राज्यात मागच्या आठवड्यापासून राज्यातील मोठ्या दुध संस्थानी दुध खरेदी आणि विक्रीच्या दरात वाढ केली आहे. अमुल, गोकुळ यानंतर आता पुणे जिल्हा बँकेने दुधाच्या दरात वाढ केली आहे. पुणे जिल्हा दुध संघाने लिटरपाठीमागे खरेदी आणि विक्रीच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली आहे. दरम्यान याचा फटका सामान्यांना बसणार आहे. डिझेलच्या दरात वाढ झाल्याने दुध विक्री दरात वाढ होत असल्याचे दुध संघातील संचालकांचे म्हणणे आहे. या दुध दर वाढीचा थेट फटका मात्र सामान्यांच्या खिशावर बसणार आहे.
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ तथा कात्रज दूध संघाने गाय आणि म्हशीच्या दुधाच्या खरेदी आणि विक्री दरात प्रतिलिटरला प्रत्येकी दोन रुपयांनी वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी 1 सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे. वाढत्या स्पर्धेत दूध खरेदीसाठी रस्सीखेच सुरू झाली असून, खरेदी दरात वाढ करण्यामुळे दुधाला वाजवी दर देण्यास कात्रज दूध संघाने प्राधान्य दिले आहे. कात्रजच्या संचालक मंडळाची मासिक बैठक संघाच्या अध्यक्षा केशरताई पवार यांच्या अध्यक्षतेखाली संघाच्या मुख्यालयात झाली. त्यामध्ये हा निर्णय एकमताने घेण्यात आला.
गायीच्या 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ गुणप्रतिच्या दुधाचा खरेदी दर आता 33 वरून 35 रुपये, तर विक्री दर 50 वरून 52 रुपये होईल. तर, म्हैस दुधाचा 6.0 फॅट व 9.0 एसएनएफ गुणप्रतिच्या दुधाचा खरेदी दर आता 46 वरून 48 रुपये आणि विक्री दर 64 वरून 66 रुपये करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. याबाबत पवार म्हणाल्या, ‘श्रावण महिना, सणसूद, मिठाईच्या पदार्थांना वाढलेली मागणी यामुळे दूध खरेदीसाठी तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे.
त्यातच दुधाची पावडर व बटरचे दरही वाढत असल्यामुळे आणि ग्राहकांची कात्रजच्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना असणारी मागणी विचारात घेऊन दूध खरेदी आणि विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कात्रज दूध संघाचे रोजचे दूध संकलन 1 लाख 85 हजार लिटर होत आहे. मध्यंतरी ते 2 लाख 15 हजार लिटर होते. दूध खरेदी दरात वाढीच्या निर्णयामुळे दूध संकलन पुन्हा पूर्वपदावर येण्याची अपेक्षा आहे.