरोपात तथ्य नाही, असाही दावा पाटील यांनी केला. माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या सूचनेनुसार आपण भगवानगडाला राज्याचा अर्थमंत्री असताना निधी दिला होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
महंतांशी बंद दरवाजाआड चर्चा
भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पाटील व माजी मंत्री मुंडे या दोघांना गडाचा परिसर संपूर्णपणे फिरून दाखवला. गडावरील नियोजित मंदिराच्या दगडी बांधकामाची माहिती दिली. अपूर्ण बांधकामाच्या इमारतीकडे बोट दाखवून महंतांनी हे भांडणाचे (पंकजा मुंडे) फलित आहे. सात वर्षांपासून यात्रीनिवासचे काम बंद आहे, त्याबद्दल आपण आत बसून बोलू सगळी माहिती देतो, असे म्हणत पाटील व मुंडे या दोघांशीही बंद दरवाजाआड चर्चा केली.