अभिनेता सोनू सूदने एक ट्विट करत सरकारला अपील केली आहे. ” मी विनंती करतो की 25 वर्ष आणि त्यावरील जनतेसाठी लसीकरण सुरू करण्यात यावं. रुग्ण संख्या वाढतेय त्यात लहान मुलांनादेखील कोरोनाची लागण होतेय. त्यामुळे 25 वर्षांवरील जनतेसाठीदेखील लसीकरणाची घोषणा करण्याची वेळ आली आहे. तरुणांमध्ये रुग्णसंख्या वाढताना दिसून येतेय.” अशा आशयाचं ट्विट सोनूने केलं आहे.
सोनू सूदने नुकतीच अमृतसर इथं एका रुग्णालयात कोरोनाची लस घेतली आहे. यावेळी त्यांने सोशल मीडियावरून माहिती दिली होती. “मी कोरोनाची लस घेतली आहे. आता माझ्या देशाने कोरोनाची लस घ्यावी. आज पासून आम्ही संजीवनी नावाचं नवं लसीकरण अभियान सुरू केलं आहे. हे अभियान लोकांमध्ये जनजागृती करेल आणि लसीकरणासाठी प्रोत्साहन देईल.” असं त्याने यावेळी सांगितलं.
देशावर कोरोनाचं संकट ओढावल्यापासून सोनू सूदने अनेक गरजूंना मदत करण्याचं काम हाती घेतलं आहे. त्याचसोबत जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी देखील त्याने पुढाकार घेतला आहे.